#अबाउट टर्न: परवाना

– हिमांशू

चंद्राला “चांदोमामा’ म्हणणारी आम्ही धरतीची लेकरं आज चंद्रावर वस्ती वसवता येईल का, याचा विचार करतो आहोत. भारताची चांद्रयान-2 मोहीम लवकरच सुरू होणार आहे. तिकडे अमेरिकेनं तर सूर्याच्या दिशेनं यान धाडलंय. सूर्याच्या इतक्‍या जवळ, ज्या ठिकाणी मानवनिर्मित यान कधी गेलं नव्हतं, अशा कक्षेत हे यान सात वर्षे फिरत राहणार आहे. एका खासगी कंपनीनं यानाबरोबर कंपनीच्या मालकाची मोटार मंगळाच्या दिशेनं पाठवलीय.

अवकाशात यानं सोडून अंतरिक्ष पर्यटनाची संकल्पना अनेक खासगी कंपन्यांकडून मांडली जातेय. त्यासाठी बुकिंग सुरू झालंय. काही दिवसांनी वीकेन्डला फिरायला माणसं अंतराळात जाऊ शकतील, असे लेख प्रसिद्ध होतायत. मध्यंतरी कुठल्या तरी कंपनीकडून चंद्रावरच्या जमिनीची विक्री करायचा प्रस्तावही पुढं आला होता म्हणे! बातमी वाचून आम्हाला प्रश्‍न पडला होता की, चंद्रावर प्लॉट पाडून विक्री करणं एकवेळ समजून घेता येईल. पण पृथ्वीच्या या उपग्रहावरच्या जमिनीची मालकी कुणी, कशी आणि कधी ठरवली? अर्थात, ही चर्चा नंतर थंड पडली हा भाग वेगळा… अन्यथा चंद्रावरच्या जमिनीचा मालक शोधून काढण्याच्या हेतूनं का होईना, तिथं प्लॉट बुकिंगसाठी अर्ज करण्याचा विचार आमच्या मनात पक्का झाला होता. पण ती संधी हुकली.

चंद्रावर मानवाला जगता येईल असं वातावरण आहे की नाही? पाणी आहे की नाही? या प्रश्‍नांची उत्तरं मिळायच्या आधीच चंद्रावर सामिष भोजनाची व्यवस्था आहे, असं समजलं तर…? अशक्‍य समजू नका. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग जर कुर्बानीची परवानगी मागत असेल, तर हेही अशक्‍य नाही. मुंबई महापालिकेच्या कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांनी आर्मस्ट्रॉंगला तशी परवानगी देऊनही टाकलीय. तीही ऑनलाइन! मुळात नील आर्मस्ट्रॉंगनं मुंबई महापालिकेकडं अशी परवानगी मागितलीच कशी, हे जाणून घेणं उद्‌बोधक ठरेल. त्याचं असं झालं, की मुंबईच्या देवनार कत्तलखान्यात बकरी ईदनिमित्त बकऱ्या आणि मेंढ्यांची कत्तल करण्याची, त्यांचा व्यापार करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका एका प्राणिमित्र संस्थेनं हायकोर्टात दाखल केली. आधी दिलेले लेखी तसेच ऑनलाइन परवानेही रद्द करावेत, अशी संस्थेची मागणी होती.

याचिकेवर सुनावणी सुरू असताना एका ऑनलाइन परवान्याचे कागद कोर्टासमोर हजर करण्यात आले. ऑनलाइन परवाने देण्याची महापालिकेची प्रणाली किती “तत्पर’ आहे, हे दाखवण्यासाठी संस्थेनंच ही युक्ती केली होती. या मंडळींनी चक्क हायकोर्टाचाच पत्ता ऑनलाइन फॉर्मवर भरला आणि “नील आर्मस्ट्रॉंग’ या नावानं ईदसाठी कुर्बानीचा परवाना महापालिकेकडे मागितला.

विशेष म्हणजे, या नावावर आणि पत्त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परवाना देऊनसुद्धा टाकला. हा सगळा प्रकार कोर्टासाठीही धक्कादायकच होता. “कोर्ट रूम नं. 13, मुंबई उच्च न्यायालय’ या पत्त्यावर नील आर्मस्ट्रॉंगला परवाना देण्यात आला होता. तसे तर ऑनलाइन दुनियेत चमत्कार घडतच असतात. कधी इंदिरा गांधी नरेंद्र मोदींकडून सल्ला घेत असल्याचे फोटो व्हायरल होतात, तर कधी अक्षयकुमार, नाना पाटेकर यांच्या नावासह, फोटोसह फिरणाऱ्या मजकुरामुळं या मंडळींना मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु ऑनलाइन परवाना अर्जाच्या बाबतीत एवढा मोठा चमत्कार घडतो हे मात्र धक्कादायक!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)