अबाऊट टर्न – गळती 

हिमांशू 

गळती… भगदाड… पडझड हे शब्द ऐकून पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे; परंतु तूर्तास या शब्दांना एवढं घाबरण्याची गरज नाही. कारण राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असला तरी हे शब्द जुने वाडे, जुन्या चाळी, असुरक्षित इमारती, वेडीवाकडी झाडं, कुंपणभिंती, धरणं, बंधारे आदींशी संबंधित असतीलच असं नाही. हे शब्द सध्या वर्तमानपत्रांत दररोज छापून येत असले, तरी त्याचा पावसाशी संबंध असेलच असं नाही. धरणं भरतात, ओसंडतात, सांडव्यावरून पाणी वाहू लागतं, दरवाजे उघडले जातात, क्‍युसेक मोजून पाणी सोडलं जातं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो इत्यादी वगैरे दरवर्षी घडतं. जुन्या इमारती पडतात, माणसं मरतात, जखमी होतात, उरलेल्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जातं, भिंती खचतात, वाडे पडतात, माणसं दबून-घुसमटून मरतात हेही दरवर्षी घडतं. काही ठिकाणी धरणांना गळती लागते, पाण्याचे फवारे उडत असल्याचं टीव्हीवर बघून आपण दूर असलो तरी घाबरतो, संबंधित धरणाच्या क्षेत्रात राहणारी माणसं तोफेच्या तोंडावर उभी असल्याप्रमाणं रात्री जागून काढतात, हेही नेहमीचंच! आज तुमच्यावर, उद्या आमच्यावर वेळ येणार असं एकमेकांना सांगत बचावलेल्यांनी जगायचं असतं. सुपातून जात्यात जाण्याची वाट बघायची असते. दरडीला हात जोडून घाटातून आणि गर्दीला हात जोडून लोकलमधून प्रवास करायचा असतो. रोज मरे त्याला कोण रडे?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर सांगायचा मुद्दा एवढाच, की यंदाचा पावसाळा वेगळा आहे. असा पाऊस, अशी गळती, अशी भगदाडं आणि अशी पडझड क्वचितच पाहायला मिळते, दोस्तांनो! दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षाप्रमाणं दर पाच वर्षांनी पाहायला मिळणारा हा पावसाळा आहे. मार्केटमध्ये मंदी असल्यामुळे पावसाळी पर्यटनस्थळांवर यंदा गर्दी कमी आहे, अशी ओरड होत असली तरी पावसाळा एन्जॉय करण्याची तजवीज झालीय. निसर्गापुढे मुंबईकर कितीही हतबल, असुरक्षित असले तरी कर्नाटकातून मुंबईत आलेले आमदार नैसर्गिक आणि मानवी आपत्तींपासून पूर्णतः सुरक्षित आहेत. मुंबईकर पाण्याच्या वेढ्यात आणि हे आमदार पोलिसांच्या वेढ्यात आहेत. वाशिष्ठी, जगबुडी वगैरे नद्यांना पूर येऊन मुंबई-गोवा हायवे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद झाला असला तरी बंगळुरू-मुंबई-गोवा हे राजकीय कनेक्‍शन तुटलेलं नाही. गोव्यातसुद्धा पडझड, गळती वगैरे सुरू झालीय. आमदारांची गिणती, स्वतंत्र गट वगैरे घटनाक्रमाला तिथंही पावसाळ्यातल्या सागराप्रमाणेच उधाण आलंय. ज्यांना पावसामुळे घराबाहेर पडता येत नाही, त्यांना राजकारणातले जादूचे प्रयोग घरबसल्या पाहता यावेत अशी व्यवस्था टीव्ही चॅनेलवाल्यांनी केली. पावसाळा महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा आहे तो त्यानंतर येणारा हिवाळा. महाराष्ट्रातल्या महामुकाबल्याचा सीझन! म्हणूनच महत्त्वाची आहे राजकारणातली पावसाळी पडझड आणि गळती!

पडझड शेजारच्या राज्यांमध्ये होत असली, तरी भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातच आहे, असा काही भूगर्भतज्ज्ञांचा अंदाज आहे. ज्यांनी आजपावेतो आपापला किल्ला मेहनतीनं लढवला, असे अनेक शिलेदार तहाची बोलणी करू लागलेत म्हणे! लढायचं, जिंकायचं आणि सत्तेपासून दूर राहायचं, हे कसं चालेल? स्थानिक पातळीवर अनेकदा सत्तेसाठी शत्रूपक्षाशी हातमिळवणी करून बंधाऱ्यांची गळती तात्पुरती रोखलेली… आता मुख्य धरणाला भगदाड पडलं तर सांगायचं कुणाला? तात्पर्य, पावसाळी गळती हा केवळ ट्रेलर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)