अबाऊट टर्न: एन्ट्री…

हिमांशू

दारू ही दिवसेंदिवस वाढत चाललेली एक जटिल समस्या आहे. दारूमधून सरकारला महसूल मिळत असल्यामुळं दारूबंदीविषयी सरकार उदासीन असतं, असा आरोप नेहमी करण्यात येतो. काही द्रष्ट्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तर दारूतून मिळणाऱ्या महसुलाशिवाय राज्य चालवणं शक्‍य आहे, असंही सांगून पाहिलं. इतक्‍या छातीठोकपणे एखादा जाणकार हा दावा करतो म्हणजे, नक्की असं एखादं आर्थिक मॉडेल तयार करता येऊ शकतं. परंतु हे काम कदाचित दारूबंदीपेक्षा जटिल असावं आणि त्यामुळंच सरकार त्या वाटेला जात नसावं. एकदा महामार्गालगतची दारू दुकानं बंद करून पाहिली; पण त्यामुळं बुडणाऱ्या उत्पन्नाचा सेस बरेच दिवस पेट्रोल-डिझेलवर लावूनसुद्धा अखेर ही दुकानं पुन्हा उघडलीच.

गावात किंवा शरीरात दारू एकदा शिरली की तिचे परतीचे दरवाजे आपोआप बंद होतात. अशा स्थितीत व्यसनमुक्‍ती कशी करावी, याबद्दल सामान्यतः दोन मतप्रवाह आहेत. दारूचं व्यसन हा एक आजार समजून त्यावर उपचार करावेत, प्रबोधन करावं म्हणजे दारूविक्री सुरू आहे की बंद आहे, यामुळं काही फरक पडणार नाही, असं एक मतप्रवाह मानतो. दुसरा मतप्रवाह दारूचा येण्याचा मार्गच बंद करावा असा आग्रह धरणाऱ्यांचा आहे. दोन्ही मार्गांना आजवर मिळालेले यश आणि दारूच्या प्रसाराचा वेग हे न जुळणारं गणित आहे. त्यामुळंच हे न सुटणारं कोडं बनलंय.

परवाच इंदापूर तालुक्‍यातल्या एका गावात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं भाषण सुरू होतं. कार्यक्रम सुरू असतानाच त्यांना गावकऱ्यांनी एक निवेदन दिलं. अवैध रीतीनं होणारी दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यात होती. दारू बंद कशी करायची? या मार्गानं की त्या मार्गानं? या चिंतेत कदाचित अजितदादा पडले असावेत. त्यांनी भाषणात या समस्येचा उल्लेख केला आणि व्यसनाधीन होऊ नका, असा सल्ला उपस्थितांना दिला. नेमक्‍या त्याच वेळी एकजण स्टेजसमोरूनच डुलत डुलत गेला. काय म्हणावं या समयसूचकतेला! अजितदादांनी आधी कपाळावर हात मारला आणि नंतर आकाशाकडे पाहून म्हणाले, “”ब्रह्मदेवा, तू जरी खाली आलास तरी हे लोक सुधारायचे नाहीत.

”वास्तविक, अवैध दारूची वाट रोखणं फारसं सोपं नाही, हे अजितदादांना ठाऊक असणारच. ज्या गावांमध्ये दारू दुकानं बंद होतात, तिथं मागल्या दारानं आणि चढ्या दरानं दारू पुन्हा दाखल होतेच. पूर्वीचीच दारू अधिक महाग मिळू लागल्यामुळं तळीरामांच्या कमाईतला घरात जाणारा हिस्सा आणखी कमी होतो. पोलीस तरी किती ठिकाणी आणि किती वेळा छापे टाकणार? दारू दुकान बंद झालं म्हणून गावातल्या बायाबापड्या सुखावतात; पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकत नाही.

कदाचित त्यामुळंच गावकऱ्यांना सल्ला देणं अजितदादांना अधिक सोपं वाटलं असावं. माणसं व्यसनाकडे वळली नाहीत, तर वैध-अवैध मार्गानं आलेली दारू त्यांच्या संसारात विष कालवू शकणार नाही. अशा स्थितीत ते व्यसनाधीनतेविषयी बोलत असतानाच तळीरामानं एन्ट्री घ्यावी, इतकं परफेक्‍ट टायमिंग एखाद्या विनोदी अभिनेत्यालाही साधलं नसेल! दारूची एन्ट्री रोखणं फारसं सोपं नाही, याची जाणीव होऊन अजितदादांनी जो मार्ग सांगितला, तोही सोपा नाही, हे खुद्द त्यांनाच दाखवून देणारी ही जबरदस्त एन्ट्री!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)