#अबाऊट टर्न:  आदेश 

– हिमांशू 
आपल्या कार्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे “वरून आलेला आदेश!’ हे शब्द सामान्यतः बोलले जात नाहीत; पण तरीही प्रत्येकाच्या मनात खोलवर रुतून बसलेले असतात. मग तो सरकारी खात्यातला कारकून असो किंवा फक्‍त ब्रॅंडेड कपडे घालणारा कॉर्पोरेट कंपनीतला कर्मचारी असो. आपल्याकडे कार्य सिद्धीस नेण्यासाठी अनेकांच्या प्रतिभा, प्रयत्न आणि कल्पना यांच्या एकत्रीकरणातून उन्नत होत जाणाऱ्या प्रक्रियेची कुणाला गरजच वाटत नाही. त्यामुळं तशी सांघिक प्रयत्नांची संस्कृती रुजणं जरा अवघडच! सरकारी कर्मचारी साहेबानं दिलेलं काम निष्ठेनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो तर कॉर्पोरेट कर्मचारी आपण आज्ञाधारक आहोत, हे आपल्या “इमिजिएट बॉस’ला पटवून देण्यासाठी जिवाचं रान करतो.
कल्पक असण्यापेक्षा आज्ञाधारक असण्याला आपल्याकडे अधिक महत्त्व आहे. परिणामी, समाजपुरुषाची शिर आणि धड अशी मस्त विभागणी झाली आहे. डोक्‍याकडून आदेश येतात आणि हातपाय त्या आदेशांचं पालन करीत राहतात. ही प्रक्रिया सुरू राहिली तरच आपल्याला उपजीविकेची आणि प्रगतीची आशा आहे, असा समज दृढ झाला आहे. परिणाम असा की, अनेकांच्या अंगी वेगळी क्षमता असतानासुद्धा नेमून दिलेलं कामच करावं लागतं तर अनेकांची बहुपदरी क्षमता कधीच पूर्णपणे वापरली जात नाही. आदेशाचा आवाजच एवढा मोठा की, सूचना-हरकती मौनच होतात.
ही संस्कृती राजकीय क्षेत्रात सर्वाधिक पाहायला मिळते. एकचालकानुवर्तित्वाचा आरोप एकमेकांवर केलेल्या सर्वच राजकीय पक्षांची हीच स्थिती! गल्ली पातळीपासूनचे सर्व युवा आणि जुने-जाणते नेते केवळ त्या पोस्टरवरच कर्तृत्ववान दिसतात. “वरून आदेश’ आला की तेही “आज्ञाधारक’ बनतात. “कामाला लागा’ असा आदेश आल्यावर निवडणूक जवळ आल्याची आठवण त्यांना होते. पूर्वी महाराष्ट्रातले नेते प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीकडे डोळे लावून बसतात, असा आरोप कायम होत असे. मुख्यमंत्रीसुद्धा दिल्लीतून निवडला जात असे आणि बदललाही जात असे. या परिस्थितीवर हसणारे आज सत्तेत आहेत. पण आजही “वरून आदेश आला, तर कोंबड्यालाही अंडे द्यावंच लागेल,’ अशी भाषा ऐकायला मिळते. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अगदी हेच वाक्‍य वापरलं.
“तुम्हाला जे सांगितलं जाईल ते करावंच लागेल आणि घडवून आणावं लागेल. दुसरा पर्याय नाही,” अशा शब्दांत त्यांनी पक्षप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींना “मार्गदर्शन’ केलं. हो, मार्गदर्शनच! कारण, आदेश ऐकणं हाच एकमेव “मार्ग’ असतो आणि तो दाखवण्यासाठीच पक्षात पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. कोंबड्यालासुद्धा अंडे देण्यास भाग पाडणारे आदेश “वरून’ येणार आहेत, हे समजल्यावर कार्यकर्ते चरकले असणार; पण विनोद समजून हसावं लागणं किती करुण ना? भाषा बदलतच असते राजकारणात. पूर्वी दिल्लीकडे डोळे लावून बसणाऱ्या कॉंग्रेसजनांची खिल्ली उडवली आणि आता तसंच “मार्गदर्शन’ करणं नशिबी आलं. भ्रष्टाचाराच्या बाबतीतही भाषा काहीशी बदलल्याचं आता दिसतंय. पूर्वी “चार वर्षांत एकही आरोप झाला नाही,’ अशी भाषा होती. आता “चार वर्षांत एकही आरोप सिद्ध झाला नाही,’ असा किरकोळ बदल करावा लागला. तत्पूर्वी आरोप करणाऱ्यांची खिल्ली उडवून आणि अब्रूनुकसानीच्या नोटिसा पाठवून झालंय. पब्लिकसमोर जायची वेळ आल्यावर किती बदल होतात ना?

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)