#अबाऊट टर्न: सावर रे! 

– हिमांशू 
तोकड्या कपड्यांवरून आपल्याकडे कुठे ना कुठे वाद होतच असतात. संस्कृतीच्या जागरापासून गुन्ह्यांच्या धास्तीपर्यंत अनेक विषय तोकड्या कपड्यांवरून चर्चिले जातात. कोणीतरी कुठेतरी या विषयावरून वादग्रस्त वक्‍तव्य करतो आणि मग काहीजण त्याच्यावर तुटून पडतात. तोकडे कपडे घालणं समस्येचं मूळ आहे की बघणाऱ्याची दृष्टी, असाही वाद होतो. तोकडे कपडे ही बाहेरून आलेली संस्कृती असल्याचं सामान्यतः बोललं जातं. या पार्श्‍वभूमीवर भारतीयांच्या तोकड्या कपड्यांवर परदेशी नागरिकांनी आक्षेप घेतला तर केवढा धक्का बसेल ना? पण खरोखर तसं घडलंय. वास्तविक बाह्य जगात अत्यंत सभ्य नागरिक अशीच भारतीयांची ओळख आहे. आपल्या संस्कृतीकडे पाश्‍चात्य देशांकडून आदरानं पाहिलं जातं. परंतु कदाचित संस्कृतीच्या व्याख्येत मानसिकतेसारखे काही मुद्दे अंतर्भूत केले जात नसावेत. विशेषतः जेव्हा भारतीय लोक मौजमजेसाठी एकत्र जमतात किंवा एकत्रितपणे सहलीला जातात, तेव्हा त्यांना नेमकं काय होतं, यावर खरंतर संशोधनच झालं पाहिजे. ऐतिहासिक वास्तूंवर कोरलेली वेगवेगळी चिन्हं आणि आद्याक्षरं आपण प्रत्येक पर्यटनस्थळी पाहतो. अनेकांच्या प्रेमाला पर्यटनस्थळीच धुमारे फुटतात, त्याला काय करणार? आयफेल टॉवरवरही भारतीयांनी काही कोरल्याचं दिसून आलं होतं म्हणे! अनेक ठिकाणी सार्वजनिक वापरासाठीच्या वस्तूंची मोडतोड झाल्याचं पाहायला मिळतं, तर कुठं कमालीची अस्वच्छता दिसून येते.
सहलीला जायचं म्हणजे निसर्गाचा आस्वाद घ्यायचा, तिथली शांतता अनुभवायची, असं सामान्यतः मानलं जातं. परंतु आपल्याकडे निसर्गाची शांतता भंग करणारं पर्यटन हल्ली वाढलंय. भारतीयांचा असाच एक मोठा गट ऑस्ट्रेलियात क्रूजवर सुट्टीसाठी गेला होता. तब्बल 1300 जणांचा हा गट होता आणि तीन दिवस त्यांनी रॉयल कॅरिबियन समुद्रात तरंगणाऱ्या क्रूजवर असे काही कारनामे केले, की उर्वरित देशांचे पर्यटक पुरते वैतागले. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेले हे लोक एका तंबाखू कंपनीतील कर्मचारी असल्याचं पुढे आलंय. ही मंडळी क्रूजच्या डेकवर रोज रात्री पार्टी करीत असत. या पार्टीत काही बारबालांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि त्या अत्यंत तोकडे कपडे घालून नृत्य करायच्या, असं बाकीच्या पर्यटकांचं म्हणणं आहे.
या क्रूजची एकंदर प्रवासी क्षमता 3000 एवढी आहे. म्हणजे उर्वरित 1700 प्रवासी भारतीयांच्या लीलांनी हैराण झाले. डेकवर पार्टी सुरू असताना बार आणि बुफेवर भारतीय पर्यटक अक्षरशः तुटून पडत होते, असं सांगितलं जातंय. बारबालांशी जे अभद्र वर्तन हे पर्यटक करीत होते, त्याचं चित्रीकरण मोबाइलमध्ये करून घेत होते, असंही इतर पर्यटकांचं म्हणणं आहे. त्यांनी अखेर ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांना माहिती दिली आणि या हंगाम्याचं बिंग फुटलं.
या अतिउत्साही भारतीय पर्यटकांमुळं केवळ इतर पर्यटकांनाच त्रास झाला असं नाही, तर क्रूज कंपनीलाही नुकसान सहन करावं लागलं, असं सांगितलं जातंय. कारण तक्रार करणाऱ्या पर्यटकांचे सहलीचे पैसे क्रूज कंपनीला परत द्यावे लागले. खरं तर आपण जगातली सहावी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहोत. जगातली आपली प्रतिमा दिवसेंदिवस मोठी होत चाललीय. जगातल्या अनेक देशांचे उपग्रह आपण अंतरिक्षात सोडतो आहोत. अशा उत्कर्षाच्या काळात देशाबाहेर स्वतःला सांभाळायला हवं, इतकंच!
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)