अबाऊट टर्न: रुखरुख

हिमांशू

प्रिय नीरव,
संपर्क माध्यमांमध्ये क्रांती घडून आलेली असतानासुद्धा तुला पत्र लिहावंसं वाटलं. रागावू नको. सोशल मीडियासारखी माध्यमं आता सर्वांच्या हाती असली, तरी पंधरा पैशांच्या पोस्टकार्डचे दिवस कित्ती कित्ती चांगले होते, असे मेसेजच या देशात जास्त संख्येनं फॉरवर्ड होतात. गुड ओल्ड डेज्‌मध्ये गढून जाणारे आम्ही नॉस्टॅल्जिक लोक आहोत. जो ओलावा पत्रात आहे, तो ई-मेलवरून होणाऱ्या संभाषणात नाही, हे आम्ही जाणतो. तू कुठे आहेस हे माहीत नसलं, तरी तुझ्यात आणि सक्तवसुली संचालनालयात (ईडी) अधूनमधून ई-मेलवरून संवाद होत असतो, हे पाहून बरं वाटलं. कुठे का असेनास, सुखरूप आहेस हे महत्त्वाचं! तू ईडीला पाठवलेली ताजी मेल वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यामुळं आमच्या वाचनात आली.

जिवाला धोका असल्याची भीती तुला वाटते आणि त्यामुळं तू भारतात येण्यास नम्रपणे नकार देतोस, हे समजलं. लोकांनी तुझ्या पुतळ्याचं दहन केलं, ही गोष्ट तू फारच मनाला लावून घेतलीयेस, असं दिसतं. पण खरं सांगू का? लोकांना पुतळे जाळण्याची दांडगी हौस असते. पुतळा कुणाचा आहे, हे महत्त्वाचं कधीच नव्हतं आणि नसतं. सतत कोणतातरी विषय चघळायला मिळावा, एवढीच आम्हा भोळ्याभाबड्यांची अपेक्षा असते. थोड्या-थोड्या दिवसांनी पुतळा बदलतो. बाकी कार्यक्रम तोच राहतो, हे नीट लक्षात घे.

तू ई-मेलमध्ये लिहिलंयस, की तुझ्या जिवाला धोका आहे. तुझे कर्मचारी, घरमालक, ग्राहक आणि काही संस्था तुला वारंवार धमकावत आहेत. एवढ्यावरून आम्हास एवढाच बोध झाला की, एक तर तुला जाहीररीत्या
धमकावलं जात असावं आणि तरीही माध्यमं त्याची दखल घेत नसावीत किंवा तुझ्याशी अजूनही अनेकांचा थेट संपर्क असावा. त्याशिवाय बिचारे धमकावणार कसे? कर्मचाऱ्यांना फक्त पगार हवा असतो. ग्राहकाला दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात वस्तू हवी असते. घरमालकाला भाडं हवं असतं. (तुझ्या जप्त केलेल्या प्रॉपर्ट्यांची यादी पाहता, तू भाड्याच्या घरात राहात होतास, हे पटत नाही.)

एवढ्या मोठ्या बॅंकेची एवढी मोठी रक्कम तुझ्याकडे आहे. त्यासाठी वेगवेगळे सरकारी विभाग हात धुऊन तुझ्या मागं लागले आहेत. या विभागांविषयी, बॅंकेविषयी बोलायचं सोडून, छोट्या-मोठ्या देणेकऱ्यांकडे कशाला लक्ष देतोस? तुझ्या संपूर्ण मेलमध्ये बॅंकेचा, कर्जाचा उल्लेखही नाही. (असेलही कदाचित; पण माध्यमांनी तो प्रसिद्ध केला नसावा.) एवढं कशाला मनावर घ्यायचं? इथं निवडणुकांची भट्टी पेटलेली असताना तुझी आठवण धूसर होत चाललीय, हे कबूल. माणसांची गोत्रं आणि प्रत्यक्ष भगवंताची जात शोधण्याचे प्रयत्न सुरू असताना तुझ्याकडे थोडंफार दुर्लक्ष झालं असेल; पण त्यामुळं एवढं रागवायचं?

कर्ज बुडवणं हा फार मोठा गुन्हा नाही. तुम्ही काही मंडळी न सांगता निघून गेलात म्हणून जरा रुखरुख लागली, एवढंच! त्यातच तुझ्या सहकाऱ्यानं कॅरेबियन बेटांवरच्या कुठल्याशा देशाचं नागरिकत्व घेतल्याचं समजलं. तू मात्र कुठे आहेस, याबद्दल काहीच कळेना. काळजी वाटणं स्वाभाविक आहे की नाही? असशील तिथून परत ये, वगैरे लिहिण्याची आमची औकात नाही. दुसऱ्याच्या कर्जाला जामीन राहिलो तरी बॅंक आमचं बखोटं पकडते. असशील तिथं सुखी राहा, इतकंच!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)