#अबाउट टर्न : दहीभात…

– हिमांशू 
मुसळधार पावसामुळं इतर सगळ्या विषयांवर पाणी पडलं; पण राजकारण मात्र सहीसलामत राहिलं. किंबहुना जगातल्या या सर्वांत मोठ्या लोकशाहीत पावसाच्या पाण्याचंही मुसळधार राजकारण झालं. पावसामुळं वादग्रस्त विधानांपासून पंढरीच्या वारीपर्यंत बहुतांश विषय टीव्हीच्या स्क्रीनवरून धूसर झाले आणि सगळीकडे फक्त पाणी-पाणी दिसू लागलं. अर्थात, त्यातही महानगरांमधल्या पाण्यालाच सर्वाधिक प्राधान्य मिळालं. वावरं, गावं बुडाली तर कुणाचं खेटर अडत नाही. पण महानगरांमध्ये मात्र शाळांना सुटी द्यायची की नाही, या प्रश्‍नावरून गहजब माजतो. शिक्षणमंत्री म्हणतात, मुंबईत अतिवृष्टी नाही आणि नागपूरमधून मुख्यमंत्री सांगतात, मुंबईच्या शाळांना सुटी द्या.

इकडे खेडोपाडी मात्र ज्या पोरापोरींना सहा-आठ किलोमीटर चालून शाळा गाठावी लागते, ती एकमेकांचा हात धरून वेगानं वाहणाऱ्या नदीचा प्रवाह कशी ओलांडतात आणि ओल्या युनिफॉर्मसह शाळेत कशी बसतात, याची चित्रं अभावानंच पाहायला मिळतात. मुंबईतलं पाणी जास्त की नागपूरमधलं, यावरून मात्र लगेच हमरीतुमरी सुरू होते. वस्तुतः या पावसानं सगळ्याच महापालिकांचं पितळ उघडं पाडलंय. चॅनेलवाल्यांच्या भाषेत “पोलखोल’ वगैरे केलीय. परंतु तरीही एकमेकांकडे बोटं दाखवण्याचा लज्जास्पद खेळ भरपावसात खेळला गेला. दुसरीकडे, अंबरनाथमधल्या रिक्षावाल्यांनी स्वतः विटा खरेदी करून रस्त्यातले खड्डे भरायला सुरुवात केली. मुंबई असो वा ठाणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर असो…. परिस्थिती एकसमान. यातल्या कुठल्याही शहराच्या महापालित ज्यांची सत्ता नाही, ते पक्ष अखंड कंठशोष करीत राहिले. बाकीचे आवाज थांबले.

कल्याणमधला खड्डा मात्र सगळ्यांच्या पोटात खड्डा पाडणारा ठरला. एकाच खड्ड्यामुळं दोन अपघात झाले आणि दोघांना जीव गमवावा लागला. अवघ्या पाच वर्षांचा आरव हा त्यातला एक दुर्दैवी बळी. त्याचे वडील महेश आठवले त्याला दुचाकीवरून घेऊन जात असताना खड्ड्यामुळं आरव खाली पडला आणि मागून येणाऱ्या ट्रकनं त्याला चिरडलं. शोकमग्न अवस्थेतही या पित्यानं कल्याण-डोंबिवली महापालिकेला पत्र लिहिलं. आपल्यावर आलेली वेळ अन्य कुणावर येऊ नये, अशी विनंती केली; पण सोमवारी त्याच खड्ड्यामुळं पुन्हा एका दुचाकीस्वाराचा तोल गेला. दुचाकीवरची महिला रस्त्यावर फेकली गेली आणि मागून येणाऱ्या बसनं तिला चिरडलं. त्याच दिवशी आरवचे वडील या खड्ड्याजवळ आले… आपल्या लाडक्‍या लेकाला आवडणारा दहीभात घेऊन! वेदनांनी तळमळणाऱ्या पित्यानं तो दहीभात रस्त्यावर ठेवला, तेव्हा रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या मनात कालवाकालव झाली. पण आरवला त्यांच्यापासून हिरावून घेणारा तो खड्डा महिन्याभरानंतरही तसाच आ वासून रस्त्यात उभा होता. आरवच्या नंतर आणखी एक बळी घेऊनसुद्धा तो अजूनही तसाच होता.

कुणी, कुणाला आणि काय बोलावं हाच प्रश्‍न आहे. तंत्रज्ञानाचे ढोल आपण पिटतो. त्या तंत्रज्ञानासाठी जगभरातल्या कंपन्यांचे “ग्राहक’ बनून राहतो; पण बदललेली परिस्थिती पाहून माणसांचे जीव वाचवणारं तंत्रज्ञान आम्ही आणू शकत नाही. त्यापेक्षा एकमेकांकडे बोटं दाखवणं सोपं! वाढत्या शहरीकरणाचं आम्ही समर्थन तरी करतो किंवा ते “अपरिहार्य’ तरी मानतो. गावाकडे पिकत नाही, पिकलं तर विकत नाही, म्हणून शहरांत लोंढे वाढतात; पण यंत्रणेला तो भार सोसतो का? खड्ड्याजवळ दहीभात ठेवणाऱ्या बापाच्या नजरेला कुणी नजर भिडवू शकतं का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)