#अबाऊट टर्न: नंबरी 

– हिमांशू 
“बाप नंबरी, बेटा दस नंबरी’ नावाचा कादर खान आणि शक्‍ती कपूरचा हिंदी चित्रपट काही वर्षांपूर्वी गाजला होता. फसवाफसवी करणारे बापलेक अखेर तुरुंगात जातात, असं अखेरच्या सीनमध्ये दाखवलं होतं. हे दोघं “आत’ चालले असताना बापाचा बाप (कादर खानचा डबल रोल) “बाहेर’ पडत असतो. मुलगा आणि नातवाला ओळखून तो विचारतो, “”फसवणूक करून तुम्ही आतापर्यंत लोकांना काय-काय विकलं?” बापलेक उत्तर देतात, “”लाल किल्ला, कुतूबमिनार, ताजमहाल इत्यादी सर्व आम्ही विकून दाखवलं.” तेव्हा त्यांना वेड्यात काढून सिनिअर कादर खान म्हणतो, “”मूर्ख आहात… मी आत्ताच हा तुरुंग विकून बाहेर निघालोय!” संवाद विनोदी असला, तरी फसणाऱ्या आणि फसवणाऱ्या अशा दोहोंच्या मनोवृत्तीचं चपखल दर्शन घडवणारा आहे.
कायदेकानून कितीही कडक असले आणि सुरक्षिततेसाठी कितीही तंत्रज्ञान वापरलं तरी त्याच्या पुढचं पाऊल गाठून गुन्हेगारांनी या देशात आपणच अव्वल असल्याचं अनेकदा दाखवून दिलंय. असे अनेक किस्से आपण नेहमी ऐकत असतो आणि हसून सोडून देत असतो. चित्रपटांना बहुधा अशाच प्रसंगांमधून रसायन मिळत असावं. आता हेच पाहा ना, स्वतःची कसदार जमीन गहाण ठेवूनसुद्धा शेतकऱ्याला कर्ज मिळवणं अवघड झालंय. पण फसवाफसवी करणारे कुठलीही जमीन गहाण टाकून कर्ज मिळवू शकतायत.
गुजरातेत साबरमती नदीजवळ असलेली चक्‍क सरकारी जमीनच एका पठ्ठ्यानं गहाण ठेवली. तीही सरकारी बॅंकेत. त्यासाठी त्यानं सरकारी जमिनीच्या कागदपत्रात आवश्‍यक फेरफार करवून घेतले. ही जमीन 1984 मध्ये तीस लाख रुपये मोजून विकत घेतली आहे, असं दर्शवणारा कागद तयार केला. तो गहाण ठेवून तब्बल 45 कोटींचं कर्ज घेतलं. म्हणजे, जमीन सरकारी, बॅंक सरकारी… पण कर्ज मिळालं मुंबईतल्या कुटुंबाला. यथावकाश कर्जाचे हप्ते थकल्यानंतर (थकणारच होते) बॅंकेनं जमिनीचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की, जमिनीचा मूळ मालकच बनावट आहे. मग खरा मालक कोण, याचा शोध सुरू झाला आणि ती सरकारचीच जमीन आहे, हे लक्षात आलं. आता या प्रकरणात चारजणांना अटक झालीय; पण कोण, कुणाला, कशी शेंडी लावेल याचा काही नेम नाही, एवढं या प्रकरणातून दिसून येतंय. चित्रपटातल्या बापलेकांसारखे एकाहून एक “नंबरी’ लोक या देशात आहेत. नोटाबंदी झाली तरी त्यांना काही वाटत नाही आणि जीएसटी आला तरी काही फरक पडत नाही. ही मंडळी काहीही करून वेळ निभावतातच. ही वृत्ती केवळ श्रीमंतांमध्ये आहे, असंही नाही. बंगल्यांमधून ती झोपडीतही शिरली आहे, हे मध्य प्रदेशातल्या प्रकरणातून दिसून येतं.
धार जिल्ह्यातल्या दुर्गम गावात राहणाऱ्या 75 वर्षांच्या म्हाताऱ्यानं रेशन कार्डवर स्वतःसह बायकोचं आणि मुलाचं नाव लिहवून घेतलेलं. सुमारे वर्षभर किमान साठ किलो धान्य त्यांनी घेतलं. पडताळणी करणारे अधिकारी म्हाताऱ्याच्या घरी आले, तेव्हा म्हातारा-म्हातारी दोघंच होते. “राजू’ नावाच्या त्यांच्या मुलाला हाक मारली, तेव्हा म्हाताऱ्याचा कुत्रा शेपूट हलवत आला. त्याचीच नोंद “मुलगा’ म्हणून केली होती. असे किती “राजू’ असतील या धास्तीनं अधिकारी चक्रावलेत. “राजू’ त्यांना चावला नाही, हेच नशीब!
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)