अबाऊट टर्न: मालिका

हिमांशू

आयुष्य ही विसंगत गोष्टींची सुसंगत मालिका आहे, असं मानणारा एक मतप्रवाह आहे. कदाचित म्हणूनच टीव्हीवरच्या मालिका गाजत असाव्यात. त्या विसंगत असतात असं म्हणण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. आमच्यासारख्या क्वचित कधीतरी मालिका बघणाऱ्यांना नेमकं काय चाललंय हे समजत नाही, हा आमचा दोष.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परंतु काहीही आगापीछा माहीत नसतानासुद्धा आम्ही काही बाबींचा अंदाज लावू शकतो. त्यामुळं कोणत्याही मालिकेचा आस्वाद आम्ही कोणत्याही दिवशी मनमुराद घेऊ शकतो, हे आमचं बलस्थान. अर्थातच, हे सर्वांना जमणार नाही आणि मालिकांची आवड असलेल्यांनी तसा प्रयत्नसुद्धा करू नये. वाहिनीनं दिलेल्या वेळेला टीव्हीसमोर हजर असलेलं बरं.
नाहीच शक्‍य झालं तर रिपीट टेलिकास्ट चुकवू नये. ज्यांना हेही जमणार नाही, त्यांच्यासाठी तंत्रज्ञानातल्या उत्क्रांतीनं आणखी एक पर्याय निर्माण केलेला आहे. हवी ती मालिका हव्या त्या वेळी पाहायला मिळावी, या हेतूनं आता वेबसिरीजची निर्मिती धूमधडाक्‍यात सुरू आहे. एपिसोड नेटवर पडल्यापासून तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही तो पाहू शकता, अशी व्यवस्था केली गेल्यामुळं आता चिंतेचं काहीही कारण नाही. मालिकेतल्या कुणाचं लग्नकार्य चुकणार नाही आणि कुणाच्या मृत्युसमयी आपण उपस्थित नव्हतो, अशी रुखरुखही लागणार नाही. सगळं सोप्पं झालंय.

परंतु तरीही आमच्या तंत्रमित्रांना एक फुकटचा सल्ला द्यावासा वाटतो. अर्थात, तो कुणाला मान्य होईल, याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळं सल्ला हा शब्द वापरण्याऐवजी आम्ही इशारा हा शब्द वापरलेला बरा. वेबसिरीज हेसुद्धा आता एक व्यसन बनलं आहे आणि त्यामुळं अर्थातच इतर व्यसनांसारखेच दुष्परिणाम शरीरावर आणि मनावर होताना दिसतायत, असं जाणकारांचं म्हणणं आहे. जाणकार हा शब्द जरा भारदस्त वाटतो म्हणून वापरलाय असं कृपया मानू नका. या व्यसनामुळं डीऍडिक्‍शन सेंटरमध्ये ऍडमिट होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय, हे रोकडं वास्तव आहे. ज्याप्रमाणं दारूच्या व्यसनापायी संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होतं, दारूचे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम दिसून येतात, त्याचप्रमाणं वेबसिरीजचं होऊन बसलंय. माणसाला उद्‌ध्वस्त करणाऱ्या व्यसनांचीसुद्धा एक मालिकाच असावी.

पहिल्यातून मोकळं होण्यापूर्वी दुसरं व्यसन माणसाला चिकटतं. खरं तर यावरच एक मालिका होऊ शकेल. अगदी सहा-सात वर्षें चालणारी. पण तशी मालिका कुणी तयार करणार नाही, याची खात्री आहे. आपल्याला व्यसन लागलं नाही, तर ही मंडळी सेलिब्रिटी म्हणून मिरवू शकणार नाहीत. परंतु सोप्यात सोपं सांगायचं, तर वेबसिरीज पाहणं हे एक व्यसन असून, त्यामुळं अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याइतकीच डाटा ही मूलभूत गरज बनते आणि अखेरीस माणूस माणसात राहत नाही.

सेन्सॉरचं लफडं नसल्यामुळं वेबसिरीजमधून पाहिजे तो कन्टेन्ट मिळतो आणि तो पाहिजे तेव्हा मिळतो, हेच वेबसिरीजचं बलस्थान आणि बघणाऱ्यांचं तकलादू स्थान ठरलंय. मुंबईच्या एका संस्थेनं संशोधनाद्वारे हे सिद्धही केलंय. या संस्थेत वेबसिरीजचं व्यसन सोडवण्यासाठी अनेकजण उपचारसुद्धा घेतायत. वस्तुतः ज्याचा उपभोग आपण कधीही घेऊ शकतो, ती गोष्ट आपल्या हुकमात राहायला हवी. तिचं व्यसन जडता कामा नये. परंतु वेबसिरीज पाहणं हुकमी असूनसुद्धा त्याचं व्यसन माणसाला अंतर्बाह्य पोखरतंय, हे खतरनाक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)