#अबाउट टर्न : भांडण

 – हिमांशू

भांडण कुणाचं, कुणाशी, कधी आणि कोणत्या कारणावरून होईल, हे सांगता येत नाही. सध्याचं वातावरण तसंही सतत उकळतंच असतं. त्यात भरीस भर म्हणून सोशल मीडियाचं खेळणं हातात असतं. त्यामुळं प्रत्यक्ष समोरासमोर येऊन अहमहमिकेनं भांडायची गरजही संपलीय. एकमेकांचा वाट्टेल त्या शब्दांत उद्धार करण्याची सोय हाताशी आहे. आपला चेहरा समोरच्याला दिसत नसल्यामुळं धाडस वाढतं आणि समोरासमोर असताना जे बोललो नसतो, ते आपण सोशल मीडियावर सहज बोलून जातो. या सोशल भांडणांचा आणखी एक फायदा असा की, ही भांडणं क्वचितच पोलिसात किंवा कोर्टात जातात. बहुतांश भांडणं समोरच्याला “ब्लॉक’ करून संपुष्टात येतात. या भांडणांना आपण “फिंगरफाइट’ असं नाव देऊ शकतो. थोडक्‍यात, सोशल मीडियानं माणसाची भांडण्याची शक्‍ती आणि सुरक्षा दोन्ही वाढवलं असलं तरी हातात फोन घेतलेल्या माणसाला सतत विचित्र तणाव जाणवत राहतो. घडत काहीच नाही; पण उगीच डोक्‍यावर टांगती तलवार असल्यासारखं वाटतं. कधीकधी वाटतं, समोरासमोर भेटून कडाकडा भांडून मोकळं झालेलं बरं! पण ते दिवस फार मागे गेले. अर्थात, धावत्या काळाची जाणीव अधूनमधून कधीतरी होतेच आणि खूप पूर्वी घडलेल्या घटना कालपरवा घडल्यासारख्या धडाधड जशाच्या तशा समोर येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेवीस वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका भांडणाची आठवण न्यायालयाच्या एका निकालामुळं ताजी झालीय. घटना पुण्याजवळची. तीन महिलांची नळावर झालेली भांडणं. नळकोंडाळी हे भांडणाचं पारंपरिक ठिकाण. विशेषतः महिलांसाठी. पण या भांडणात एका महिलेनं दुसरीच्या हाताचा चावा घेतल्याचा आरोप होता. हे भांडण पोलिसात आणि नंतर कोर्टात गेलं. “तारीख पे तारीख’ करता-करता तब्बल तेवीस वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. विशेष म्हणजे चावा घेणारी महिला घटना घडल्यापासून आजतागायत फरारीच आहे. फिर्यादी महिलेला दोघींनी मारहाण केल्याची तक्रार होती. त्यातली एक फरारी. दुसरीकडून कोर्टानं एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीचा बॉंड लिहून घेतला आणि सोडून दिलं. तेवीस वर्षांनंतर एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीचा बॉंड लिहावा लागणं ही शिक्षाच की! कारण बॉंड लिहून देणाऱ्या महिलेचं वय आजमितीस 59 वर्षे आहे. अर्थात, या वयाचाच विचार कोर्टानं केल्यामुळं शिक्षेऐवजी बॉंडवर निभावलं. शिवाय, या महिलेवर अन्य कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, याचाही विचार कोर्टानं केला. एका क्षुल्लक भांडणाचा निकाल इतक्‍या उशिरा लागल्यामुळं अनेकांनी भुवया उंचावल्या असतील; पण घटनेच्या गांभीर्यानुसारच खटले सुनावणीस येत असल्यामुळं हा खटला मागे राहिला असणार. अशा प्रकरणात फरारी असलेल्या संशयित महिलेवर कारवाईसाठी पोलीस तरी किती वर्षें प्रयत्न करणार?

क्षणभर कल्पना करा, सोशल मीडियावर कुणाशीतरी आपलं भांडण सुरू आहे. कारण कोणतंही असो. अगदी तुमचा नेता मोठा की आमचा, इतकं साधं कारणसुद्धा चालेल. भांडण इतकं विकोपाला गेलंय, की दोघांनी एकमेकांना “ब्लॉक’ करून टाकलंय. आता दोघेही एकमेकांसाठी “फरारी’ झालो आहोत. तेवीस वर्षांनी अचानक दोघांनाही एकमेकांची आठवण झालीय. दोघांनी एकमेकांना “अनब्लॉक’ करताच पांढऱ्या केसांचा किंवा टकलाचा डीपी दिसतोय… विचार करा! हे चित्र डोळ्यासमोर ठेवूनच बोटं चालवलेली बरी! हो ना?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)