अबाऊट टर्न: चॉकलेट

हिमांशू 

चॉकलेटचा बंगला ही मनात इमले बांधण्याची आपल्याकडची पहिली पायरी. अगदी लहानपणची. मग पुढं गणपत वाण्यापासून मुंगेरीलालपर्यंत अनेकजण भेटत जातात. भलती स्वप्नं रंगवणं योग्य नव्हे, हे काळाच्या ओघात आपल्याला कळत जातं आणि फॅण्टसी फक नाटका-सिनेमापुरती मर्यादित राहते. तरीसुद्धा लहानपणचा चॉकलेटचा बंगला मनातून जात नाही. चॉकलेट ही वस्तूच अजब! लहानपणी चॉकलेट जास्त आकर्षक वाटत असलं, तरी त्याच्यासाठी हावरेपणा करण्याला वयाचं बंधन नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेषतः चॉकलेट्‌सच्या जाहिरातींनी वातावरण इतकं ढवळून काढलंय, की लहान मुलांपेक्षा तरुणवर्गात, विशेषतः तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. अशाच एका तरुणीनं स्वतःच्या लग्नात रुखवतात ठेवण्यासाठी चॉकलेटचा बंगला बनवला होता आणि लग्न लागल्यावर संध्याकाळी तो मोडून खाणाऱ्यांमध्ये नवऱ्या मुलीच्या मैत्रिणीच सगळ्यात पुढे होत्या, हेही आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलंय.

हल्ली प्रियकरानं गजऱ्यापेक्षा चॉकलेट आणलं तर प्रेयसी अधिक रोमांचित होते आणि ते पाहून प्रियकर स्वतःला “चॉकलेट हिरो’ समजू लागतो, असंही ऐकून आहोत. कॉलेज कॅन्टीन आणि आसपासच्या परिसरात चॉकलेटची विक्री हल्ली वाढलीय म्हणे! अशा या चॉकलेटचा बंगला सोडा; आख्खी नदी जर वाहू लागली, तर आपल्याकडे काय घडेल? चॉकलेट शौकिनांच्या तोंडाला नुसत्या कल्पनेनंच पाणी सुटलं असेल; पण ही फॅण्टसी नाही.

जर्मनीतल्या एका रस्त्यावर भल्या सकाळी चॉकलेटची नदी वाहू लागली. आपल्याकडे असं घडलं असतं तर कुठूनतरी राडारोडा वाहून आलाय, असंच रंगावरून मानलं गेलं असतं. वाहणारा पदार्थ हा द्रवरूप चॉकलेट आहे, हे वासावरून नक्की केल्यानंतर मग मात्र कुणीच मागे राहिलं नसतं. परंतु जर्मनीतल्या घटनेत असं काही घडलं नाही.

लोक आश्‍चर्यानं ही चॉकलेटची नदी पाहू लागले. तिचं उगमस्थान शोधू लागले. या वाहत्या चॉकलेटची गंगोत्री कुठे आहे, याचा काही वेळानंतर उलगडा झाला. जवळच असलेल्या एका चॉकलेटच्या फॅक्‍टरीत असलेला लिक्विड चॉकलेटचा टॅंक गरजेपेक्षा जास्त भरला होता आणि ओव्हरफ्लो झालेलं टनभर लिक्विड चॉकलेट कंपनीतून बाहेर पडून वाहू लागलं होतं. काही वेळानं द्रवरूप चॉकलेट रस्त्यावरच थिजून घनरूप झालं. तत्पूर्वी कुणीही त्या रस्त्यावरून वाहन चालवलं नाही. जर्मनीतल्या घटनेमुळं चक्क ट्रॅफिक जॅम लागला. स्थानिक शहर प्रशासनाला हे चॉकलेट रस्त्यावरून कसं हटवावं आणि वाहतूक सुरळीत कशी करावी, हा प्रश्‍न पडला होता.

मागे एकदा हायवेवर एका ट्रकला अपघात झाला होता. ट्रकच्या चालकाला आणि क्‍लिनरला लोकांनी बडवलं. मग जखमी झालेल्यांना घेऊन त्यांनाच हॉस्पिटलात पाठवलं. मग ट्रकमध्ये काय भरलंय, याची “तपासणी’ पोलिसांच्या आधी स्थानिक नागरिकांनी केली. ट्रकमध्ये चॉकलेटचे बॉक्‍स भरलेले होते. चालक आणि क्‍लिनर परत येईपर्यंत ट्रकमध्ये एकही बॉक्‍स शिल्लक नव्हतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)