अबाऊट टर्न: अश्‍वरंग

हिमांशू

दिवाळीचे कपडे खरेदी करायला जाल, तेव्हा एक प्रश्‍न हमखास विचाराल – कपड्यांचा रंग जातो का? कपडे रंगांमुळं खुलून दिसतात आणि रंग फिका पडताच कामाचे राहात नाहीत. रंगाची कळा उतरली की नवा कपडाही जुना वाटायला लागतो. बहुतांश विक्रेते तुम्हाला कपडे धुण्याच्या टिप्स देतील. पहिली धुलाई घरी न करता ड्रायक्‍लिनिंग करण्याचा सल्ला देतील. रंगांचं आकर्षण आपल्याला नैसर्गिकपणे असतं. गाडी, वॉशिंग मशीन, फ्रीज अशा वस्तू घेतानाही आपण रंगांच्या बाबतीत चोखंदळ असतो आणि रंग फिका पडला की आपल्याला वाईट वाटतं. परंतु ज्या वस्तूंना कृत्रिमपणे रंग दिलेला असतो, तो फिका पडणारच आणि बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही वस्तूचा रंग नैसर्गिक असत नाही. परंतु निसर्गानं दिलेला रंग गेला तर..? कपाळावर हातच मारून घेण्याची वेळ येईल, हो ना? पण अशी एक चमत्कारिक घटना घडलीय खरी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंजाबातल्या एका कुटुंबानं खरेदी केलेल्या घोड्याचा रंग गेला. अंडरवर्ल्डमध्ये किंवा बॉलीवूडमध्ये जी वस्तू “घोडा’ म्हणून प्रसिद्ध आहे, ती नव्हे बरं का! हा खरोखरचा घोडा – चार पायांचा. चौखूर धावणारा. खिंकाळणारा. इतिहासात आपल्या पूर्वजांनी ज्याच्या पाठीवर बसून युद्धं केली किंवा ज्यांच्या शर्यतीवर श्रीमंत माणसं पैसे लावतात, तो घोडा… हॉर्स!
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फरीदकोटच्या करणवीर इंदरसिंह सेखो यांनी घोडेबाजारातून (राजकीय नव्हे) एक तगडा घोडा विकत घेतला. काळ्या रंगाच्या या घोड्याची पैदास उच्च असल्याचं सांगून व्यापारी मेवासिंह यानं त्या घोड्याची किंमत तब्बल 24 हजार रुपये लावलेली. करणवीर यांना घोडा पसंत पडला; पण किंमत परवडेना. शेवटी घासाघीस करून 17 लाख 50 हजार रुपयांमध्ये घोड्याचा सौदा ठरला. करणवीर घोड्याला घेऊन आनंदानं घरी परतले. नंतर त्या घोड्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसू लागले. हा एखादा त्वचेचा आजार असावा, असं त्यांना आधी वाटलं. परंतु हळूहळू तो संपूर्ण घोडाच पांढऱ्या रंगाचा झाला. मेवासिंहची बनवेगिरी उघड झाली. मग त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी मेवासिंह आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केलाय.

पांढऱ्याचा काळा केलेला हा घोडा करणवीर यांच्या तबेल्यात जेव्हा खिंकाळत असेल, तेव्हा आपल्या मूर्खपणावर तो हसत असल्याचा भास करणवीर यांना नक्की होत असेल. पण एकंदरीनं विचार केल्यास फसवणुकीच्या बाबतीत आपल्याकडे लोकांची बुद्धी किती वेगानं “घोडदौड’ करते आहे, हे एवढ्या उदाहरणावरून लक्षात यावं.
विक्रेत्यानं घोड्याच्या रंगाची एका वर्षाची वॉरंटी तर दिलेली नाही ना, हे तपासायला हवं.

बारकाईनं पाहिल्यास या प्रकरणात अक्कलहुशारी आणि धाडस या दोन्ही गोष्टी दिसतात. माणसाला नशीब काढण्यासाठी याच दोन गोष्टींची सर्वाधिक आवश्‍यकता असते. परंतु हे गुण योग्य मार्गानं वाटचाल न करता गुन्हेगारीच्याच अंगानं का चालतात, कळत नाही. पैसे दामदुप्पट करण्याचं आमीष दाखवून ठेवी स्वीकारणाऱ्यांपासून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपर्यंत भलीमोठ्ठी “रेंज’ आपल्याकडे उपलब्ध आहे. उद्या गायीला काळा रंग देऊन म्हैस म्हणून विकल्याची घटनाही समोर येऊ शकते. पण फसवणुकीसाठी वापरलेल्या बुद्धिमत्तेचा रंग अखेर उतरणारच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)