अबाऊट टर्न: “शुल्क’काष्ठ! 

हिमांशू 

नवीन घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू केलं की सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडावा, असं अनेकांना वाटतं. परंतु ही इच्छा सफल होत नाही आणि झालीच, तरी सापडलेलं “धन’ सरकारजमा होतं. पूर्वीच्या काळी बॅंका नव्हत्या, तेव्हा पैसा, दागिने आणि महागड्या चीजवस्तू अशा प्रकारे तळघरात पुरून ठेवण्याची शक्‍कल अनेक धनिकांनी शोधून काढली होती. अशा धनाचं संरक्षण एखादा नागोबा करतो, अशा अख्यायिकाही प्रसिद्ध होत असत आणि अशा अख्यायिकांनी चित्रपटांना विषयही पुरवले. सध्याच्या काळात कुणी अशा प्रकारे पैसे पुरून ठेवत नाही; परंतु लवकरच तशी प्रथा पुन्हा रूढ होईल, अशी साधार भीती वाटू लागलीय. मोबाइल फोन ही वस्तू जेव्हा नवीन होती, तेव्हा फोन करणाऱ्याबरोबरच ज्याला फोन येतो, त्यालाही बिल द्यावं लागत असे. काही दिवसांनी ही गोष्ट कुणाला पटणारसुद्धा नाही.

आजच्या फ्री-डेटाच्या दिवसांतच ती कुणाला पटेनाशी झाली आहे. त्याचप्रमाणं बॅंकेतून पैसे काढण्यासाठी आणि बॅंकेत पैसे भरण्यासाठीही शुल्क द्यावं लागेल, हे आजघडीला तरी कुणाला पटणार नाही. परंतु आगामी काळात ते शक्‍य आहे आणि तसं झालं तर पैसे बॅंकेत ठेवण्याऐवजी गाडग्यात भरून पुरून ठेवण्याचा मार्ग लोकांना अधिक जवळचा वाटेल. कारण पैसे भरण्याचंसुद्धा शुल्क आता बॅंक कापून घेणार आहे. खरं तर बॅंकेत, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेत पैसे ठेवायला आजच कुणी फारसं इच्छुक दिसत नाही. एखाद्या मेहुल चोक्‍सीनं किंवा नीरव मोदीनं आपल्या पैशावर हात साफ केला तर काय करायचं, ही धास्ती प्रत्येकाला आहेच. शिवाय, बॅंकांच्या बुडित कर्जाचे म्हणजे एनपीएचे फुगत चाललेले आकडेही बॅंकेत बचत करू पाहणाऱ्यांना धडकी भरवणारे आहेत.

एनपीए वसूल होत नाही म्हणून बॅंका अनेक सेवांवर शुल्क लावू लागल्या. महिन्याकाठी एटीएममधले ठराविक व्यवहारच निःशुल्क, बाकीचे सशुल्क, असं सुरू झालं. नंतर ठराविक मर्यादेपेक्षा कमी बॅलन्स खात्यात असेल, तर बॅंकांनी संबंधित खातेदाराकडून दंड वसूल करायला सुरुवात केली. या दंडापोटी बॅंकांनी केलेली कमाई हा चर्चेचा आणि टीकेचाही विषय झाला. आता जर बॅंकेत पैसे भरण्यासाठीही शुल्क द्यावं लागलं, तर धाय मोकलून रडण्याव्यतिरिक्त खातेदारांच्या हाती काहीच उरणार नाही. ही गोष्ट अशक्‍य वाटत असली, तरी तसे संकेत मिळालेत. बॅंकांकडून सेवाकरापोटी सरकारला 40 हजार कोटी रुपये येणेबाकी आहे. आधीच अडचणीत आलेल्या बॅंका एवढे पैसे कुठून भरणार? अर्थ मंत्रालय आणि बॅंकांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या अयशस्वी झाल्यानंतर बॅंकांनी सर्व सेवांवर शुल्क लावण्याचा इशारा दिलाय. थोडक्‍यात, “व्याज नको; पण शुल्क आवर’ असं म्हणायची वेळ खातेदारांवर लवकरच येऊ शकते.

व्याजदर मुळात रसातळाला गेलेच आहेत; त्यात सर्व निःशुल्क सेवा सशुल्क झाल्यास बॅंकेत पैसे ठेवण्यात काही अर्थच उरणार नाही. शिवाय, निम्मी एटीएम मार्चपर्यंत बंद होणार,अशीही बातमी आलीय. नोटाबंदीच्या काळात झालेला तोटा एटीएम कंपन्यांना भरून काढता आलेला नाही, तोच नवे नियम, नवा खर्च उद्‌भवल्यामुळं ही वेळ आलीय. त्यातच जनधनसह सगळ्यावर शुल्क लावलं तर आनंदीआनंदच!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)