अबाऊट टर्न: वयचोरी

हिमांशू

लहानपणी शाळेत असे अनेक मित्र होते, ज्यांची जन्मतारीख एक असायची आणि वाढदिवस मात्र वेगळ्याच तारखेला साजरा व्हायचा. सुरुवातीला काही दिवस आम्हाला या गोष्टीचं नवल वाटत असे. ही पोरं दोनदा कशी काय जन्माला येतात, असा प्रश्‍न पडायचा. पण नंतर लक्षात आलं की, रेकॉर्डला लावलेली तारीख ही खरी जन्मतारीख नव्हेच!
शाळेत प्रवेश घेताना “ऍडजस्टमेन्ट’ म्हणून तारीख बदलली जायची. काही नियम विचित्र होते आणि त्यामुळं मुलांचं वय चार-सहा महिन्यांनी कमी-जास्त करणं पालकांना भागच पडायचं.

अर्थात, चार-सहा महिने वय कमी-जास्त करणं ठीक आहे; पण एखाद्यानं आपलं वय वीस वर्षांनी कमी करून मागितलं तर काय करायचं? मुळात वय कमी करण्याची आवश्‍यकताच का वाटते, असा प्रश्‍न पडेल ना? सामान्यतः सिनेमातले तारे-तारका पूर्वी आपलं खरं वय लपवायचे. त्यांचं पाहून मुलींमध्ये वय लपवायची फॅशन आली. या लपवालपवीसाठी “वय चोरणं’ हा वाक्‌प्रचारही रूढ झाला. कालान्तरानं अनेक ठिकाणी जन्मतारीख सार्वजनिक करण्याची गरज भासू लागली आणि सिनेतारकांसह कुणालाच वय लपवता येईना. हल्ली सगळ्यांनाच वाढदिवसाला न सांगता शेकडो मेसेज येतात; कारण सोशल मीडियावर आपली तारीख ठळठळीतपणे सगळ्यांना दिसत असते. पण त्यामुळं वय कमी करून घेण्यासाठी कुणी थेट कोर्टात जाईल असं वाटतं का?

अनेकजण कोर्टात ऍफिडेव्हिट करून नाव बदलतात. दैनिकांमध्ये “नावात बदल’ या सदराखाली छोट्या जाहिरातीही पाहायला मिळतात. सामान्यतः धर्म, जात बदलणं किंवा नाकारणं हे नाव बदलण्यामागचं कारण असतं. पण जेव्हा एखादा माणूस वीस वर्षांनी आपलं वय कमी करावं म्हणून कोर्टात जातो, तेव्हा बोटं तोंडात जातात. त्यातच तो पुरुष असेल, तर अधिकच आश्‍चर्यकारक, हो ना! डेन्मार्कमधल्या एमिल रॅटलबॅंड नावाच्या आजोबांनी तसा अर्ज स्थानिक कोर्टात केला होता. त्यांचं सध्याचं वय आहे 69 वर्षं आणि त्यांना ते वीस वर्षांनी कमी करून हवंय.
यामागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. परंतु ते स्वतः मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून काम करतात. म्हणजेच, लोकांना प्रेरित देणं हे त्यांचं काम आहे. या वयात खरं तर इतरांनी प्रेरणा दिल्याशिवाय माणसं काहीच करत नाहीत. अनेकजण तर निवृत्तीची वाट बघत असतात.

काहीजण तीही न पाहता काही वर्षं आधीच निवृत्ती घेऊन टाकतात. अशा अकाली निवृत्तीमागे एखादं मनाजोगं काम करण्याचा हेतू असेल तर ठीक; पण बऱ्याच जणांची निवृत्ती आरामासाठीच असते. या पार्श्‍वभूमीवर हे मोटिव्हेशनल स्पीकर असलेले आजोबा कोर्टालाच वय कमी करून मागतात, हेच मोटिव्हेशनल आहे!

वय बदलून देणारा कायदा काही कोर्टाला सापडेना. त्यामुळं रॅटलबॅंड यांना वय कमी करून मिळणार नाही, असा निकाल देण्यात आला. पण जाता-जाता कोर्टानं एक मस्त टिप्पणी केली.
न्यायाधीश म्हणाले, “आम्ही तुमची याचिका स्वीकारू शकत नाही. परंतु तुम्ही स्वतःला तरुण म्हटलं, तर त्याला कोर्टाची हरकत असणार नाही.’

वरवर पाहता ही संपूर्ण घटना एखाद्या हलक्‍याफुलक्‍या विनोदासारखी भासते खरी; पण शोधायचंच ठरवलं तर या घटनेत अनेक अर्थ लपून बसलेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)