#अबाऊट टर्न: “चलनी’ यादी

– हिमांशू

सलमान खानच्या मोटारीनं वेगाची मर्यादा ओलांडली; पण दंड न भरता तो तसाच वेगानं निघून गेला… तुम्ही म्हणाल, ही काय बातमी आहे? सलमान खानची गाडी माणसांना चेंगरून भरधाव वेगानं निघून गेली, ही खरी बातमी होती. त्यालाही खूप-खूप वर्षं लोटली. आता ती कुणाला आठवतसुद्धा नाही. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याच्या काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल लागला, तीसुद्धा बातमी होती. कारण जामीन मिळण्यापूर्वी दोन दिवसांसाठी का होईना, त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. मग त्याची तुरुंगातली दिनचर्या प्रसिद्ध झाली. त्यानं काय खाल्लं, किती वेळ झोपला, तो आत गेल्यावर चाहते कसे रडले इत्यादी, वगैरे! या खऱ्या बातम्या! वेगमर्यादेचं उल्लंघन करणं, तेसुद्धा सलमाननं, ही बातमी होऊच शकत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खरं तर “हिट अँड रन’ आणि काळवीट शिकार अशा भरभक्कम प्रकरणांचा विचार करता “सलमानचं ओव्हरस्पीडिंग’ हा गुन्हासुद्धा ठरता कामा नये. पण मुंबईचे वाहतूक पोलिस खूपच कार्यतत्पर. पावती फाडायला वेळ मिळाला नाही (म्हणजे, सलमाननं दिला नाही) म्हणून पोलिसांनी त्याच्या घरी ई-चलन पाठवलं. आतापर्यंत समन्स, वॉरंट वगैरे थोर कागदपत्रं पाहण्याची सवय जडलेल्या सलमानच्या नजरेला पोलिसांचं ई-चलन दिसलं तरी असेल का?

पण ट्रॅफिक पोलिसांचं काम आताशा जरा सोपं झालंय. सिग्नलजवळ आणि अन्य अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. त्यामुळं कुणी कधी नियम मोडला, हे गाडीच्या नंबरवरून कळून येतं. अशा लोकांकडे तोंड करून जोरजोरात शिट्ट्या फुंकण्याऐवजी किंवा त्याचा पाठलाग करण्याऐवजी त्याच्या घरी ई-चलन पाठवलं जातं. पण मुद्दा असा, की रस्त्यावर अडवून पावती फाडली तरी लोक पोलिसांशी हुज्जत घालतात. बड्या-बड्यांना फोन करून तो फोन पोलिसांच्या हातात देतात. क्वचितप्रसंगी पोलिसांना दमदाटी करून हातही उगारतात. सलमान वगैरेंसारखी ही माणसं लोकप्रियही नसतात.

अशा माणसांच्या घरी जर ई-चलन पाठवलं, तर ही मंडळी दंड भरतील का? अगदी साध्या-साध्या माणसांची ही कथा, मग व्हीआयपी लोकांनी दंड भरण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. पण घरी चलन पाठवूनसुद्धा दंड न भरणाऱ्यांची एक भलीमोठ्ठी यादी पोलिसांनी तयार केलीय. सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं, ती प्रसिद्ध झालीय. यादी वाचताना आम्ही कपाळावर हात मारून घेतला. राज्याच्या परिवहन मंत्र्यांचंच नाव या यादीत असेल, तर दुसरं काय करणार? वेगमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळं त्यांना हजार रुपयांचा दंड झालाय म्हणे! या यादीत सर्वाधिक वेळा नाव आलंय आदित्य ठाकरेंचं.

सहा वेळा “ओव्हर स्पीडिंग’ आणि एकदा झेब्रा क्रॉसिंगला गाडी थांबवली नाही म्हणून! याखेरीज राज ठाकरेंना फॅन्सी नंबरप्लेट बसवली म्हणून हजार रुपयांचा, तर झेब्रा क्रॉसिंगला गाडी थांबवली नाही म्हणून दोनशे रुपयांचा दंड झालाय. अभिनेता अरबाज खानला चार वेळा “ओव्हर स्पीडिंग’बद्दल दंड झालाय. अजित पवारांचंही नाव यादीत आहे. कॉमेडी किंग कपिल शर्माकडून दोन हजारांचा दंड थकित आहे म्हणून त्याच्या घरी ट्रॅफिक पोलिसांनी ई-चलन पाठवलंय. आपण काहीही केलं तरी समोरचा हसतो, असा कपिलचा गैरसमज नवज्योतसिंग सिद्धूनं करून दिलाय… पण म्हणून काय पोलिसांनीही हसावं?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)