अबाऊट टर्न: श्राद्ध 

– हिमांशू 
वाराणसी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. (लगेच कान टवकारू नका. आम्ही “प्रसिद्ध’ म्हणालो; “चर्चेत’ नव्हे. प्रत्येक गोष्ट थेट राजकारणाशी जोडणारा “सोशल मीडियाप्रणीत पूर्वग्रह’ योग्य नव्हे!) तीर्थक्षेत्र म्हणून देवदर्शनाला जाणाऱ्यांची जशी वाराणसीत गर्दी असते, त्याचप्रमाणं पिंडदान आणि श्राद्ध घालायला जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. गंगेच्या घाटावर श्राद्ध घातलं, तर आपली सेवा थेट पितरांपर्यंत पोहोचते, असं मानलं जातं. दिवंगत व्यक्‍तीच्या आत्म्याला शांती लाभावी, हा श्राद्धामागचा हेतू असतो.
पितरांना शांत केल्यामुळं स्वतःलाही शांती लाभते. एक कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान लाभतं. परंतु जिवंत व्यक्‍तीचं श्राद्ध घालून स्वतःसाठी मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर..? आश्‍चर्य वाटेल खरं; पण एक ना दोन, तब्बल 160 जणांनी जिवंत व्यक्‍तीचं श्राद्ध घातल्याची घटना वाराणसीत नुकतीच घडली. हे सगळे पत्नीपीडित पती आहेत आणि आपल्या घटस्फोटित जिवंत पत्नीच्या नावानं त्यांनी श्राद्ध घातलं. खरं तर पत्नीचा एवढा धसका या मंडळींनी घेतला असेल तर घटस्फोट घेतल्याबरोबर त्यांना शांती मिळणं अपेक्षित होतं; परंतु श्राद्धाबरोबरच “पिशाच्यिनी मुक्ती’ हा विधीही या मंडळींनी केला. घटस्फोट घेतला तरी वाईट आठवणी पिच्छा सोडत नाहीत. त्यापासून मुक्‍ती मिळवण्यासाठी हा विधी केला, असं त्यांचं म्हणणं आहे.
वाराणसीतला मणिकर्णिका घाट अशा तांत्रिक पूजांसाठी प्रसिद्ध असल्याचं सांगितलं जातं. दुःखद आठवणी पुसल्या जाव्यात, यासाठीचे विधी या घाटावर केले जातात. या मंडळींच्या लग्नाच्या आठवणी इतक्‍या कटू आहेत, की “स्त्रीवादाचा राक्षस’ वगैरे शब्दप्रयोग ते करू लागलेत. सामान्यतः सुखासाठी, आनंदासाठी, स्थैर्यासाठी, मानसिक आधारासाठी लग्न केलं जातं, हा “नियम’ असेल, तर ही प्रकरणं “अपवाद’ ठरतात. अपवाद हा नियमापेक्षा मोठा कधीच असत नाही; किंबहुना तसा तो असू नये, याची दक्षता घेतली जाते.
हुंडाबंदीच्या कायद्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग केला जातो, अशी या मंडळींची तक्रार आहे. या बाबतीत अपवाद नियमापेक्षा मोठा होऊ नये म्हणून काही निर्णय घेतले गेलेत. हुंडाबंदी कायद्यांतर्गत आलेल्या तक्रारींची शहानिशा करूनच अटकेची कारवाई करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षीच दिलेत. अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती नेमली जावी आणि समितीनं प्रकरणाची शहानिशा केल्यानंतरच पुढील कारवाई करावी, असे हे निर्देश आहेत. जिवंत पत्नीचं श्राद्ध घालणाऱ्यांच्या “आठवणी’ कदाचित त्यापूर्वीच्या असाव्यात. त्या पुसल्या जाव्यात अशी सदिच्छा जरूर व्यक्त करता येईल; पण जे आपण मुद्दाम विसरण्याचा प्रयत्न करतो, तेच सतत आठवत राहतं, ही मानसशास्त्रीय प्रक्रियाही या मंडळींनी लक्षात घेतलेली बरी!
महिला आयोगाप्रमाणं पुरुष आयोग नेमावा, अशी मागणी गेल्या महिन्यात लोकसभेत झाली, तेव्हा सगळे हसले होते. अर्थात, हसणं चुकीचं असलं, तरी नियमापेक्षा अपवाद खूपच लहान आहे, याचंच ते द्योतक. सगळ्यांच्या आधी उठायचं, सगळ्यात शेवटी झोपायचं, सगळ्यांनी खाल्ल्यावर उरलेलं खायचं, हुंड्यासाठी मार खायचा, हमसून-हमसून बापाला फोन करायचा, असह्य झाल्यास विहीर जवळ करायची, या फेऱ्यातून जाणाऱ्या बायकांची संख्याच आजही जास्त आहे. अशा अभागिनींच्या आत्म्याच्या शांतीसाठीही श्राद्ध घातलं पाहिजे… कुणीतरी… कधीतरी!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)