अबाऊट टर्न: लगीनसराई

हिमांशू

आणखी कुण्या सेलिब्रिटीघरचं लग्न ठरलंय का? सेलिब्रिटी सतत डोळ्यांपुढं असल्याखेरीज आम्हाला करमतच नाही हल्ली. लालबागच्या राजाला नवस बोलायला किंवा फेडायला आलेल्या सेलिब्रिटींचं दर्शन घडलं, की मगच आम्हाला आमचा नवस पूर्ण झाल्यासारखं वाटतं. गणपती उत्सवाच्या आधी गोविंदा आणि नंतर नवरात्रोत्सवाचे दिवससुद्धा आमच्या दृष्टीनं सेलिब्रिटींच्या दर्शनाचे म्हणूनच महत्त्वाचे. दिवाळीसुद्धा आपण स्वतः कशी साजरी करायची, याची आम्हाला चिंता नसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणता सेलिब्रिटी ती कशी साजरी करतो, कुठं शॉपिंग करतो, याचं ज्ञान अधिक महत्त्वाचं वाटतं. पूर्वी आम्ही अनुकरणप्रिय तरी होतो. म्हणजे, सेलिब्रिटींसारखे कपडे वगैरे शिवायचो, त्यांच्या स्टाइल आत्मसात करू पाहायचो. आता त्याचीदेखील गरज उरलेली नाही. उलट आता त्यांच्यात आणि आमच्यात जेवढं जास्त अंतर असेल, तितका आमचा मनोरंजनाचा परीघ विस्तारतो. सेलिब्रिटीही आता उगीचच आमच्यासारखं वागण्याचा निष्फळ प्रयत्न करत नाहीत. कारण आम्ही अभिनेते नसलो तरी तेवढा अभिनय आम्हाला कळू लागलाय, हे सेलिब्रिटींनी ओळखलंय. गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत अशा प्रकारे सेलिब्रिटींचं सेलिब्रेशन डोळे भरून पाहिल्यानंतर लग्नाचा सीझन सुरू होतो. पण नात्यागोत्यातल्या लग्नांपेक्षा सेलिब्रिटींची लग्नं अधिक जवळची वाटतात… दूर परदेशात झाली तरी!

कुणाचा साखरपुडा कुठं झाला, कुणाचं लग्न इटलीत झालं, कुणाचं राजस्थानच्या राजवाड्यात झालं, कुणाच्या लग्नात कोणकोण पाहुणे आले होते, कुणी सगळ्यांना चकवून एकान्तात जाऊन लग्न केलं आणि नंतर अचानक जाहीर केलं, ही माहिती आम्हाला अत्यंत महत्त्वाची. विरुष्का, सैफिना, दीपवीर असे जोडशब्द उच्चारायला खूप मजा वाटते. अशा जोड्या लावता-लावता आता पुढचा नंबर कुणाचा, असा विचार सुरू असतानाच अशा एका लग्नाचा विषय समोर आला, की आणखी महिनाभराचा प्रश्‍नच मिटला. अत्यंत वजनदार घरातलं हे लग्न 27 जानेवारीला असल्यामुळं बरेच दिवस चर्चा करता येणार, या जाणिवेनं आम्ही आनंदलो आहोत.

अंबानींच्या घरातल्या लग्नाचा डोळे दिपवणारा झगमगाट पाहिल्यास त्या तुलनेत हे लग्न फारच साधेपणानं होणार आहे हे खरं. पण भपका नसला, तरी दणका नक्कीच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं लग्न आता महिनाभर गाजणार आहे. देवासमोर पत्रिका ठेवल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत लग्नाची औपचारिक घोषणा केली, तीच मुळात गाजली. कारण, पत्रकारांनी नेमकं विचारलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाला बोलावणार का? यावर, त्यांचा लग्न वगैरे गोष्टींवर विश्‍वास आहे का, असं उत्तर राज यांनी दिलं, तिथंच हे लग्न गाजणार, याची निश्‍चिती झाली.

अमित ठाकरेंच्या लग्नाला पंतप्रधानांना आमंत्रण नाही, असा मथळा देऊन मीडियावाले मोकळे झाले. कुणी, कशाचा आणि काय अर्थ काढायचा, हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न. बड्यांच्या घरची लग्नं… गाजली काय किंवा गाजवली काय, सर्वसामान्यांना आपल्या अडचणींचा घटकाभर विसर पडला म्हणजे झालं! लग्नाचा दिवस उजाडेपर्यंत परिस्थिती बदलूही शकते कदाचित! कारण लगीनसराईबरोबरच निवडणुकांची लगीनघाईसुद्धा सुरू झालीय. आपल्याला काय, आपलं मनोरंजन झाल्याशी मतलब! बाकी दुष्काळ वगैरे सब झूठ!!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)