सातारा : अबला मातेच्या मदतीसाठी धावली माणुसकी

सातारकरांनी प्रकट केली मानवी संवेदनशीलता – कराडच्या कल्पना चव्हाण यांना सहानुभूतीची उभारी
सातारा, दि. 14 (प्रतिनिधी)- तीस वर्षापूर्वी सहा महिन्याचे मूल पदरात टाकून नवरा घर सोडून निघून गेला. या दु:खावर मुलाचा चेहरा पाहून मात करणाऱ्या मातेला अखेर मुलाचा आजारपणामुळे मृतदेह पाहण्यास मिळाला. दुर्दैवाची बाब म्हणजे आर्थिक टंचाईमुळे मुलाचा अंतिम संस्कार करणे या मातेला अवघड झाले. अखेर माणुसकीमुळे एकुलत्या एक मुलाचा अंतिम संस्कार करुन जड अंत:करणाने आपल्या घरी परतली.
साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी डोके दुखतंय म्हणून गोटे, ता. कराड येथील कल्पना चव्हाण या मातेने आपल्या 30 वर्षाच्या मुलाला दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारा दरम्यान योगेश मिलिंद चव्हाण मयत झाला. सर्वसाधारण कक्षातून योगेशचा मृतदेह शवागरात ठेवण्यात आला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून त्या मातेचे अवसान गळाले. एवढ्या मोठ्या संकटानंतरही ती माऊली स्तब्ध होती. ही बाब डॉ. कोळी यांना समजताच त्यांनी या मातेची विचारपूस केली असता अंत्यविधीसाठी पैसे नसल्याची धक्कादायक माहिती या मातेने दिली. हे ऐकून शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काळीजसुद्धा हेलावून गेले. अखेर संजीवनी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे रविंद्र कांबळे यांनी हा अंतिम संस्कार करण्याचे ठरवले. शासकीय रुग्णालयात पत्रकारांना बोलवले. तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांनीसुद्धा त्या मातेला आधार देण्याचा प्रयत्न केला. कैलास स्मशानभूमी याठिकाणी मृतदेह घेवून जाण्यासाठी ऍम्ब्युलन्स विनोद विभुते यांनी मोफत दिली. याठिकाणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनीही अंत्यसंस्कारात मदत केली. त्यानंतर त्या मातेला रात्री साताऱ्यातच मुक्कामी ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी अस्थि विसर्जन करण्यात आल्या. आपल्या हाताने या अस्थि विसर्जन करताना कल्पना चव्हाण यांच्या डोळ्यातील आश्रू नदीच्या पात्रात विरुन गेले. आपल्या मुलाच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी पैसे नसल्यामुळे अंत्यंत विमनस्क मनस्थितीत असलेल्या त्या मातेला भाजपचे अमित कदम, जिल्हा न्यायालयातील सुनंदा कदम-चव्हाण, कल्पना जगताप यांनीसुद्धा धीर देवून आर्थिक मदत केली. यावेळी खाकी वर्दीतील माणुसकी पहावयास मिळाली. पोलीस नाईक धनंजय गायकवाड व पोलीस शिपाई प्रविण माने यांनीसुद्धा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी योगदान दिले. जड अंत:करणाने तीन दिवसांपूर्वी आपल्या मुलाच्या उपचारासाठी मुलाला सोबत घेवून येणाऱ्या मातेला एकटेच आपल्या गावी परतावे लागले. त्यावेळी त्या मातेच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)