अबाऊट टर्न: ऑफर

हिमांशू

“ऑफर’ हा शब्द ऐकताक्षणी बरेचजण रोमांचित होतात.”फ्री’ किंवा “डिस्काउंट’ शब्द ऐकल्यावर बरेचजण युद्धावर निघाल्यासारखे खरेदीला निघतात. अर्थात “मोफत’ म्हणून सांगितली गेलेली वस्तूही कधीच मोफत मिळत नाही, ही साधी गोष्ट कुणाला कळत नाही, असं नाही. “फ्री’ वस्तूची किंमत कोणत्या ना कोणत्या मार्गानं वसूल केली जाते, हे जवळजवळ प्रत्येकाला एव्हाना समजलेलं आहे. परंतु तरीही “फ्री गिफ्ट’ मिळवल्याचा किंवा एखादी महागडी वस्तू “स्वस्तात’ मिळवल्याचा आनंद अवर्णनीय असतो. अशा छोट्या-छोट्या सुखांची जमवाजमव करून सामान्य माणूस जगण्याचा आनंद घेण्याची धडपड करत असतो. हे जे इवलंसं सुख असतं, त्याचा गैरफायदा घेण्यासाठी बरेचजण टपलेले असतात. कितीतरी फायनान्स कंपन्या लोकांची घामाची कमाई लुटून सुंबाल्या करतात. परंतु दरवेळी दामदुप्पट, तिप्पट मिळण्याचं आमिष लोकांना अशा फसव्या जाहिरातींकडे आकर्षित करतच राहातं.

फसवणाऱ्यांनाही दरवेळी नवेनवे फसणारे मिळत राहतात. आजकाल बरेचजण “ऑनलाइन’ जगतात; त्यामुळं या ऑफर्ससुद्धा थेट मोबाइलच्या स्क्रीनवर येऊन थडकतात. डिस्काउंटची टक्‍केवारी सांगितली जाते आणि ऑर्डर नोंदवण्यास प्रवृत्त केलं जातं. “ऑनलाइन’ वस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवहारांत फसवणुकीचं प्रमाण किती टक्‍के आहे, याची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. परंतु छोटा आनंद शोधणारी माणसं त्याकडे लक्ष देत नाहीत आणि दरवेळी नव्या प्रलोभनांना बळी पडतात. अशा वेळी लोकांची विचारशक्तीच गायब होते की काय, असा संभ्रम निर्माण होतो.

एखादी कंपनी दिवाळी संपल्यावर लगोलग एखादी ऑफर कशी जाहीर करू शकेल? हा साधा प्रश्‍नही अनेकांना पडला नाही. एका प्रतिष्ठित ई-कॉमर्स कंपनीच्या नावानं एक मेसेज फिरू लागला. “पोस्ट-दिवाळी ऑफर’ हे शीर्षकही कुणाला खटकलं नाही. कदाचित संबंधित कंपनीनं दिवाळीसाठी बराच माल खरेदी केला असेल आणि त्यातला बराच शिल्लक राहिला असेल. आता कंपनी हा माल स्वस्तात विकत आहे, असं वाटणंही स्वाभाविक मानता येईल. परंतु डिस्काउंटची टक्‍केवारी किती असावी? ही ऑफर चक्‍क 99 टक्‍के डिस्काउंटची होती. ही “पोस्ट-दिवाळी ऑफर’ म्हणायची की “प्री-दिवाळं ऑफर’? डीएसएलआर कॅमेरा अवघ्या 199 रुपयांत, मोबाईल अवघ्या 1799 रुपयांत, महागडं घड्याळ तर फक्‍त 11 रुपयांत! माल कितीही पडून राहिला तरी इतक्‍या कमी किमतीत कुणी विकणार नाही, याची सुज्ञ जाणीव ज्यांना झाली, ते तरले. त्यातल्याच काहींनी या ऑफरमागचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि बाहेर आलेलं वास्तव डोक्‍याला मुंग्या आणणारं होतं.

मोबाइलमधला डाटा चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींचा हा डाव होता, असं उघड झालं. या ऑफरवर एक लिंक देण्यात आली होती. तिला स्पर्श केल्यावर एक ऑर्डर फॉर्म येत होता. तो भरून पाठवला की, तुमची खासगी माहिती गायब झालीच म्हणून समजा! तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अशा वेबसाइट अगदी स्वस्तात तयार करता येतात. परंतु एकदा लोकांची पर्सनल माहिती हाती लागली की तिची मोठी किंमत मिळते. आपण फसलो तर दोष फसवणाऱ्यांचा की आपला?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)