#अबाउट टर्न: पॉवर-प्ले

हिमांशू 
घटस्थापनेच्या मुहुर्तावर दिवाळीचं प्लॅनिंग सुरू करण्याऐवजी चिंतेचा श्रीगणेशा करणं आता हळूहळू सवयीचं झालंय. बोनस किती मिळेल, याबरोबरच तो कधी मिळेल, हा प्रश्‍नही अत्यंत महत्त्वाचा. सामान्यतः बाजारातला उत्तमोत्तम वस्तूंचा स्टॉक संपल्यानंतर बोनस हातात येतो, हा गेल्या काही वर्षांचा आमचा अनुभव. परंतु या चिंतांच्या पलीकडे एक प्रश्‍न आम्हाला यंदा पडलाय. घराचं रंगकाम नुकतंच पूर्ण झालंय. यावर्षी रंगबिरंगी दिव्यांच्या माळा आणून दिवाळीत घर बाहेरून सजवावं असं आमच्या मनात आहे. (किंवा होतं.) माळाही कायमस्वरूपी घरात राहतील, हव्या तेव्हा वापरता येतील हा हिशेब. पण हे दिवे विजेवर चालणारे असतात आणि राज्यातली वीज संपत चाललीय, अशी बातमी वाचली.
अंधारातल्या दिवाळीच्या कल्पनेनं जीव भेदरला. विजेला इंग्रजीत “पॉवर’ म्हणतात आणि “पॉवर’चा एक मराठी अर्थ “सत्ता’ असाही आहे. सत्तेसाठी पाच राज्यांमध्ये ऐन दिवाळीच्या मोसमात रस्सीखेच होणार असून, त्या “पॉवर’च्या खेळात या “पॉवर’ची खेचाखेची होईल, हे ऐकून तर जास्तच भीती वाटली. राज्याला कोळसा कमी पडू लागल्यामुळं जवळजवळ 2100 मेगावॅट वीजनिर्मिती करणारे संच बंद पडलेत म्हणे! नवरात्रोत्सवाबरोबरच भारनियमन सुरू झालंय. काही जणांच्या मते, अनेक भागांत भारनियमन चालू होतंच; पण सांगितलं जात नव्हतं. खरं-खोटं देव जाणे!
आता मात्र भारनियमन करावंच लागणार, हे अधिकृतरीत्या सांगितलं गेलंय. ऑक्‍टोबर हीटमुळं पंखे फिरू लागले, एसीचा वापर वाढला आणि नेमक्‍या वेळी विजेचा तुटवडा! परतीचा पाऊससुद्धा वाकुल्या दाखवून गेला. त्यामुळं शेताला विजेच्या पंपानं पाणी देण्यावाचून पर्याय उरला नाही. यावर्षी महाराष्ट्राची जास्तच कोंडी होईल, असं बोललं जातंय. विजेची टंचाई निर्माण झाली की आपण नॅशनल पॉवर एक्‍स्चेंजकडून वीज विकत घेतो. पण यावेळी तेही अवघड झालंय. कारण ज्या पाच राज्यांमध्ये निवडणूक जाहीर झालीय, तिथल्या सरकारांना वीजटंचाई जाणवू द्यायची नाही. म्हणून ही राज्ये नॅशनल एक्‍स्चेंजकडून जास्त दराने वीज विकत घेऊ लागली.
(सत्तांतर झाल्यास नवीन सरकार याबद्दल पुढची पाच वर्षे जुन्या सरकारच्या नावाने खडे फोडणार हे वेगळे सांगायची गरज नाही! परंतु या राज्यांना आता दुसरा पर्याय राहिलेला नाही.) इतकी महाग वीज आपण घेऊ शकतो का, याचा हिशेब महाराष्ट्र शासनाला मांडावा लागणार आहे. पण पाच राज्यांमधली सरकारे सध्या जात्यात असली, तरी महाराष्ट्रातले सरकार सुपात आहेच की! इथला नागरिक पुढच्याच वर्षी “मतदार’ होणार आहे. त्यामुळं विजेचा महागडा दर आणि नागरिकांची नाराजी ही दोन टोके जोडताना कसरत होणार हे सरकारला दिसू लागले.
स्मारकांसाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा आपण नुकतीच ऐकली. त्यावर टीकाटिप्पणीही बरीच झाली. पण निर्धार म्हणजे काय असतो, हे दाखवून देण्याचेच दिवस सध्या भाषणांमधून तरी दिसताहेत. विजेची ओरड सुरू झाल्यावर भाषणातल्या निर्धाराचे वास्तवात रूपांतर किती आणि कसे होते, हे पाहावे लागणार आहे. पण विजेच्या संकटाला निवडणुकांची पार्श्‍वभूमी लाभल्यामुळे राज्या-राज्यांत एक वेगळाच “पॉवर-प्ले’ सुरू झालाय, एवढे खरं! चला राज्यकर्ते हो, सज्ज व्हा! यंदा बॅटिंग फक्‍त व्यासपीठावर नाही, मैदानावरही करायचीय!
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)