#अबाऊट टर्न:  शिक्षा 

– हिमांशू
हातात सत्ता आली की आपण सर्वशक्‍तिमान झालो असं वाटू लागतं. स्वर्ग दोन बोटं उरल्याचा भास होतो आणि काहीही करण्यास, काहीही बोलण्यास आपण मुक्त आहोत, अशी धारणा बनते. सत्तेचा कंठ फुटलेली मंडळी कसं वाट्टेल ते बोलतात, याचा प्रत्यय आपण वारंवार घेतच असतो. बोलण्यातला हा बेभानपणा कृतीतही उतरतो आणि सत्तेची खुर्ची आपल्याला कायमस्वरूपी मिळाली आहे, असं मनापासून वाटू लागतं.
कायद्याचं भय राहत नाही आणि कायद्यानं दोषी ठरवल्यास जी परिस्थिती उद्‌भवते, त्याची कल्पना करण्याची शक्‍तीही संपते. म्हणूनच अशा महनीय व्यक्‍ती जेव्हा कायद्याच्या कचाट्यात अडकतात, तेव्हा तुरुंगाऐवजी हॉस्पिटलमध्ये जाणं अधिक पसंत करतात. असा प्रसंग उद्‌भवेपर्यंत ठणठणीत असणाऱ्या व्यक्‍तींना अचानक हृदयाचा, फुफ्फुसाचा, मूत्रपिंडाचा वगैरे त्रास होऊ लागतो. हे आजार अचानक कसे काय डोकं वर काढतात, अशा विचारानं सामान्य माणूस बुचकळ्यात पडतो आणि महनीय व्यक्‍ती कोर्टाच्या परवानगीनं हॉस्पिटलात उपचार घेऊ लागते. परंतु ज्या जीवनशैलीची सवय या व्यक्‍तींना जडलेली असते, ती तुरुंगातच नव्हे तर हॉस्पिटलातही त्यांना मिळत नाही आणि तिथंही कुरकूर सुरू होते. चारा घोटाळ्यात शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादवांचं सध्या असंच झालंय. त्यांना रुग्णालयातही चैन पडत नाहीये आणि कुरबुरी सुरू झाल्यात.
रांचीतल्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधल्या ज्या वॉर्डात लालूंना सध्या ठेवलंय, तो त्यांना बदलून हवाय. कारण काय? तर तिथं डासांचा उपद्रव जास्त आहे. राममनोहर लोहियांचा वारसा दाखवून देण्यासाठी ज्या लालूप्रसादांनी टीव्ही चॅनेल्सच्या प्रतिनिधींना म्हशींच्या गोठ्यात बोलावून मुलाखती दिल्या, त्यांना हॉस्पिटलमधल्या डासांचा आणि दुर्गंधीचा त्रास होतो, हे काहीसं विचित्र वाटत असलं, तरी खरं आहे. याखेरीज त्या वॉर्डाजवळ रात्रीच्या वेळी कुत्रीही खूप भुंकतात. लालूप्रसादांना झोप लागत नाही. त्यामुळं या निःशुल्क वॉर्डातून सशुल्क वॉर्डात आपल्याला हलवावं, असा अर्ज लालूंनी दाखल केलाय.
सध्याच्या वॉर्डात जे स्वच्छतागृह आहे, तिथला पाइप तुंबल्यामुळं निर्माण झालेली दुर्गंधी लालूंना सहन होत नाहीये. अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळं डासांची संख्या वाढतेय आणि त्यामुळं डासांशी संबंधित आजार फैलावण्याची भीती त्यांना वाटतेय. वॉर्डात लालू असल्यामुळं त्यांची झोपमोड होऊ देता कामा नये, हे बाहेरच्या मोकाट कुत्र्यांना समजत नाहीये. कारण जवळच शवविच्छेदन कक्ष आहे. अर्थातच त्याच्या अवतीभोवती कुत्री जमा होणारच. परंतु कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, डासांचा नायनाट करावा, हॉस्पिटलात स्वच्छता राखावी, अशा मागण्या लालूंनी केल्या असत्या, तर इतर रुग्णांनाही लाभ झाला नसता का? त्यापेक्षा लालूंचाच वॉर्ड बदलणं अधिक सोयिस्कर!
देशातल्या हॉस्पिटलांची परिस्थिती सुधारावी, असं किमान तिथं दाखल झाल्यावर तरी लोकप्रतिनिधींना वाटावं, ही अपेक्षा व्यर्थच! दिल्लीच्या बाबू जगजीवन राम हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्‍टरनंसुद्धा लालूंचाच मार्ग नाही का स्वीकारला! पिण्यासाठी पाणी नाही, ओपीडीमध्ये डॉक्‍टरांनाच बसायला खुर्ची नाही, व्यवस्थापन तक्रारींकडे लक्ष देत नाही, या कारणांमुळं अंकित ओम नावाच्या डॉक्‍टरनं चक्क राजीनामा फेकला. जिथं डॉक्‍टरांचाच जीव घुसमटतो, तिथं व्हीआयपी पेशंटची काय कथा! तात्पर्य, तुरुंग आणि हॉस्पिटल सारखंच, हे व्हीआयपींनी ओळखलेलं बरं!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)