अबाऊट टर्न : तिकीटबारी   

हिमांशू

करमणुकीचा खेळ आपण तिकीट काढून पाहतो. राजकरणात मात्र तिकिटांचा खेळच करमणुकीचा ठरतो. निवडणुका आल्या की तिकीटवाटपाचा मुद्दा येतो आणि राष्ट्रीय मुद्यांवर तत्त्वनिष्ठेची धुवॉंधार बॅटिंग करणारी मंडळी घरात अडचणीत येतात. पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराला जोर चढलाय. या निवडणुकीचे निकाल लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत “ताजे’ राहणार असल्यामुळं प्रचारात; किंबहुना आरोप-प्रत्यारोपांत कुणीच मागे हटेना, अशी परिस्थिती आहे.

राजकीय पक्षांनी आपापल्या आकलनानुसार त्या-त्या ठिकाणचे प्रश्‍न हेरून जाहीरनाम्यांमध्ये भरपूर आश्‍वासनं दिली आहेत. परंतु पक्षाच्या या छापील दस्तावेजातले मुद्दे आणि व्यासपीठावरच्या तोंडी प्रचाराचे मुद्दे क्वचितच एकसारखे असतात. त्यामुळं मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये सध्यातोफा धडाडत असून, एकमेकांवर आग ओकणं सुरू आहे. परंतु या तोफांच्या मागचं वातावरणही थंड नसतं. निवडणुकीच्या प्रयोगात स्टेजवरील अभिनयापेक्षा बॅकस्टेज मॅनेजमेन्ट महत्त्वाचं ठरतं. अनेक नेत्यांना निवडणुका ही स्वतःचं वजन वाढवून घेण्याची संधी वाटत असते आणि त्या दृष्टीनं तिकीटवाटप हा कळीचा मुद्दा ठरतो. राजकारणातल्या “तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ नाटकाचं बॅकस्टेज सध्या असंच गाजतंय.

कॉंग्रेसचं नेतृत्व सध्या “तरुण’ आहे आणि ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तिथंही बऱ्याच वर्षांपासून स्थानिक तरुण नेते “मशागत’ करीत आहेत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे तर राजस्थानात सचिन पायलट यांनी बरीच मेहनत घेतली. अर्थात, ज्येष्ठांनी मेहनत घेतलीच नाही असं नाही; परंतु “नेता’ म्हणून तरुणांकडेच पाहिलं जात होतं. मध्य प्रदेशात तिकीटवाटप पूर्ण झालं आणि नंतर खबर आली की, दोन ज्येष्ठ नेत्यांच्या समर्थकांना अधिक तिकिटं दिली गेलीत. दिग्विजयसिंह यांच्या समर्थकांना 75 तर कमलनाथ यांच्या समर्थकांना 50 तिकिटं दिली गेली. उर्वरित 45 तिकिटं ज्योतिरादित्य यांच्या समर्थकांच्या वाट्याला आली.

मुख्यमंत्री कोण, हा प्रश्‍न निर्माण होणारच. त्यासाठी ज्येष्ठांनी पक्की फिल्डिंग आतापासूनच लावून ठेवलीय. तिकडे राजस्थानातही सचिन पायलट यांची वाट अवघडच असल्याची बातमी आलीय. तेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असतील, असं मानलं जात असतानाच अशोक गेहलोत यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. तरुणांची संख्या आणि समस्या या देशात सर्वाधिक आहेत. त्यामुळं किमान या दोन राज्यांमधल्या जनतेसमोर तरुण चेहरे येणार, असं वाटत होतं; पण…

ज्येष्ठांचा हा अनुभव बेधडक वक्तव्यं करताना कुठे जातो, कळत नाही. तरुण नेते तुलनेनं अधिक समंजसपणे विचार आणि प्रचार करताना दिसतायत. दिग्विजयसिंह यंदा तुलनेनं शांत असले, तरी कमलनाथांनी तिकीटवाटपावरूनच दोनदा तोंड उघडलं आणि अडचणीत आले. एकदा उमेदवारावर गुन्ह्यांची नोंद असली तरी चालेल, असं म्हणाले तर महिलांना उमेदवारी देण्याच्या मुद्‌द्‌यावरून “”आम्ही नट्टापट्टा बघून तिकिटं देत नाही,” असं म्हणाले. आपापल्या समर्थकांना उदंड तिकिटं मिळालेली असताना ही बिनतिकिटाची करमणूक कशासाठी?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)