अबाऊट टर्न: वंदन! 

हिमांशू 

“अरे देवा, तुझी मुले अशी का रे भांडतात… कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहा हात…’ प्रत्यक्ष देवानं देवाला केलेला हा सवाल! शिवाच्या पावलावर आणि शवाच्या मस्तकावर वाहिल्या गेलेल्या दोन फुलांची कथा लिहिणारा हा देव म्हणजे गीतकार, संगीतकार यशवंत देव. त्यांनी लिहिलेल्या गीतांमध्ये देवाला केलेले सवाल दिसतात तशीच देवाची “कोटी कोटी रूपे’ही दिसतात. सूर्य, चंद्र आणि कोट्यवधी ताऱ्यांमध्ये देव पाहणारा हा देव वयाच्या 91 व्या वर्षी देवाघरी गेला. “आयुष्यात खूप चौकटी पाहिल्या’ असं लिहून ठेवणारा हा संवेदनशील कवी स्वतः मात्र चौकटबद्ध जीवन जगला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ असे शब्द लिहिताना भावनाकुल होण्याच्या जमान्यातला हा कवी ऑनलाइन लाइफ पार्टनर शोधण्याच्या आणि सोशल मीडियावरून प्रेम करण्याच्या जमान्यातही तितकाच ताजातवाना वाटतो, तो त्याच्या साध्यासुध्या परंतु प्रभावी शब्दांमुळं. सतारवादक म्हणून संगीतातील कारकिर्दीला सुरुवात करणारा हा देव “यशवंत’ झाला; पण यशामुळं हुरळून मात्र कधीच गेला नाही. म्हणूनच हा देवमाणूस सदैव वंदनीय ठरला. गीतकार आणि संगीतकार म्हणून अमाप प्रसिद्धी आणि यश मिळवूनसुद्धा यशवंत देव मृत्यू येईपर्यंत भाड्याच्या घरात राहिले, हे बऱ्याच जणांना माहीतही नसावं. त्यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी ही बाब अनेकांना समजली असेल. कारण…
देवमाणूस गेला आणि “वंदन’ नावाच्या ज्या इमारतीत त्याचं वास्तव्य होतं, त्यातलं देवपणही त्यांच्यासोबतच गेलं. घरमालकानं हे घर रिकामं करण्याची नोटीस यशवंत देव यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी घराच्या दारावर चिकटवली. यशवंत देव यांच्या अस्थी जिथं बांधल्या होत्या, त्याच दरवाज्यावर! “असेन मी, नसेन मी… तरी असेल गीत हे,’ असं आत्मविश्‍वासानं सांगून देव गेले; पण ते नसताना त्यांचे जे शब्द आणि स्वर मागे उरले, त्यांना इतक्‍या लवकर असंवेदनशीलता स्पर्श करेल असं कुणाला वाटलं नव्हतं. स्वाभाविकच या नोटिशीबद्दल संताप व्यक्त होतोय. जी जागा “देवाला केलेलं वंदन’ म्हणून जपून ठेवावी, ती रिकामी करण्याची नोटीस… दुसऱ्याच दिवशी? यशवंत देव यांच्या पत्नीनं हे घर पागडी पद्धतीनं घेतलं होतं. तब्बल पंच्याहत्तर वर्षं या घरात देवांचा वास होता. तानपुऱ्याच्या तारा इथं अखंड छेडल्या गेल्या. अनेक अजरामर गीतांचे बोल इथं लिहिले गेले. असंख्य गीतं याच जागी स्वरसाजानं नटली.

प्रीतीच्या फुलाला “नको जाऊ कोमेजून’ अशा शब्दांत केलेली आळवणी असेल किंवा जगण्यावर “शतदा प्रेम करावे’ असा सकारात्मक संदेश असेल, या गाण्यांचे सूर सर्वप्रथम याच घरात सुगंधासारखे दरवळले असणार; पण…
जन्मावर आणि जगण्यावर प्रेम करण्याचा सल्ला हल्ली किती जणांना रुचतो? “भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ ज्या घरात वर्षानुवर्षं सुखानं नांदली, त्या घरातून राजा निघून गेल्यावर राज्य ताब्यात घेण्याची घाईच अधिक दिसावी, हा कशाचा पराभव? “जीवनात ही घडी अशीच राहू दे’ असं सांगून गेलेल्या संगीतकाराचा नक्कीच नाही. हा पराभव आहे देवघरातला देवही ओळखता न येणाऱ्या काळाचा! “वंदन’ नावाच्या इमारतीतून निघून गेलेल्या देवाला “वंदन’ करून विसरायला लावणाऱ्या प्रदूषणग्रस्त संवेदनांचा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)