अबाऊट टर्न : नेम चेंजर…   

हिमांशू 

“नावात काय आहे,’ हा प्रश्‍न तूर्तास गैरलागू आहे. सर्वकाही नावातच आहे आणि नाव कमावण्यापेक्षा नाव बदलण्यामुळं नावारूपाला येण्याची अधिक संधी आहे. “”काम करून दाखवलं नाही, तर नाव बदला,” हा हुरूप निवडणुकीच्या मैदानात उतरताना प्रत्येकाला असतोच; पण ज्यावेळी काम दिसत नाही, तेव्हा नावच कामाला येतं. एकतर आपल्याकडच्या निवडणुका नावावर खेळल्या जातात.

एकास एक वाटणी करून “अमुक विरुद्ध तमुक’ असं चेहऱ्यांचं राजकारण सुरू असतं आणि लोकशाही हा सामूहिक नेतृत्वाचा मार्ग आहे, हे विसरून आपण कोणत्यातरी एका नावाच्या मागे धावू लागतो. नावं आकर्षित करू शकतात तशीच ती नाराजही करू शकतात. नावं नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतातच; पण डोळे दिपवणाऱ्या त्या वलयामागं ठोस असं काही दिसत नसेल, तर मग चिन्हा-प्रतीकांचं राजकारण सुरू होतं. म्हणूनच एकाएकी अनेक शहरांची नावं खटकायला लागतात. खरं तर बरीच वर्षे सत्ता हातात असते आणि संबंधित शहराचं नाव बदलणं शक्‍यही असतं. परंतु चांगल्या

कामासाठी नेहमी “मुहूर्त’ लागतो आणि लोकशाहीत निवडणुकीइतका सुमुहूर्त दुसरा नाही! अनेक शहरांची नावं बदलण्याचे निर्णय, आश्‍वासनं आणि मागण्या सध्या अचानकच अवकाळी पावसासारख्या कोसळू लागल्यात. जणू काही नावं बदलण्याचा हंगामच सुरू झालाय! राजकारणातले एकेकाळचे “गेमचेंजर’ अचानक “नेमचेंजर’ बनू लागलेत.

अयोध्या प्रश्‍नावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लोकसभा निवडणुकीपूर्वी लागणार नाही, हे स्पष्ट झाल्याबरोबर हा हंगाम सुरू झाला. प्रथम अलाहाबादचं नाव बदलून “प्रयागराज’ करण्यात आलं. मग फैजाबाद जिल्ह्याचं नाव श्री अयोध्या असं करण्यात आलं. तिथल्या मेडिकल कॉलेजला दशरथराजाचं तर होऊ घातलेल्या विमानतळाला प्रभूरामचंद्रांचं नाव देण्यात आलं. या झटपट निर्णयांमुळं अचानक काहीजणांना सूर सापडला. गुजरातेत चौथ्यांदा सत्तेवर आलेल्या मंडळींनाही अहमदाबाद शहराचं नाव बदलण्याचा साक्षात्कार आताच झाला आणि “कर्णावती’ असं नाव देण्यासाठी कागदोपत्री हालचाली सुरूही झाल्या. नामकरणाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झालेली; मग ताजमहालासाठी प्रसिद्ध असलेलं आग्रा शहर मागे कसं राहील? या शहराचं नाव “अग्रवाल’ किंवा “अग्रवन’ असं करण्याची

मागणी आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी केली. आग्रा या नावामागं कोणतीही पार्श्‍वभूमी नाही आणि अग्रवाल समाज पूर्वी या भागात मोठ्या संख्येनं राहत होता, असं त्यांचं म्हणणं आहे.

ही लाट महाराष्ट्रातही लवकरच येऊ शकते, हे ओळखून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याची मागणी तातडीनं पुढे आली. तिकडे तेलंगणमध्ये तर निवडणुकांची धामधूम सुरूच आहे. भाजपने निवडणूक जिंकल्यास हैदराबाद शहराचं नाव बदलण्याचं आश्‍वासनही दिलं गेलं.

थोडक्‍यात, “नावात काय आहे,’ हा प्रश्‍न सध्या तरी “कशी झाली दिवाळी,’ या प्रश्‍नाइतकाच निरर्थक आहे. खरं तर ज्या शहरांची, गावांची, गल्ल्यांची, रस्त्यांची, स्टेडियमची, मैदानांची, घरांची, माणसांची नावं बदलावीशी वाटत असतील, त्यांची एक यादी तयार करायला हवी आणि सगळी नावं एकाच आदेशानं बदलून घ्यायला हवीत, असा विचार अनेकांच्या मनात या निमित्तानं आला असेल. पण मग निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी काय करायचं? “कशी झाली तुमची दिवाळी,’ असं मतदारांना विचारायचं?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)