#अबाऊट टर्न : करमणूक..? 

– हिमांशू 

अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याप्रमाणे करमणूक हीसुद्धा एक महत्त्वाची गरज. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक काळात माणसानं आपल्या करमणुकीसाठी वेगवेगळी साधनं शोधून काढल्याचं दिसतं. करमणुकीचा संबंध मनाच्या समाधानाशी असतो. किंबहुना तसा तो असावा, हे अपेक्षित आहे. याखेरीज ज्ञानवर्धन, जाणीवजागृती, वास्तवाचं भान असे हेतू करमणुकीच्या माध्यमातून पूर्ण झाल्यास ते अधिक फलदायी ठरतं. फार पूर्वीपासून माणसानं बैठ्या खेळांपासून करमणुकीची अनेक साधनं शोधून काढल्याचं इतिहास सांगतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिथपासून आजच्या इंटरनेट युगापर्यंत ही साधनं जशी बदलत गेली, तशाच माणसाच्या अपेक्षाही बदलत गेल्या. आज अभिव्यक्तीची अनेक माध्यमं आपल्या हातात असल्यामुळं दुसऱ्याची कला पाहण्याऐवजी आपली कला जास्तीत जास्त लोकांनी पाहावी, असं अनेकांना वाटू लागलंय. “एन्टरटेन्मेन्ट’ हा शब्द आजकाल “एक्‍साइटमेन्ट’चा समानार्थी शब्द म्हणून वापरला जाऊ लागलाय. कलाकार त्यामुळं “कल्लाकार’ बनलेत आणि त्यांचा “कल्ला’ आपल्याला कला म्हणून नाइलाजानं पाहावा लागतोय. तेही एकवेळ सहन करता आलं असतं. परंतु करमणुकीची साधनं प्रचंड संख्येनं उपलब्ध असूनसुद्धा अनेकांच्या मनाला समाधान मिळत नाही, ही परिस्थिती गंभीर आहे. हे समाधान वेगवेगळ्या चॅलेंजेसमध्ये शोधण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू झालीय आणि हे विश्‍व नॉर्मल माणसाच्या आकलनापलीकडचं आहे.

कीकी चॅलेंज नावाचा वेडगळ प्रकार परदेशांतून भारतात घुसण्याच्या तयारीत आहे आणि असल्या करामती कराल तर कारवाई करू, असा इशारा पोलिसांना द्यावा लागलाय. विशेषतः मुंबईत हे फॅड सुरू होण्याची भीती पोलिसांना वाटतीय. चालत्या गाडीतून खाली उतरायचं. दरवाजा उघडाच ठेवायचा. आत मोबाइल कॅमेरा सुरू असतो. गाडीतल्या डेकवर सुरू असलेल्या गाण्याच्या तालावर रस्त्यातच नाचायला सुरुवात करायची. मग चालत्या गाडीत चढायचं. डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा आणि जास्तीत जास्त लाइक्‍स मिळवायचे, असं हे चॅलेंज. ज्यांच्याकडे सगळं आहे, कशालाच तोटा नाही, अशांची ही तऱ्हा, तर सामान्य घरातली पोरं लोकलमध्ये स्टंट करतायत. धावत्या लोकलच्या दरवाज्याला लटकून ही मंडळी आता थांबत नाहीत, तर टपावर चढण्याचा प्रयत्न करू लागलीत. त्याचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करतायत.

पावसाळी पर्यटनाच्या हंगामात धबधबे आणि कड्यांवर उभं राहून सेल्फी काढणं, फेसबुक लाइव्हसाठी व्हिडिओ करणं, त्यासाठी एका हातात मोबाइल घेऊन त्यात आपली छबी न्याहाळत धोक्‍याकडे पाठ करून कुठेतरी लटकणं ही “करमणूक’ असेल तर प्रश्‍नच मिटला! परंतु “ऍडव्हेंचर’ ही पूर्णपणे स्वतंत्र गोष्ट असून, त्यासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षणाची गरज असते आणि ते देणाऱ्या संस्था भरपूर आहेत, हे जाताजाता सांगायला हरकत नाही.

करमणुकीचं रोज एक नवं फॅड मार्केटमध्ये येत असून, त्यामुळं पोरंबाळं घराबाहेर पडताना पालकांच्या छातीत धडकी भरणारच. नव्याचा स्वीकार हे प्रगतीचं लक्षण, यात दुमत नाही. परंतु या प्रक्रियेत अक्कल गहाण टाकली जात असेल तर हस्तक्षेप हवाच. पोकेमॉन गो आणि ब्लू व्हेलनं असाच उच्छाद मांडला होता. आता कीकीची धास्ती! आपल्या गेममुळं आत्महत्या करणारे लोक हा पृथ्वीवरचा “जैविक कचरा’ आहे, हे ब्लू व्हेलच्या निर्मात्याचं कोर्टातलं भाष्य विचारात घ्यायला हरकत नसावी!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)