#अबाऊट टर्न: वेळ-काळ 

हिमांशू 

शेअरबाजारात काल अचानक हाहाकार उडाला आणि एक हजार अंशांनी निर्देशांक गडगडला. गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी अवघ्या पाच मिनिटांत बुडाले. या गुंतवणूकदारांनी कदाचित योग्य सल्ला घेतला नसावा. छे, छे, गुंतवणूक सल्लागाराचा नव्हे, ज्योतिषाचा! आपल्या ग्रहदशेचा जीवनाच्या दिशेवर आणि दशेवर परिणाम होत असतो, हे ओळखायला नको का? आपल्या शेजारच्याच राज्यात पाहा ना, मुख्यमंत्र्यांपासून बसचालकापर्यंत सगळेजण ज्योतिषाचा सल्ला कसा प्रमाण मानतात!

-Ads-

नेतेमंडळी आपल्याला जो संस्कार देतात, त्यानुसार जनतेनं चालायला नको का? आपल्याकडे पक्षाच्या नावात पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, समाजवाद, राष्ट्रवाद असे अनेक शब्द येतात; पण म्हणून लगेच ते पाळायचे असतात का? पाळायचा असतो फक्‍त ज्योतिषाचा सल्ला! एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री. त्यांचं आणि ज्योतिषाचं नातं बरंच चर्चेत आहे म्हणे! परंतु मंगळवारी त्यांनी जेव्हा ज्योतिषाचा सल्ला मानून चक्क सरकारी कार्यक्रम रद्द केला, तेव्हा उगाचच सगळ्यांनी भुवया उंचावल्या. “दुपारपर्यंत घरातून बाहेर पडायचं नाही,’ असं ज्योतिषानं कुमारस्वामींना बजावलं होतं. जनता दल (सेक्‍युलर) नावाच्या पक्षाचे हे नेते ज्योतिषाचं ऐकून मुकाट घरात बसले आणि सकाळचे सगळे कार्यक्रम रद्द केले. पक्षाच्या नावातच “सेक्‍युलर’ शब्द असल्यामुळं मीडिया आणि विरोधकांनी जरा जास्तच चर्चा सुरू केली.

स्पष्टीकरण द्यायची वेळ पक्षावर आली, तेव्हा तर कहरच झाला. पक्षाच्या मते, कुमारस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय दर अमावस्येला पूजा करतात. सोमवारी अमावस्या होती. ती (अमावस्या की पूजा, हे कळू शकलं नाही) सकाळपर्यंत चालली असावी आणि म्हणून मंगळवारचे सकाळचे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी रद्द केले असावेत, असं स्पष्टीकरण दिलं गेलं. एकूण काय, तर मंगळवारच्या सकाळचा सरकारी कार्यक्रम अमावस्येमुळं रद्द झाला किंवा ज्योतिषामुळं, एवढे दोनच ऑप्शन्स उरलेत. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ज्योतिष आणि वेळ-काळ बघायला सुरुवात केल्यावर जनताजनार्दन काय करणार? बंगळुरूमधल्या एका बसचालकानं त्यांचीच री ओढली आणि बस सव्वा तास उशिरा डेपोतून बाहेर काढली.

प्रवासी खोळंबले हे खरं; पण किमान जिवंत तरी राहिले ना! बस वेळेवर सोडली, तर अपघात होईल आणि किमान 15 प्रवाशांचा जीव जाईल, असं ज्योतिषानं चालकाला सांगितलं होतं म्हणे! अत्यंत अपवित्र असा राहूकाळ संपल्यानंतरच बस डेपोतून बाहेर काढावी, हा सल्ला मान्य करून योगेश गौडा या चालक महाशयांनी तेवढा वेळ स्टिअरिंगपासून दूर राहणंच पसंत केलं. प्रवाशांनी अर्थातच ही बाब अधिकाऱ्यांपर्यंत नेली. अधिकाऱ्यांनी चालकाला बोलावलं, तेव्हा तो म्हणाला, “”माझ्यासाठी बस वेळेवर सोडण्यापेक्षा प्रवाशांचे प्राण वाचवणं महत्त्वाचं!”

खरं तर अमावस्येला किंवा राहूकाळासह सर्व प्रकारच्या अनिष्ट काळात सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणा बंदच ठेवायला हव्यात! उगाच रिस्क कशाला? निवडणुका जवळ आल्या की आपले नेते ज्योतिषाला गाठणार आणि त्याच्याकडून मुहूर्त काढून फॉर्म भरायला जाणार. फॉर्मसोबतच्या ऍफिडेव्हिटमध्ये जे संपत्तीचं वर्णन त्यांनी लिहिलेलं असतं, ती कमावण्यासाठी मात्र मुहूर्त आणि शुभ-अशुभ काळ पाहावा लागत नाही. असल्या गोष्टी त्रासदायक ठरत असतील, तर आपणच टीव्ही लावताना किंवा पेपर उघडताना मुहूर्त पाहिलेला बरा!

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)