अबाऊट टर्न: कर्तव्य!

हिमांशू

राजकारण हा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. देशभरातल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेण्याच्या प्रयत्नांना दरवेळी काही ना काही कारणानं खीळ बसत असल्यामुळं हरघडी देशात कुठे ना कुठे निवडणुकांचं वारं असतंच. “राजकीय वातावरण तापलं’ ही हेडलाइन ओघानंच देशभरात सतत फिरत राहते. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे सोशल मीडियाचं आगमन झालं आणि त्यानंतर आपली “राजकीय सजगता’ अचानक वाढली. याचा अर्थ, लोकशाहीविषयीची आमची समज वाढली, असा मात्र कुणी घेऊ नये.

राजकीय सजगता आणि लोकशाहीची समज या भिन्न गोष्टी असल्याचं मान्य करायलाच हवं. सोशल मीडियावरून जी राजकीय सजगता दिसते, तिचा लोकशाहीशी काडीमात्र संबंध नाही. जिथं सामान्यतः कुणी कुणाचं मत ऐकत नाही आणि आपलं मत बदलत नाही, त्या अभिव्यक्ती माध्यमाला आम्ही सोशल मीडिया असं नाव दिलंय. मत मांडण्याची मोकळीक मिळलीय; पण मत ऐकण्याची कुठं मिळालीय? असो. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की सोशल मीडिया आल्यापासून पहिली निवडणूक कधी संपली आणि दुसरी कधी जवळ आली, हेही कळेनासं झालंय. पाच वर्षें निवडणूकच चाललीय असं वाटतं. सध्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांनी सोशल मीडिया गाजतोय, हे जितकं खरं तितकंच त्या निवडणुकांमधला मतदानाचा टक्का वाढलाय, हेही खरं. याला लोकशाहीची समज वाढणं म्हणता येईल.

मतदान हा हक्क आहे आणि कर्तव्यही आहे, असं बरीच वर्षं सांगितलं जातंय. परंतु मतदानाविषयी जागरूकता फारशी वाढीस लागली नाही. मतदानाचा दिवस उजाडला की, माध्यमांचे कॅमेरे कुठल्यातरी आजीबाईंना शोधू लागतात.
वयाचा विचार न करता मतदान करणाऱ्या ज्येष्ठांचे फोटो छापून येतात. हे फोटो बघून आपण मतदान न केल्याबद्दल संबंधितांना वैषम्य वाटावं, हा त्यामागचा हेतू असतो. कधी नवविवाहित नवरदेव लग्नाचा पोशाख घालून घोड्यावरून तसाच मतदानाला येतो आणि भाव खाऊन जातो, तर कधी लग्नादिवशी वधुवर एकत्र मतदान करून मग लग्नाचा मुहूर्त गाठतात. पण मध्य प्रदेशात एक अजबच प्रकार घडला. अशाच एका 26 वर्षीय सजग मतदाराची पत्नी गर्भवती होती आणि ती कोणत्याही क्षणी प्रसूत होईल, अशी परिस्थिती होती. देवासमधल्या मतदान केंद्रावर हा तरुण रांगेत उभा राहिला.

त्याच्याप्रमाणंच इतरांचीही सजगता वाढलेली असल्यामुळं रांग मोठी होती. वारंवार घड्याळात बघून तो थकला; पण रांग सोडली नाही. मतदान केल्यानंतर त्यानं हॉस्पिटलकडे धाव घेतली. मतदान केंद्रापासून हॉस्पिटल 120 किलोमीटर दूर! तो हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्याच्या पत्नीनं मुलाला जन्म दिला होता. जबाबदारी पूर्ण केल्याचा आणि जबाबदारी वाढल्याचा आनंद एकदम!

संबंधित युवक लोकशाहीचा खराखुरा पाईक आहे असं म्हणता येईल. कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकणाऱ्या पत्नीला सोडून तो मतदानाच्या रांगेत उभा राहिला म्हणून नाही, तर जन्मलेल्या बाळाचं नाव ठेवतानाही त्यानं या क्षणाची आठवण राहील याची दक्षता घेतली. त्यानं बाळाचं नाव ठेवलंय “मतदान’! आपली लोकशाहीविषयक सजगता अशा प्रकारे लोकांपुढे ठेवणारा हा बहाद्दर एकटाच! त्याचं “मतदान’ नावाचं बाळ जसजसं मोठं होईल, तसतशी लोकशाही समृद्ध होईल, अशी आशा करूया!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)