अबाऊट टर्न: प्रतिष्ठित! 

हिमांशू 

महाबळेश्‍वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा माणसं हॉटेलात एसी रूम मागतात, याचं पूर्वी नवल वाटायचं. मुळात अशा ठिकाणचे हॉटेलवाले एसी रूम उपलब्ध करून देतात याचंच आश्‍चर्य वाटायचं. परंतु एसी रूममध्ये राहण्याचा किंवा एसी मोटारीतून प्रवास करण्याचा संबंध तापमानापेक्षा प्रतिष्ठेशी अधिक आहे, हे हळूहळू समजायला लागलं. जंगलातल्या शांत रस्त्यांवर मोटारीचा हॉर्न वाजवू नये, असे फलक लावूनसुद्धा या प्रतिष्ठित मंडळींचा वेळच अधिक मौल्यवान ठरतो आणि थोडा वेळ जरी कुठे थांबावं लागलं तरी एसी मोटारींचे हॉर्न वाजू लागतात. खरं तर काळाची गरज ओळखून जंगलातल्या छोट्या-मोठ्या प्राण्यांनीच आपल्या सवयी बदलायला हव्यात! प्राण्यांना तसं रीतसर ट्रेनिंग देणं ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की वातानुकूलित वातावरणात राहण्याचा संबंध प्रतिष्ठेशी जोडण्यास आम्ही सरावलो आहोत.परंतु परवा रेल्वे प्रशासनानं जाहीर केलेल्या एका आकडेवारीनं आमच्या या गृहितकावरही मोठ्ठा आघात केला. रेल्वेच्या टॉयलेटमध्ये ठेवलेल्या डब्याला काही ठिकाणी साखळी बांधून ठेवली जाते, हे आम्ही ऐकून होतो. परंतु रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या बेडशीटना, उश्‍यांना आणि पांघरुणांना साखळी कशी लावणार? आंघोळीसाठी दिल्या जाणाऱ्या टॉवेलला साखळी कशी बांधणार? या वस्तू सामान्यतः रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये पुरवल्या जातात आणि तिथून त्या चोरीला जातात.

प्रतिष्ठित व्यक्‍तींचा प्रवास अधिकाधिक आरामदायी व्हावा म्हणून लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना एसी डबे जोडले जातात आणि त्यांना नित्य वापराच्या या वस्तू पुरवल्या जातात. या वस्तू मोठ्या संख्येनं गायब झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. गायब झालेल्या वस्तूंची आकडेवारी डोळे फिरवणारी आहे. रेल्वेच्या एसी डब्यांमधून एका वर्षाच्या कालावधीत 12,83,415 टॉवेल गायब झालेत. 4,71,077 चादरी आणि 3,14,952 उश्‍यांचे अभ्रे चोरीला गेलेत. प्रवाशांनी पळवलेल्या उश्‍यांची संख्या 56,287 असून, 46,515 ब्लॅंकेटसुद्धा एसी डब्यांमधून गायब झाली आहेत. कोच अटेंडंट सांगतात की, प्रवास संपताना टॉवेल आणि चादर बॅगेत टाकून नेण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. वातानुकूलित डब्यात दररोज 3,90,000 “सेट’ प्रवाशांना पुरवले जातात. त्यात एक चादर, टॉवेल, उशी आणि ब्लॅंकेटचा समावेश असतो. हे प्रतिष्ठित प्रवासी डब्यातून उतरताना त्यांच्या बॅगा तपासणंही कुणाला प्रशस्त वाटणार नाही. तशी विनंती केली, तर या प्रतिष्ठितांची रिऍक्‍शन काय असेल? प्रतिष्ठितांनी केलेली चोरी ही “चोरी’च्या व्याख्येत कधीच बसत नाही, याची उदाहरणं आपल्याला देशभरात अनेक स्तरांवर पाहायला मिळतात.

आता रेल्वेनं किमान टॉवेलची चोरी रोखण्याचं मनावर घेतलंय. आकारानं छोटे, किमतीत स्वस्त आणि “यूज अँड थ्रो’ नॅपकिन प्रवाशांना पुरवले जाणार आहेत. खरं तर सामान्यतः प्रवासात लागणाऱ्या वस्तू आपण घरूनच सोबत नेतो. परंतु प्रतिष्ठितांचं लगेज वजनदार असता कामा नये. किमान रेल्वेच्या डब्यात प्रवेश करताना तरी! उतरताना बॅगेचं वजन थोडंसं वाढलं म्हणून काय बिघडलं? अखेर अर्थव्यवस्थेचा एकंदर डोलारा अशाच प्रतिष्ठितांच्या खांद्यावर उभा असतो. टॉवेल-बेडशीटचं वजन त्यापुढं किरकोळ आहे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)