अबाऊट टर्न : सुपारी 

हिमांशू 

सुपारी या शब्दाला अनेक छटा आहेत. पाण्याला जसा स्वतःचा रंग नसतो आणि ज्या पदार्थात ते मिसळेल, त्या रंगाचं पाणी दिसतं, तसंच काहीसं सुपारीचं आहे. गुरुजींनी दिलेल्या पूजेच्या साहित्याच्या यादीत “सुपारी’ हा शब्द अत्यंत सोज्वळ आणि मंगल दिसतो. परंतु पेपरमध्ये अंडरवर्ल्डच्या कारवायांसंबंधीच्या बातमीत हाच शब्द किती खतरनाक वाटतो! खरं तर धार्मिक विधींमध्ये सुपारीला फार मोठा मान आहे. देवाच्या मूर्तीऐवजी सुपारीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. लग्नाची अक्षत देताना विडा नसला, तरी केवळ सुपारी दिली की काम होतं. सत्यनारायणाच्या पूजेला पत्नी सोबत नसेल, तर कमरेला सुपारी लावून पूजेला बसता येतं.

लग्नाच्या बैठकीत मुलगा निर्व्यसनी असल्याचं सांगताना “”मुलाला सुपारीच्या खांडाचंसुद्धा व्यसन नाही बरं का,” असं सांगितलं जातं. खरं तर सुपारी हे काही व्यसन मानलं जात नाही. तरी उदाहरणादाखल तिचंच नाव पुढं केलं जातं. बऱ्याच अंशी सुपारी हा शब्द पॉझिटिव्ह अर्थांनीच वापरला जात असला, तरी कुस्तीपटूंना तयार करताना त्यांच्या कानात सुपारी ठेवून वरून गुद्दा मारण्याची प्रथा आहे, असं आम्हाला लहानपणी सांगितलं गेलं होतं. खरं-खोटं माहीत नाही; पण तेवढं सोडलं तर सुपारी या शब्दाची भीती कधी वाटली नाही. अर्थात, एखाद्याची “सुपारी देणं’ हा गंभीर मामला आहे.

सुपारी घेऊन बोलणारे आणि लिहिणारे असतात, हेही आम्ही केवळ ऐकूनच आहोत. या शब्दाची ती रंगछटा प्रत्यक्षात पाहायला मिळालेली नाही. पानसुपारीच्या कार्यक्रमापुरताच आमचा सुपारीशी संबंध आला. सुपारीपासून बनवलेल्या पानमसाल्याची जाहिरात अभिनेते आणि क्रिकेटपटू करीत असले, तरी सुपारी खाणारा क्रिकेटपटूही आम्हाला भेटला नाही. आज मात्र सुपारीचा संबंध भलत्याच बाबतीत एका क्रिकेटपटूशी जोडला गेला आणि आम्ही नखशिखान्त हादरलो. कारण सुपारीचीसुद्धा “तस्करी’ होते, हे आम्हाला नवीन होतं.

सुपारी हा काही लपून-छपून विकण्याचा पदार्थ नव्हे. पण, तीच सुपारी जर कुजलेली, सडलेली असेल, तर मात्र चोरमार्गानंच विकावी लागणार! अशाच सडक्‍या सुपारीची तस्करी करणारं एक मोठं रॅकेट आहे आणि श्रीलंकेचा धडाकेबाज माजी फलंदाज सनथ जयसूर्या या रॅकेटशी संबंधित आहे, असा संशय व्यक्‍त झाला. नागपुरातल्या गोदामावर पडलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची सडलेली सुपारी जप्त करण्यात आली. एका व्यापाऱ्याला अटक झाली. त्याची चौकशी करताना त्यानं जयसूर्याचं नाव घेतलं. ज्याच्या नावात “जय’ आहे आणि “सूर्य’ही आहे, त्याच्या बाबतीत “हा सूर्य, हा जयद्रथ’ करण्याची वेळ यावी, हा दैवदुर्विलास होय. पण डायरेक्‍टर ऑफ रेव्हेन्यू इन्टेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी जयसूर्याची चौकशी केली, हे खरं!

क्रिकेटचा सामना पाहताना ज्यानं कधी आम्हाला मान खाली घालू दिली नाही (कारण तो फक्त उत्तुंग सिक्‍सरच मारायचा) तो जर खरोखर या रॅकेटचा भाग असेल, तर त्याला मात्र मान खाली घालावी लागेल. जयसूर्याबरोबर आणखीही दोन क्रिकेटपटू या रॅकेटमध्ये असल्याचा संशय आहे. क्रिकेटपटू अशा प्रकारे अडचणीत येणं क्‍लेषकारक आहेच. पण खरं सांगू का, “सोन्याची लंका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातून 25 टक्के दरात कुजकी सुपारी येणं अधिक क्‍लेषकारक आहे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)