#अबाऊट टर्न:  संसार 

– हिमांशू 
माणूस संसाराच्या चक्रात एकदा अडकला की अडकतच जातो आणि जो या चक्रात अडकत नाही, तो “जगाचा संसार’ करतो असं आपल्याकडे मानलं जातं. किंबहुना, जगाचा संसार ज्यांना करायचा असतो, ते व्यक्तिगत संसाराच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत, असंही पूर्वीपासून म्हटलं जातं. या पार्श्‍वभूमीवर, “जो स्वतःच संसार करत नाही, त्याला जगाचा संसार काय समजणार,’ अशी फिलॉसॉफी मांडली गेली, तर अनेकांना धक्का बसेल. पण काही अंशी ते खरंही आहे.
“जगाचा संसार करणं’ ही संकल्पनाही काळाच्या ओघात बदलली आहे. हल्लीच्या काळात त्याला समाजकारण किंवा राजकारण (किंवा दोन्ही) म्हणतात. अनेकजण आपल्या स्वतःच्या कारकीर्दीची “सामाजिक आणि राजकीय’ अशी विभागणीही करतात. समाजकारण आणि राजकारणाची टक्केवारी वगैरे सांगतात. ही टक्केवारी ही मंडळी कशी काय काढतात, हा प्रश्‍नच आहे! खरं तर अशी टक्केवारी काढणं दोन्ही “कारणां’वर अनेक कारणांनी अन्यायकारक आहे. राजकारणाची टक्केवारी बहुतांश वेळा कमी सांगितली जाते. (उदा ः 90 टक्के समाजकारण, 10 टक्के राजकारण) राजकारण एकंदरीत वाईटच, असं गृहित धरूनच अशी वक्तव्यं केली जातात. मग ही मंडळी 10 टक्के तरी राजकारण करतातच कशाला, हाही प्रश्‍न येतो. शिवाय, 90 टक्के समाजकारणाला 10 टक्के राजकारणाची बाधा झाल्यासारखं वाटतं.
असो! मुख्य विषय जगाच्या संसाराचा आहे आणि राज्यकर्त्यांना तो करावा लागतो. “ज्या मंडळींनी संसारावर पाणी सोडलंय, त्यांना संसारी लोकांच्या समस्या समजणारच नाहीत’, असा तिरकस टोमणा इंदापूरच्या सभेत अजित पवारांनी लगावला. त्यांचा रोख अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. अजितदादा म्हणाले की, “जो संसार करत नाही, त्याला घरी गेल्यावर फक्त आरामच करायचा असतो. जो राजकारणी माणूस संसार करतो, त्याला घरातही लक्ष द्यावं लागतं. गॅस संपला, पेट्रोल महागलं, महिन्याचे पैसे 20 दिवसांतच संपले, हे आमच्यासारख्या संसारी माणसांना घरी गेल्यावर ऐकून घ्यावं लागतं,’ असं अजितदादा म्हणाले आणि सभेत हशा पिकला. अशा प्रश्‍नांची झळ पंतप्रधानांना पोहोचण्याचं कारणच नाही आणि त्यामुळंच ते संसारी माणसांना न्याय देऊ शकणार नाहीत, असं लॉजिक दादांनी मांडलं.
ज्यांनी संसार केला, त्यांनाच महागाईच्या कळा जाणवू शकतात, हे अजितदादांचं म्हणणं अगदी रास्त आहे; पण “आमची अवस्था पांडू हवालदार किंवा सोंगाड्यासारखी झालीय,’ हे त्यांचं विधान पटायला आणि पचायला जरा जडच! विनोद म्हणून ठीक आहे; पण राजकारणी माणसाला, मग भले तो विरोधी पक्षातला का असेना, घरी गेल्यावर या समस्यांना सामोरं जावं लागतं, हे कुणाला पटणारं नाही.
अर्थात, भाषणाची म्हणून एक शैली असते. “देखिये, यह भाषण देने का तरीका है, एक जुमला है,’ हे वाक्‍य सर्वांना आठवत असेलच. प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यावर 15 लाख रुपये वर्ग करण्याच्या मोदींच्या आश्‍वासनाविषयी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भर मुलाखतीत केलेलं हे वक्तव्य. भाषण आणि वास्तव यांची फारकत कधीच झाली आहे. तरीही पाच राज्यांमधल्या निवडणुका कालच जाहीर झाल्यामुळं आपल्याला भाषणं ऐकावीच लागणार. प्रश्‍न आहे संसारी माणसाला न्याय देण्याचा!
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)