अबाऊट टर्न: सेल्फी… 

हिमांशू 

सेल्फीचं वेड कमी होण्याचं काही नाव घेईना. उलट ते वाढतच चाललंय, हे पाहून सहसा सेल्फी न काढणाऱ्या आमच्यासारख्यांनाही कधी-कधी तसा मोह होतो. सह्याद्रीच्या उंचातल्या उंच सुळक्‍यावर उभं राहावं आणि भलामोठ्ठा मोबाइल कॅमेरा घेऊन एक असा सेल्फी काढावा, ज्यात पार्श्‍वभूमीला संपूर्ण महाराष्ट्र दिसेल. ही केवळ कविकल्पना असली तरी तसं घडणं अत्यावश्‍यक वाटतं. खरोखर संपूर्ण महाराष्ट्र एखाद्या सेल्फीत मावला, तर काय-काय दिसेल? आजच्या घडीला तरी संकटंच संकटं दिसतील. असं म्हणतात की, संकट कधीही एकटं येत नाही. एकाच वेळी सगळी संकटं चाल करून येतात. रस्त्यावरून प्रवास करावा तर आजूबाजूच्या शेतांमधून भलरी गीतं ऐकू न येता जलयुक्त शिवाराची गाणी ऐकू येतात आणि शिवारात जल मात्र दिसत नाही. हवेतून प्रवास करावा तर हेलिकॉप्टर भरकटतं आणि पाण्यातला प्रवास सुरक्षित वाटत नाही. शिवाय बोटीवर सेल्फी वगैरे काढला तर वादाला निमित्त मिळतं. प्रश्‍न विचारले जातात आणि उत्तरं द्यावीत तर हमखास चुकतात. “आतापर्यंत महाराष्ट्राला तरुण मुख्यमंत्री मिळालाच नव्हता म्हणून सेल्फीचा विषय गाजला,’ असं म्हणून टाळ्या मिळवायला जावं तर “अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री बनणाऱ्या शरद पवारांना विसरलात का.’ असा प्रतिप्रश्‍न येतो. किती विचित्र अवस्था ही!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही अवस्था अर्थातच आमची नसून, मुख्यमंत्र्यांची आहे हे एव्हाना ओळखलं असेलच. जमिनीवरून, हवेतून आणि पाण्यातून एकाच वेळी संकटं चालून आली, तर मुकाबला तरी कुणाकुणाशी करायचा? पीकपाण्याची परिस्थिती केंद्राच्या दुष्काळाच्या निकषात बसेना आणि समोर दिसतोय तो दुष्काळच आहे, हे कबूल करावंच लागतंय.

मग उसनं अवसान आणून, “टंचाई आणि दुष्काळ असे शब्दच्छल करू नका,’ असा टोमणा विरोधकांना मारावा लागतो. पण उपलब्ध पाणी नगर-नाशिकला द्यायचं की मराठवाड्याला, हा तिढा सुटता सुटत नाही. पाणी सोडलं तर चोरी होण्याची भीती; त्यामुळं बावीस ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. “दुष्काळग्रस्तांना मदत देणारच,’ असं ठामपणे सांगायला जावं तर शेतकऱ्यांचे नेते म्हणतात, “मागच्या वर्षीचे तुरीचे पैसे आधी टाका!’ कर्जमाफी किती शेतकऱ्यांना मिळाली, याची आकडेवारी विरोधकांच्या तोंडावर फेकावी, तर “अभ्यास’ संपता संपत नाही. विरोधकांना मात्र कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचा आकडा कुठून आणि कसा कळतो, याचा पत्ता लागत नाही. थोडक्‍यात, एक प्रश्‍न सोडवायला जावं, तर दहा प्रश्‍न हजर असतात, अशी अवस्था!

त्यातच निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे प्रश्‍नही वाढणार आणि उत्तरं जास्त द्यावी लागणार. विरोधकांना टोमणे मारून हसण्याचा अभिनय किती दिवस करणार?

संकटं जशी एकटी येत नाहीत, त्याचप्रमाणं संकटात सापडल्यावर संकटात मदतीला कुणी येत नाही. उलट संकटाची व्याप्ती वाढवण्यासाठी काय करता येईल, असा प्रयत्न सगळे करतात. शिवाय माध्यमं छोटे प्रश्‍न मोठे करायला तयारच! उदाहरणार्थ, मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींचा क्रूझवरचा सेल्फी! खरंतर सेल्फी काढताना जहाजाच्या कॅप्टनची परवानगी घेतली होती, हे स्पष्टीकरण देऊन झालंय. तरीसुद्धा “आम्ही केलेल्या कामामुळं लोक आम्हाला मतं देतील,’ असं सांगायला जावं तरी बातमीच्या मथळ्यात सेल्फीच? आभाळ फाटलं तर ठिगळांचा दुष्काळ! असं सगळं काही चित्र असताना हे सरकार वाढत्या प्रश्‍नांना उत्तरं देण्यात व्यग्र आहे, हे नक्की. त्याला मुख्यमंत्री तरी काय करणार आहेत बरं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)