अबाऊट टर्न : प्रवाहपतीत   

Fiel photo

हिमांशू 

मोबाइलचा अतिवापर केला तर ब्रेन ट्यूमरचा धोका असतो, असा इशारा टाटा रुग्णालयातल्या डॉक्‍टरांनी दिलाय. सलग दहा वर्षें रोज सहा तासापेक्षा अधिक वेळ मोबाइल वापरला, तर ब्रेन ट्यूमर होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण हे “म्हणणं’ एखाद्या अट्टल मोबाइलवेड्याला सांगून पाहा. तो तुमच्याकडे अशा काही नजरेनं पाहील, जणू त्याच्याकडचा मोबाइल तुमच्यापेक्षा भारीतला आहे, म्हणून तुम्ही त्याच्यावर जळताय. व्यसन माणसाला अगतिक बनवतं. परंतु मोबाइलचं किंवा कोणत्याही तंत्रज्ञानाचं व्यसन सिगारेटसारखं “ऑब्सेशन’ या सदरात मोडणारं नाही. पण तरीही ते सुटू शकत नाही. कदाचित, तंत्रज्ञानाचं आगमन आपल्याकडे खूप उशिरा झाल्यामुळं ते “नवसाचं बाळ’ होऊन बसलंय. या बाळाचे सगळे लाड-कोड पुरवले जाताहेत. आम्ही “टेक्‍नोसॅव्ही’ आहोत, असं सांगताना

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फुगणाऱ्या छातीकडे बघून तंत्रज्ञानाबद्दल काही “निगेटिव्ह’ बोलायची छातीच होत नाही. तंत्रज्ञानाच्या अतिरेकाचा एक दुष्परिणाम सांगायला जावं, तर समोरचा आपल्याला शंभर सुपरिणाम सांगतो. शिवाय, तंत्रज्ञानाच्या आहारी न गेलेला माणूस “मागास’ ठरवला जात

असल्यामुळं, शास्त्रीय संगीतातला गंध नसताना मैफलीला गेलेल्या रसिकासारखं भलत्या ठिकाणी दाद देणंच शहाणपणाचं ठरतं. नवीन तंत्रज्ञानाला नेहमीच विरोध झालाय आणि प्रत्येक टप्प्यावर विरोध करणाऱ्यांची खिल्लीही उडवली गेलीय. परंतु विरोध तंत्रज्ञानाला नसून, त्याच्या गैरवापराला किंवा नको तिथं वापर करण्याला आहे, हे समजून घेण्याची बुद्धी मात्र माणसाकडे कोणत्याही टप्प्यात नव्हती. त्यामुळं तंत्रज्ञानाची प्रतिकूल बाजू दाखवणाऱ्या बातम्या सिगारेटवरच्या पाकिटावर छापलेल्या वैधानिक इशाऱ्यासारख्या दुर्लक्षित होणं स्वाभाविक आहे. जागतिक आर्थिक मंचानं मांडलेलं भविष्यातलं चित्रही असंच दुर्लक्षित ठरलंय. यांत्रिकीकरणानं कळस गाठलेला असूनसुद्धा आजमितीस केवळ 27 टक्के कामंच यंत्रं करताहेत. परंतु येत्या सात वर्षांमध्ये सुमारे 52 टक्के कामं यंत्रं करू लागतील आणि त्यावेळी प्रचंड प्रमाणात बेरोजगारीच्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, असं या अहवालात म्हटलंय. भविष्याचा वेध घेताना केवळ प्रकाशित बाजूच पाहायची, हा आपला शिरस्ता असल्यामुळं “”त्यावेळी रोजगाराची गरजच उरणार नाही,” असंही स्पष्टीकरण कुणीतरी देईल. शेतीत तंत्रज्ञान आल्यावरही अशीच स्पष्टीकरणं दिली गेली होती; परंतु नांगरटीपासून मळणीपर्यंतची कामं यंत्रावर होऊ लागल्यावर शहरांच्या दिशेनं माणसांचे जे लोंढे वाहू लागले, त्याचं ऑडिट करायला अजून कुणाला सवड नाही. मग भविष्याचा विचार करण्यासाठी कुठून सवड काढणार? होईल ते बघून घेऊ, असंच म्हणणार आपण!

एका सत्यवचनी माणसानं सांगितलं होतं की, विज्ञान आणि तंत्रज्ञानात फरक आहे. विज्ञान डोक्‍यात असतं आणि तंत्रज्ञान हाताच्या बोटांवर! आज विज्ञानाचा गंधही नसलेल्यांच्या हाताची बोटं मोबाइलशी खेळताना पाहिली की हे पटतं. यंत्रांनी कुणाच्या तोंडचा घास काढला आणि कुणाच्या मुखी घातला, हा प्रश्‍न तर अजून आपल्याला पडलेला नाहीच; परंतु सोशल मीडियाचा मोबाइल ऍपचा दुरुपयोग, एटीएम मशीन हॅक करून पैशांवर डल्ला मारणारी सोळा-सतरा वर्षांची पोरं एवढं तरी तूर्तास दिसायलाच हवं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)