अबाऊट टर्न: कंठशोष…

हिमांशू

खवचट पुणेरी पाट्या पाहून हसताना लॉजिकचा वगैरे विचार न करणाऱ्या मंडळींना परवा हसता-हसता अचानक ठसका लागला. “जेवताना सावकाश जेवा… ठसका लागल्यास पिण्यासाठी पाणी नाही,’ अशी पाटी कुणी घरावर लावेल, याची यत्किंचित कल्पना नव्हती. एक दिवस नळाला पाणी आले नाही, तर वॉर्डात रास्तारोको करण्यासाठी हंडे-कळशा डांबरी रस्त्यावर नेऊन ठेवणाऱ्यांना ही पाटी वाचताक्षणी किमान ठसका तरी लागणे अपेक्षित आहेच! “जेवण मागा; पण पाणी मागू नका,’ अशा पाट्या घराच्या दारावर लावण्याची वेळ ज्यांच्यावर आली त्यांच्याविषयी, त्यांच्यापासून दूर राहून आपल्याला कदाचित काही वाटणार नाही. पण लक्षात असूद्या, याच पाट्या आपल्याही घरावर काही दिवसांनी लागणार आहेत.

पाणीटंचाईची परिस्थिती इतकी भीषण असतानासुद्धा ही मंडळी अजून पाहुण्यांना किमान जेवायला बोलावताहेत, हे त्यांचे मोठेपण! घरात पाण्याचा टिपूस नसेल, तर आपण असे आमंत्रण तरी देऊ शकू का? पण औरंगाबाद जिल्ह्यात नेवासे तालुक्‍यातल्या एका लहानशा गावात पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या पाट्या “अशा शब्दांत’ लागल्यात. कोणत्या आशा-अपेक्षा ठेवून या गावच्या मंडळींनी यंदा मतदान केले असेल? “पाणी देणारच,’ असे आश्‍वासन या गावाला पूर्वी कधी मिळाले नसेल? आली असेल का गावात पाणीयोजना? असेल तर ग्रामस्थांना यंत्रणेने “पाणी’ पाजले असेल की कंत्राटदाराने?

तिकडे मनमाडमध्ये तर कमालच झाली! “आमच्या टाकीतले पाणी चोरीला गेलंय,’ अशी तक्रार घेऊन एकजण पोलीस ठाण्यात गेला. हा गुन्हा कोणत्या कलमाखाली दाखल करायचा, असा प्रश्‍न पोलिसांना पडला. तब्बल 21 दिवसांनी एकदा पाणी येतंय मनमाडमध्ये! पाणी आलं की बायाबापड्या दिसेल त्या भांड्यात पाणी साठवून ठेवताहेत. अगदी कुकरमध्येसुद्धा! घराच्या छतावरची 500 लिटरची टाकी भरून ठेवली होती. परंतु त्यातले 250 लिटर पाणी कमी झाल्याचे त्यांना दिसून आले. मिळालेल्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल खात्री नसल्यामुळे या टाकीतल्या पाण्यावर संबंधितांनी शुद्धीकरणाची प्रक्रियाही करून ठेवली होती.

आता किमान काही दिवस प्यायला तरी पाणी मिळेल, असे वाटत असतानाच ही चोरी झाली. “रात्र वैऱ्याची आहे; जागे राहा,’ असे म्हणत लोकांनी आता पाण्याच्या राखणीसाठी जागायचे का? पोलीस तरी पाणीचोरांना कसे पकडणार? त्या पोलिसांना तरी प्यायला पाणी मिळत असेल का? महाराष्ट्राच्या गावागावात सध्या ही परिस्थिती दिसतेय आणि आपण मात्र मिळालेले पाणी कसेही वापरतोय; वाया घालवतोय. काही गावांमध्ये बाजल्यावर किंवा कढईत बसून लोक आंघोळ करताहेत आणि ते पाणी साठवून त्यात कपडे धुताहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात यावर्षी 14 एप्रिलला अखेरचा पाणीपुरवठा झाला. पाणी संपलेले ते जगातले पहिले शहर ठरले. ही वेळ मुंबईवर किंवा पुण्यावर कधी येणारच नाही, असे आपले ठाम मत असेल तर आनंद आहे! परंतु आपण वाळवंटीकरणाच्या आणि भयावह पाणीसमस्येच्या उंबरठ्याशी उभे आहोत, हे सरकारच्या नीती आयोगापासून सगळ्यांनी सांगितलंय. निवडणुकीच्या गदारोळात एकमेकांना पाणी पाजू इच्छिणाऱ्यांनी प्रचारादरम्यान हा विषय चर्चेतसुद्धा येऊ दिला नाही… हार्दिक अभिनंदन!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)