अबाऊट टर्न : कायापालट   

हिमांशू 

“वर्क फ्रॉम होम’चा हल्ली खूपच बोलबाला आहे. बऱ्याच जणांना कुणाचं तरी बॉसिंग असलेलं आवडत नाही. अर्थात, हा पर्याय निवडण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात; पण सामान्यतः घरबसल्या काम केलं तर मोकळेपणाही जाणवतो आणि घराकडे लक्षही राहतं. शिवाय, हल्ली एक कम्प्युटर आणि इंटरनेटचं कनेक्‍शन असलं की घरबसल्या करण्याजोगी अनेक कामं मिळू शकतात. प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अशी कामं मिळतात. बॉसिंग आवडत नाही म्हणून हा पर्याय निवडणारे असू शकतात; पण एखादा बॉसच जेव्हा हा पर्याय निवडतो, तेव्हा अनेकांचे कान टवकारतात. बॉससुद्धा साधासुधा नाही, संपूर्ण राज्याचा बॉस! मध्य प्रदेशचे नूतन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या घराचं नूतनीकरण याच दृष्टीनं प्रस्तावित आहे. अर्थात, त्याला नूतनीकरण म्हणण्यापेक्षा “कायापालट’ म्हणणं अधिक श्रेयस्कर ठरेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री बदलले की मुख्यमंत्री निवासात बदल होतच असतात. केंद्रातल्या किंवा राज्यातल्या कोणत्याही नव्या मंत्र्याला आपल्या सरकारी बंगल्यात बदल करून घ्यावेसे वाटतात. त्यावर अतोनात खर्च होत असतो आणि त्याची चर्चाही होत राहते. अर्थात, सरकारी बंगल्यात मनाजोगे बदल करून घेण्याच्या या वृत्तीला काही सन्माननीय अपवादही असतातच. सोमनाथ चटर्जींना जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षपदासोबत सरकारी बंगला मिळाला होता, तेव्हा त्यांनाही अपेक्षा विचारल्या गेल्या होत्या. परंतु त्यांनी फक्त पुस्तकांसाठी एक मोठ्ठं रॅक मागितलं!

असो… सगळ्यांकडून हीच अपेक्षा ठेवता येत नाही. परंतु कमलनाथांच्या घराचं नूतनीकरण जरा वेगळं आहे. अनेक कार्यालयीन कामं त्यांना घरबसल्या करायची आहेत आणि त्यासाठी बंगल्यालाच कार्यालयाचा लूक देण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी “वल्लभ भवन’ इमारतीत विस्तारित कक्ष तयार केला होता. 650 कोटींच्या या इमारतीतलं मुख्यमंत्री कार्यालय खूपच सुसज्ज आहे म्हणे! कमलनाथांना कदाचित वेळ वाचवायचा असेल. त्यामुळं “6, श्‍यामला हिल्स’ या निवासस्थानाच्या आवारातच स्टाफरूम असणार आहे. मुख्य सचिव आणि सचिवांसोबत त्यांच्या सहायकांच्या केबिन तिथं असतील. मीटिंग हॉलचं पूर्णपणे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सध्या इथं 75 जणांची बैठक होऊ शकते.

सचिवांच्या केबिनबरोबर त्यांच्या पीएसाठीही खास केबिन तयार होणार आहे. शिवाय ओएसडी, पर्सनल ओएसडी यांचे स्वतंत्र कक्ष होणार आहेत. मुख्य म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या डॉक्‍टरांसाठी स्वतंत्र कक्ष असेल. संपूर्ण परिसरावर कॅमेऱ्यांची नजर असेलच; शिवाय सिक्‍युरिटीवाल्यांसाठी स्वतंत्र मोठा कक्षही असेल. आनंदाची बातमी अशी की, मुख्यमंत्र्यांनी “जन शिकायत कक्ष’ तयार करायचं ठरवलंय. भेटायला कार्यालयाऐवजी सर्वांनी घरीच यावं, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असावं. त्यामुळं व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपीसह तीन वेटिंग रूम बांधल्या जाणार आहेत.

तब्बल अठरा वर्षांनी कॉंग्रेसला मध्य प्रदेशात सत्तेचा चेहरा दिसलाय. 2003 मध्ये कॉंग्रेस सरकार गेल्यानंतर उमा भारती मुख्यमंत्री झाल्या आणि याच बंगल्यात राहिल्या. त्यानंतर बाबूलाल गौर आणि 2005 पासून शिवराजसिंह चौहान याच बंगल्यात राहिले. या कालावधीत या बंगल्यानं बरेच बदल पाहिलेत. परंतु कमलनाथ यांनी सुचवलेले बदल झाल्यानंतर “हाच का तो बंगला,’ असं विचारावं लागणार आहे. कमलनाथांना त्यांच्या “वर्क फ्रॉम होम’ इनिंगसाठी शुभेच्छा देण्यावाचून आपल्या हातात काही आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)