अबाऊट टर्न: भल्यासाठीच!

हिमांशु

कुणी काळजी करू नका, भलत्यासलत्या शंका घेऊ नका. जे काही चाललंय ते तुमच्या-आमच्या भल्यासाठी, या राज्याच्या, या देशाच्या, या जनतेच्या भल्यासाठीच चाललंय. यापुढंही जे काही होईल ते सर्वांच्या भल्यासाठीच असेल. सर्वांच्या म्हणजे, अर्थातच तुमच्या-आमच्या! यांच्या किंवा त्यांच्या भल्यासाठी बिलकुल नाही. प्रस्ताव यांच्याकडून त्यांच्याकडे गेला काय, किंवा त्यांच्याकडून यांच्याकडे आला काय… तो सन्मानजनक वगैरे असेल, तरच स्वीकारला जाईल आणि युती होईल. अन्यथा, मोठा भाऊ बनण्याची दोघांचीही तयारी आहेच. स्वाभिमानाला धक्‍का बसेल अशा तडजोडी करायला ना यांची तयारी आहे, ना त्यांची. हा स्वाभिमानही अर्थातच तुमचा-आमचा आहे. यांचा किंवा त्यांचा नाही. यांचं म्हणणं असं की, आम्ही स्वाभिमान सोडणार नाही. त्यांचं म्हणणं असं की, आम्ही लाचार नाही. ही लाचारीही अर्थात यांची किंवा त्यांची नाही. तीही तुमची-आमचीच, असं म्हणूया आणि यांना आणि त्यांना स्वाभिमानाशी तडजोड करावी लागणार नाही, अशा फॉर्म्युल्याची वाट पाहूया. पेपर वाचूया, टीव्ही पाहूया. सर्वत्र यांचं आणि त्यांचं दर्शन हल्ली रोज घडतं. त्यावाचून गत्यंतरच नाही. अर्थातच तुम्हाला-आम्हाला. कुणाचे बाहू किती स्फुरतात आणि तुटेपर्यंत ताणण्याची ताकद कुणाच्या बाहूत आहे का, हेही अर्थातच तुम्ही-आम्ही पाहायचंय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यांच्याकडून आणि त्यांच्याहीकडून काहीजणांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या असाव्यात, असा दाट संशय अनेकांना आहे. नियुक्त केलेल्या व्यक्तींना विशेष मोहिमा सोपविण्यात आल्या असून, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी विधानं करणं अपेक्षित मानण्यात आलंय. नंतर यांच्याकडून आणि त्यांच्याकडूनही ती विधानं रीतसर खोडून काढली जातात. अंगाला तांबडी माती लावल्यानंतर दोन मल्ल ज्याप्रमाणं सुरुवातीचे काही क्षण एकमेकांना हुलकावण्या देतात, त्याच्याशी साधर्म्य सांगणारे हे पवित्रे आहेत. त्यामुळं विधानं आणि वक्तव्यं सीरिअसली घेऊ नका. यांच्याकडून किंवा त्यांच्याकडून अधिकृत म्हणून जे सांगितलं जातंय, तेही अंतिम मानण्याची घाई करू नका. त्यांना तुमच्या-आमच्या भल्यासाठी आणखी बरंच काही करायचंय. मुख्य म्हणजे, आपलं बुरं करणाऱ्यांना सत्तेपासून रोखायचंय आणि त्यासाठीच एकत्र यायचंय… पण लाचारीनं नव्हे, तर स्वाभिमानानं! नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये, ही म्हण तुम्ही-आम्हीच रूढ केली आहे आणि त्यामुळंच थोरलेपणासाठी यांचा आणि त्यांचा आटापीटा चाललाय. केवळ तुमच्या-आमच्यासाठीच तर! कुणी म्हणतंय, वारं फिरलंय तर कुणी म्हणतंय, लाटा ओसरल्या. कुणी म्हणतंय, याल तर सोबत, नाहीतर… तात्पर्य एकच, तुमच्या-आमच्या भल्यासाठी थोरलेपणा आवश्‍यक आहे आणि तो कुणी घ्यायचा, एवढाच किरकोळ मुद्दा शिल्लक आहे. काही दिवसांत काहीतरी घडेल, पण जे घडेल ते तुमच्या-आमच्या भल्यासाठीच!

कुणाला मित्राविषयीच्या नाराजीचा फटका बसण्याची भीती वाटतेय, तर कुणाला लाचारी नकोशी वाटतेय. जागावाटपाच्या संभाव्य सूत्रातच तुमचं-आमचं भवितव्य सामावलेलं आहे आणि जे काही चाललंय, ते त्यासाठीच. परंतु, या गदारोळात एक मोठ्ठा घोळ तात्पुरता मिटवायला हवा… यांनीही आणि त्यांनीही! दोन्हीकडचे सोशलवीर सध्या कमालीचे बुचकळ्यात पडले आहेत. शस्त्रं परजायची, की वाट पाहायची, हे त्यांना कळेनासं झालंय. त्यामुळं कृपा करून यांनी आणि त्यांनी तात्पुरता सोशल शस्त्रसंधी जारी करावा, ही कळकळीची विनंती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)