#अबाऊट टर्न : ज्ञानकल्लोळ 

– हिमांशू 

विकीपीडिया हा निःशुल्क ज्ञानकोश आहे. ज्ञानावर मक्‍तेदारी प्रस्थापित करून त्याची विक्री करणाऱ्या कोशांना पर्याय म्हणून हे व्यासपीठ काही जाणत्यांनी जगाला उपलब्ध करून दिलं. विकीपीडियानं वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञांना लिहिण्यासाठी आमंत्रित केलं; पण विद्वानांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. मग ज्या-त्या विषयात जेवढी माहिती असेल, ती अपलोड करण्याची विनंती सामान्य लोकांना करण्यात आली. पण तपशिलात चुका होऊ लागल्या. तज्ज्ञांना त्या सहन झाल्या नाहीत आणि मग ते दुरुस्त्या करण्यासाठी धावले. आमंत्रण देऊनही न आलेले तज्ज्ञ अशा प्रकारे या वाटचालीत हळूहळू सहभागी झाले, असं विकीपीडियाचे प्रतिनिधीच सांगतात. आजही तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोकांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. पण गेल्या काही दिवसांत हा कोश वेगळ्याच कारणांनी गाजू लागलाय.

-Ads-

पाकिस्तानातल्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या पाळीव कुत्र्यांचं विकीपीडियावरचं पेज गाजायला लागलं. निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांच्यापासून फारकत घेणाऱ्या त्यांच्या पत्नीनं घटस्फोटाचं एक कारण इम्रान यांचा पाळीव कुत्रा हेही आहे, असं सांगितल्याचं प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर इम्रान यांचं श्‍वानप्रेम दुसऱ्यांदा गाजतंय. प्रत्येकाची वेळ असते आणि वेळ सांगून येत नाही, हेच खरं!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही पाळीव कुत्र्यांचं भलतंच वेड आहे म्हणे! विकीपीडियानं या कुत्र्यांची अनेक पेजेस तयार केली आहेत. आता त्याच धर्तीवर इम्रान खान यांच्या कुत्र्यांचं पेज तयार करायला घेतलंय, असं विकीपीडियाच्या अधिकाऱ्यानं पाकिस्तानातल्या मीडियाला सांगून टाकलं. या पेजवर इम्रान यांच्या कुत्र्यांची शेरू, मोतू, शेरनी, पिडू, मॅक्‍सिमस अशी नावं दिसू लागलीत.

पण त्यांच्या जन्मतारखा आणि इतर तपशील उपलब्ध झालेला नाही, असं हा अधिकारी सांगतो. एकाएकी या श्‍वानांनी मीडियाचं लक्ष वेधून घेण्यामागचं करण काय असावं? “खानाघरचं श्‍वान’ एवढं म्हणून आम्ही तो विषय डोक्‍यातून काढला. तेवढ्यात त्रिपुरातून विप्लव देव यांची बातमी आली. आठवतात ना? महाभारतात इंटरनेट होतं, हा शोध लावणारे मुख्यमंत्री हेच! त्यांच्या विकीपीडिया पेजवर तीन दिवसांत 37 वेळा बदल केले गेल्याचं प्रकरण सध्या गाजतंय. कुणीतरी त्यांचं पेज सतत संपादित करतंय. त्यांनी लावलेल्या शोधांसाठी जर हे घडलं असतं, तर सद्यःस्थितीत फारसं काही वाटलं नसतं. पण वाद आहे त्यांच्या जन्मगावाचा. त्रिपुरातल्या गोमती जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला, असं सुरुवातीला या पेजवर दिसत होतं. कुणीतरी त्यात बदल करून बांगलादेशातल्या चांदपूरमध्ये त्यांचा जन्म झाल्याची नोंद केली. काही तासांनी पुन्हा गोमती जिल्हा दिसू लागला.

देव यांच्या पेजमध्ये बदल करणाऱ्या व्यक्‍तीनं ते भारतात अवैधरीत्या आल्याचा उल्लेख केलाय. मग त्यांचं शिक्षण वगैरे भारतातच झालं, असंही म्हटलंय. दोन-तीन दिवस अशीच अदलाबदल चालली आणि शेवटी विप्लव देव यांचं जन्मस्थळ गोमती जिल्ह्यात स्थिरावलं. मोजक्‍या माहीतगार व्यक्तींना पेज एडिट करण्याची परवानगी देणाऱ्या विकीपीडियानं या गोष्टीचा गंभीरपणे विचार केलेला बरा! इम्रान खान यांच्या श्‍वानांचं एकवेळ ठीक आहे. पण ईशान्येत आधीच नागरिकत्वाचा गोंधळ सुरू असताना ही भर कशाला त्यात?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)