अबाऊट टर्न: लक्षवेधी

हिमांशू

कुठल्याही लक्षवेधी गोष्टीची सुरुवात एकतर फिल्म इंडस्ट्रीतून होते किंवा पुण्यातून! बॉलीवूडमध्ये सध्या लक्षवेधी आहेत ते दोन राजकीय चित्रपट. एक “ठाकरे’ आणि दुसरा “द ऍक्‍सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’! तसं पाहायला गेलं तर हे दोन्ही चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. परंतु “लक्षवेधी’ घटना आता घडायला सुरुवात झालीय. निवडणूक जवळ आल्यावरच हे चित्रपट झळकणार, हे जणू ठरलेलंच असावं! या निमित्तानं दोन तगडे अभिनेते सध्या पुन्हा चर्चेत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भूमिका साकारणारे अनुपम खेर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे नवाजुद्दीन सिद्दिकी. परंतु या दोघांपेक्षाही अधिक चर्चा आहे ती चित्रपटातल्या “कन्टेन्ट’ची! खरं तर बॉलिवूडच्या दृष्टीनं “कन्टेन्ट’ हा विषय फारसा चर्चेचा नसतो. परंतु हे चित्रपट राजकीय असल्यामुळं चर्चा तर होणारच! ज्या दिवशी “ठाकरे’चा ट्रेलर प्रदर्शित झाला, त्याच वेळी सेन्सॉर बोर्डानं चित्रपटावर काही आक्षेप घेतले. दुसरीकडे “द ऍक्‍सिडेन्टल प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली. इकडे, 25 जानेवारीला “ठाकरे’ प्रदर्शित होत असल्यामुळं अन्य कोणताही चित्रपट त्या दिवशी प्रदर्शित केला जाऊ नये, अशी शिवसेना स्टाइलनं केलेली “विनंती’सुद्धा चर्चेचा विषय ठरली. एकूणात बॉलीवूडमध्ये सध्या लक्षवेधी बरंच आहे!

चित्रपटाची निर्मिती करणं, एखादं गाणं प्रदर्शित करणं, मग ट्रेलर प्रदर्शित करणं, या सगळ्या घटनांना भरपूर प्रसिद्धी देणं, हा बॉलीवूडचा खाक्‍याच बनलाय. अर्थात या दोन चित्रपटांच्या बाबतीत कलावंतांच्या मुलाखतींव्यतिरिक्त फारसं “प्रमोशन’ झालेलं नसलं, तरी ते गाजणार याची नांदी चित्रपट पाळण्यात असतानाच झालेली होती. सध्याच्या “लक्षवेधी’ बाबी राजकीय स्वरूपाच्या अधिक असल्या, तरी मूळ स्थान बॉलिवूड हेच आहे. या गदारोळात एक “लक्षवेधी’ बाब काहीशी दुर्लक्षित होण्याची शक्‍यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणं ती पुण्यातली आहे. अन्यायग्रस्त महिलांची “मीटू’ ही मोहीम बॉलिवूडमधून सुरू झाली असली, तरी ती आता पुण्यातून वेगळ्या अर्थानं आणि वेगळ्या कारणासाठी सुरू झालीय. शतकानुशतकं आपल्याला शुद्ध पाणी पुरवणाऱ्या नद्या सध्या अन्यायग्रस्त आहेत.

अनेक घटकांमुळं त्या प्रदूषित होत चालल्या आहेत. पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांनी आता या नद्यांसाठी “मीटू’ मोहीम सुरू केलीय, ही अत्यंत अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल. पुणेरी पाट्या नेहमीच “लक्षवेधी’ असतात. परंतु यावेळी पाटीकडे केवळ लक्ष देऊन चालणार नाही, तर कृतीही करावी लागेल, असं वाटायला लावणारे फलक पुण्यात झळकलेत. मुळा-मुठा या “पीडित’ नद्या आता “मीटू’ मोहिमेत सहभागी झाल्यात. गेल्या कित्येक दशकांपासून आमचं प्रदूषण आमच्या इच्छेविरुद्ध सुरू आहे. सांडपाणी, कचरा आमच्या पात्रात फेकला जात आहे, असं या नद्या “मीटू’चा हॅशटॅग वापरून सांगतायत. फलकामुळं केवळ सामान्य माणूसच नव्हे तर यंत्रणाही जागी होणं अपेक्षित आहे; कारण नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांना कोणत्या कलमान्वये किती शिक्षा होऊ शकते, याचीही आठवण हा फलक करून देतोय. “लक्षवेधी’ गोष्टी सतत घडतच असतात. बॉलीवूडपासून आपल्या गल्लीपर्यंत सर्वत्र! लक्ष कुठं द्यायचं, हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)