अबाऊट टर्न : प्रतीक्षा…   

हिमांशू 

कर्जसम्राट विजय मल्ल्या याला भारताच्या ताब्यात द्यायला ब्रिटनच्या सरकारनं अनुमती दिल्याची बातमी सुखावणारी असली, तरी दुसरीकडे अँटिग्वा बेटावर मुक्काम ठोकणाऱ्या मेहुलभाई चोक्‍सीनं भारताचं नागरिकत्व सोडलं, ही बातमी या अनंदावर विरजण टाकणारी आहे. विजय मल्ल्या भारतात केव्हा येणार याची अनेकजण वाट पाहतायत. परंतु खुद्द मल्ल्याच्या मनात काय चाललं असेल, हे जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता आहे. ब्रिटनमध्ये त्याच्याविरुद्ध जेव्हा खटला चालला होता, तेव्हा तिथल्या वकिलांनी आर्थर रोड तुरुंगातले फोटो मागवून घेतले होते.

अशा प्रकारच्या व्हीआयपी कैद्यांना राहण्याजोगं वातावरण भारतातल्या तुरुंगात नाही, अशी लडिवाळ तक्रार विजय मल्ल्यानं केली होती आणि एखाद्या कर्जसम्राटाचा पाहुणचार करण्यासाठी आमचे तुरुंग तयार आहेत, हे फोटोनिशी शाबीत करण्याची वेळ आपल्यावर आली. केवळ तुरुंगांबाबतच तक्रार करून मल्ल्या थांबला नाही. त्यानं अशा अनेक तक्रारी केल्या, आढेवेढे घेतले. जणूकाही तो रुसूनच आपल्याला सोडून गेलाय आणि आपण त्याची समजूत घालून त्याला घरी आणण्याचा प्रयत्न करतो आहोत, असा भास देशवासीयांना होऊ लागला होता. म्हणूनच कदाचित आपल्या स्वागतासाठी आरतीचं ताट घेऊन नेमकं कोण उभं असेल, असा विचार मल्ल्या करत असेल तर ते स्वाभाविक होय.

प्रत्येकाची वेळ येते. त्यामुळं कुणालाही अंडर एस्टिमेट करू नये, अशी शिकवण आम्हाला नेहमी दिली जाते. परंतु मल्ल्या, चोक्‍सी आदींच्या उदाहरणांवरून आम्ही असं शिकलो की, कमावण्यासाठी परदेशात गेलेला माणूस आणि कमावून परदेशात गेलेला माणूस, अशा दोघांचाही तोरा समान असतो. चोक्‍सीनं तर अँटिग्वामधून खास मुलाखत घेऊन आपण भारतातून निघून जाण्यात इतरांचीच कशी चूक आहे, हे ओरडून सांगितलं. नीरव मोदीनं तर भारतात आपल्या जिवाला धोका असल्याचा कांगावा करणारा इमेल थेट तपास यंत्रणांना केला. ही मेल कुठून आली हे मात्र आजतागायत समजू शकलं नाही. अशा वेळी सरकार तरी काय करणार, हा विचार अस्वस्थ करणारा ठरतो.

एक तर या मंडळींना सरकारनंच पळवून लावलं, अशा तक्रारी विरोधक करत असतात आणि दुसरीकडे परदेशातून ही मंडळीसुद्धा सरकारलाच धारेवर धरतात. दगडाखाली हात सापडणं म्हणजे काय, याचा बोध सरकारला अशा घटनांमधून यथेच्छ होत असेल. निवडणुकीपूर्वी मल्ल्या भारतात आला तर सरकारला थोडा तरी दिलासा मिळेल. पण या प्रक्रियाच अशा जटिल की, वाट बघण्याखेरीज सरकारच्या हातात काही उरत नाही. खिंडीत सापडलेले सरकारचे प्रतिनिधी अशा स्थितीत काहीतरी बोलून जातात आणि त्याचाही विरोधक इश्‍यू करतात. प्रतीक्षेचे दिवस एकंदरीतच कठीण.

सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं सध्या प्रतीक्षेचे दिवस आहेत, हेच खरं. मित्रपक्षांच्या निर्णयाचीसुद्धा प्रतीक्षा सत्ताधारी पक्षाला करावी लागतेय आणि बहुतांश पक्ष वाऱ्याचा अंदाज घेतायत. निवडणुकीचा पट मांडल्यावर प्रत्येक पक्ष आपल्यासाठी सर्वांत योग्य जागा कोणती हे शोधूनच डावाला सुरुवात करणार, हे उघड आहे. बऱ्याच वर्षांनी पूर्ण बहुमताचं सरकार केंद्रात आल्यानंतर जे दुर्लक्षित राहिले, त्या छोट्यांना आता सोन्याचा भाव आलाय, असं सर्वेक्षणं सांगतायत. प्रत्येकाची वेळ येते, हेच खरं. सत्ताधाऱ्यांच्या हाती फक्त प्रतीक्षा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)