अबाऊट टर्न: प्याला…

हिमांशू

सुधाकर आणि तळीराम त्यांच्या “नेहमीच्या’ ठिकाणी बसले होते. दोघांच्याही समोर प्रत्येकी एकच प्याला होता. कोणत्याही वेळी बाहेर फटाके फुटतील आणि नवीन वर्षाला सुरुवात होईल, अशा क्षणी सुधाकर म्हणाला, “बस… आता हा शेवटचाच प्याला.’ हे ऐकून तळीरामाला धक्काच बसला. तो म्हणाला, “सुधाकरा, अरे काळजी कशाला करतोस? अजिबात गडबड करू नको. सावकाश होऊ दे. रात्रभर सुरू ठेवण्याचे आदेश आलेत वरून!’ परंतु सुधाकराच्या मनात काही वेगळंच चाललेलं होतं. त्याला आता या सगळ्यातून मोकळं व्हायचं होतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“तळीरामा, तसं नाही रे… हा शेवटचा प्याला म्हणजे, यापुढं मी बंद करणार… कायमची!’ सुधाकराचे हे शब्द ऐकून तळीराम अक्षरशः खो-खो हसत सुटला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी केलेले निश्‍चय, संकल्प आणि नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात त्या संकल्पांची होणारी अवस्था, या दोन्ही गोष्टींचा तळीरामाला वर्षानुवर्षांचा अनुभव! असे अनेक सुधाकर त्याच्यासमोर येऊन गेलेले. “नशीब सुधाकरा, उद्यापासून जॉगिंगला जाणार, असं म्हणाला नाहीस,’ हसता-हसता तळीराम बोलत सुटला, “”बाबारे, हृदयाचं वाट्टोळं होईल, अशी भीती वाटू लागली की लोक एक जानेवारीपासून धावायला सुरुवात करतात. सकाळी तासभर धावून हृदयाला खूश करतात. मग दिवसभर हृदयावर वेगवेगळे आघात करत राहतात. चार तारखेलाच त्यांना वास्तव समजतं… मग धावणं बंद!’

एकंदरीत, टिकेल असा संकल्प करावा… पचेल तेवढंच बोलावं, असा तळीरामाचा आग्रह. परंतु सुधाकर गंभीरपणे प्याल्याकडे एकटक बघत राहिला. निःशब्द! नव्या वर्षात दोन पायांवर ठामपणे उभं राहून प्रवेश करायचा… लडखडत नाही, असं त्याला मनापासून वाटत होतं. “नवं वर्ष… नवा सुधाकर!’ एवढंच तो कसाबसा पुटपुटला. ते ऐकून तळीरामाला उलट अधिकच हसू आलं. “”लेका, येणारं वर्ष 2019 आहे म्हणून घाबरतोस की काय? मला तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून 2019 आल्याचाच भास होतोय.

मधली वर्षं आलीच नाहीत बहुतेक! खूपच ब्रॅंडिंग झालं ना रे 2019 चं! पण तू कशाला घाबरतोस? ज्यांना घाबरायचं ते घाबरतील. तू निर्धास्त राहा!’ यावर सुधाकर म्हणाला, “”तसं नाही रे मित्रा. मला हा प्यालाच नकोय. जगात आणि जीवनात ठायीठायी इतकी नशा भरलेली असताना ही आणखी कशाला? माझं ऐक… तूही बंद कर हे!’ आता मात्र तळीराम तोल जाईपर्यंत हसला. आजूबाजूचे लोक उगाचच कॉन्शस झाले. “एवढं बाकी खरं बोललास, सुधाकरा… 2019 मध्ये तशीही खूप वेगवेगळ्या प्रकारची नशा असणार आहे. विस्मृतीत गेलेलं बरंच काही आठवणार आहे.

आठवणीत ठेवाव्यात अशा गोष्टी विस्मृतीत जाणार आहेत.’ एवढ्यात बाहेर फटाक्‍यांची आतषबाजी सुरू झाली. “हॅप्पी न्यू इयर’ असा गजर फटाक्‍यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात मिसळून गेला. बाहेरच्या आवाजामुळं आत कुणाचंच बोलणं कुणाला ऐकू येईनासं झालं. सुधाकराला तरी त्याच्या आतला आवाज ऐकू येत होता की नाही, कोण जाणे! इकडे तळीराम चक्क ओरडू लागला होता… “”वाजू द्या फटाके असेच… अगदी मे महिन्यापर्यंत सलग वाजवा! या नव्या वर्षावर दावा करणारे कितीतरी असतील; पण हे वर्षं आमचंच आहे… निःसंशय!’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)