अबाऊट टर्न: गुप्त-धन! 

हिमांशू 

जेव्हा फेसबुक नव्हतं, तेव्हा लोक काय करीत होते? फेसबुकच्या यूजर्सची संख्या अवाढव्य असली, तरी आजही अनेक जणांचं अकाउंट नाही किंवा असलं, तरी ते नावापुरतं आहे. ही माणसं कशी जगतात? कल्पनाच सहन होत नाही ना? कमाल आहे बुवा या लोकांची! सोशल नेटवर्कविना जगतात कसे हे लोक? एकमेकांना कम्युनिकेट कसे करतात? टेक्‍नोसॅव्ही न्यू जनरेशनच्या गर्दीत जगताना यांची घुसमट कशी होत नाही? हवा, पाणी नाही मिळालं तरी चालेल; पण सोशल नेटवर्कवर सतत ऑनलाइन असणं जगण्यासाठी अत्यावश्‍यक आहे. एकतर आपण केवळ जिवंतच नसून, जागेही आहोत हे आपल्याला सोशल मीडियामुळंच समजतं. एवढंच नव्हे तर आपल्याला सगळ्याच गोष्टींमधलं सगळं कळतं, हे अत्यंत सुखद फीलिंग हे माध्यम आपल्याला देतात. कुणाचीही मापं काढण्यासाठी त्या क्षेत्रातलं ज्ञान घ्यावं लागत नाही आणि पाठ थोपटून घेण्यासाठी खूप मोठं काहीतरी केलं पाहिजे, असंही नाही. एखादा किरकोळ फोटो टाकला तरी शेकडो लाइक्‍स येतात. मिनिटा-मिनिटाला फक्‍त ओपन करून बघायचं आणि लाइक्‍स मोजायचे. प्रत्यक्ष माणसात जायचं म्हणजे त्रासच की! घराबाहेर पडायचं, प्रदूषणानं भरलेल्या रस्त्यावरून खड्डे चुकवत गाडी चालवायची, रस्त्यावरचं खरं जग बघायचं, गणपतीतल्या हलत्या देखाव्यासारखी चालती, बोलती माणसं बघायची म्हणजे शिक्षाच!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एके ठिकाणी दोघेजण कशावरून तरी वाद घालताना दिसले. प्रत्यक्ष… समोरासमोर उभे राहून! आश्‍चर्यच वाटलं. एवढी उपयुक्‍त साधनं हाताशी असताना समोरासमोर येऊन वाद घालायची काय गरज? ओझरतं पाहिल्यामुळं वादाचा विषय नाही समजू शकला; पण त्यातल्या एकाचं वाक्‍य जाता-जाता ऐकू आलं. तो म्हणत होता, जे लोक परिस्थितीशी “कोप-अप’ करू शकत नाहीत, अशांनी मरावं! खरं तर टाळ्यांचं वाक्‍य. पण टाळ्यांचा इमोजी रस्त्यावर कुठून आणणार? दूर जाईपर्यंत ते वाक्‍य कानात घुमत होतं. त्यानंतर समोरचा काहीतरी बोलला; पण ते स्पष्टपणे ऐकू आलं नाही. “कोप-अप’ करू न शकणारी माणसं मरूही शकतात आणि मारूही शकतात, असं काहीतरी तो बरळत होता. पण पहिल्याच्या डायलॉगची धार त्याच्या बोलण्याला नव्हती. ही नॉस्टेल्जिक मंडळी कधीच जिंकू शकत नाहीत; किमान वादात तरी! कारण मुळातच ती कालबाह्य झालेली आहेत. फेसबुकसुद्धा वापरत नाहीत म्हणजे काय! त्यासाठी वाट्टेल ती कारणं सांगतात ही मंडळी.

काहीजणांनी परवा फेसबुकमधून होणाऱ्या डेटाचोरीवर बोट ठेवलं. होईना का चोरी! नाहीतरी कोणत्या बाबतीत सुरक्षित राहिलो आहोत आपण आजकाल? कधीही, काहीही चोरीला जातं; मग चोरला कुणी थोडासा डेटा, तर बिघडलं कुठं! काल एकजण बातमी नाचवत सांगत होता, की फेसबुकच्या 12 कोटी यूजर्सचा खासगी चॅट कुणीतरी विकला म्हणे! हल्ली हॅकर्स पर्सनल माहितीबरोबरच मजकूर आणिफोटोही विकतायत, असं सांगत होता. “एफबीसेलर’ असंच कंपनीचं नाव ठेवलंय त्यांनी. पण बिघडलं कुठं? काही दिवसांनी आपल्याकडे काहीच गुप्त राहणार नाही. सगळं कसं पारदर्शक होऊन जाईल. अखेर हेही मार्केट आहे! सगळ्यांना सगळ्यांच्या गुप्त गोष्टी विकत मिळतील! गुप्त होईल तो फक्त माणूस… होईना का!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)