अबाऊट टर्न: स्पिरीट

हिमांशू

नववर्षाचं कॅलेंडर भिंतीवर लटकलं की सगळी पानं उलटून कुठल्या महिन्यात काय, याची पाहणी करायचा आमचा पूर्वीपासूनचा शिरस्ता. असं करणारे आम्ही एकटेच नाही, हे कबूल; पण आमची ही “पाहणी’ सहेतुक नसते, हे मात्र आवर्जून सांगायला हवं. सरकारी कर्मचारी कदाचित वर्षभरातल्या सुट्या न्याहाळत असतील किंवा कुठल्या महिन्यात जोडून सुट्या येतात हे पाहत असतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रिकेटचे शौकिन आयपीएलच्या शेड्यूलप्रमाणं कुठली मॅच सुटीदिवशी येतीय, हे पाहत असतील. अनेकजण आपला आणि आप्तेष्टांचे वाढदिवस कोणत्या वारी येतात, हेही पाहात असतील. सणासुदीची माहिती घेण्यासाठीही कुणी कॅलेंडर चाळत असतील. आम्ही मात्र दरवर्षीप्रमाणं अगदी कोणताही हेतू मनात न ठेवता कॅलेंडर चाळत होतो. दिसेल ते पाहायचं आणि जमेल तेवढं लक्षात ठेवायचं, या भावनेनं.

टीव्हीवर न्यूज चॅनेल सुरू होतं आणि बातम्या कानावर पडत होत्या. पेपरवाचनही नुकतंच झालेलं
असल्यामुळं वेगवेगळ्या विचारांची गर्दी डोक्‍यात झालेली. कॅलेंडरच्या पानापानावर देवादिकांची आणि महापुरुषांची चित्रं दिसत होती आणि डोक्‍यात घोळत होत्या बातम्या. नकळत आमच्या अवलोकनाला छोटासा हेतू मिळाला. खरंतर नववर्षाचे संकल्प करणं आम्हाला कधी जमलं नाही. पण कॅलेंडरवरच्या देवादिकांच्या चित्रांकडे पाहून काही मागावंसं वाटलं… बाकी काही नको; पण परिस्थिती आणि माणसं स्वीकारण्याचा खिलाडूपणा नव्या वर्षात आम्हाला मिळो!
मनात नकळत दोन-तीन बातम्या “शॉर्टलिस्ट’ झाल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर दमदार गोलंदाजी करणारा जसप्रित बुमराह नजरेसमोर येत होता. क्रिकेटमधलं फारसं कळत नसलं, तरी त्याची शैली पाहून काहीतरी चुकतंय असं पूर्वीपासून वाटत असे. आज कळलं की, भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार कपिलदेव यांनाही तसंच वाटत होतं. पण ऑस्ट्रेलियातला परफॉर्मन्स पाहून “बुमराहनं माझं म्हणणं खोटं ठरवलंय,’ अशी प्रांजळ कबुली कपिल देव यांनी दिली. “सुरुवातीला आपल्याला त्याच्या शैलीचं काहीच अप्रूप वाटत नव्हतं; पण आता मात्र त्याला मानलं बुवा’, असं म्हणायला मोठं मन असावं लागतं आणि तो आदर्श आपल्यासमोर एक खेळाडूच ठेवू शकतो. एवढंच नव्हे, तर 86 धावांमध्ये 8 मोहरे टिपणाऱ्या बुमराहचा मारा आपल्यालाही झेपला नसता, असं खुद्द विराट कोहली म्हणाला. खेळाडूंची ही विशाल मानसिकता कुठे आणि आपलं कधीच, काहीच चुकत नाही असं मानणारी आपल्यासारखी सामान्य माणसं कुठे… असा विचार मनात आला.

मान्य करणं, स्वीकार करणं, हा गुण आपल्याकडे हवाच, असं वाटू लागलं. आपल्या भोवतालचं सामाजिक वातावरण, समाजमाध्यमं, राजकारण, अर्थकारण ही पार्श्‍वभूमी किती बरबटलेली आहे! पण जमेल तशी सुरुवात तर करायलाच हवी!

खेळाडूंच्या विशाल मानसिकतेच्या पार्श्‍वभूमीवर जेव्हा आपल्या डोळ्यासमोर अकोल्याचा किस्सा येतो, तेव्हा हसावं की रडावं कळत नाही. एका महोत्सवाला प्रसिद्धी कमी मिळाली म्हणून जिल्हाधिकारीपद भूषवणाऱ्या व्यक्‍तीनं पत्रकारांना दूषित पाणी द्यावं, हे किती विचित्र वाटतं!

खरं तर हा महोत्सव खासगी संस्थेचा होता आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यात भलताच रस होता. पत्रकारांना चहापानाला बोलावून त्यांनी मुद्दाम काडीकचरा जाळून धूरही केला. प्रसिद्धीसाठी एवढा खटाटोप करू शकणारी माणसं प्रसिद्ध खेळाडूंकडून काही शिकतील का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)