अफवांमधील पवार

शरद पवारांविषयीच्या राजकीय अफवा ही महाराष्ट्राची नेहमीच एक राजकीय करमणुक असते. खरे तर पवार साहेबांविषयीच्या या अफवांचे पेव आताशा थांबायला हरकत नव्हती. कारण त्यांनी वयाची पंचाहत्तरी नुकतीच पुर्ण केली असून सध्या ते गावोगावी मानपत्रे व सत्कार समांरभ घेत फिरत आहेत. लोकांचे प्रेम आहे त्यांच्यावर. आपल्या हातून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा समारंभ व्हावा अशी गावोगावच्या पुढाऱ्यांची इच्छा असते. त्यांना मान देत पवार साहेब सध्या हे सत्कार घेत असताना त्याला, राजकीय निवृत्तीचे समारंभ असे विशेषण लावण्याचा उद्योग काहींनी केला असला तरी पवार साहेब इतक्‍यात राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसावेत. पवारांच्या या निवृत्तीसदृश काळात आता पुन्हा काही प्रमुख वृत्तपत्रांनी शरद पवार हे एनडीए बरोबर जाणार आणि लवकरच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात सहभाग होणार अशा बातम्या दिल्या आहेत.

लोक पवारांविषयी काहीही बातम्या उठवतात. त्या बातम्यात कितपत तथ्य असते हे खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनाही बऱ्याचवेळा माहिती नसते. त्यामुळे पवारांच्या एनडीएबरोबर जाण्याच्या या वृत्ताचे त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच खंडन केले आहे. ही अफवा आहे आणि अशा अफवा नेमक्‍या कोठून पसरतात हे समजत नाही असे विधान सुप्रियाताईंनी केले आहे. या बातम्यांचे खंडन करताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैचारीक भूमिकेशी कदापिही तडजोड होणार नाही असेही विधान या पक्षाच्या काही नेत्यांनी केल्याचे ऐकिवात आले आहे. इतकी स्पष्ट आणि ठोस पुरोगामी भूमिका मांडूनही लोक अशा कंड्या कशा पिकवतात ते कळत नाही. पवारांचा राजकीय पिंड हा शंभर टक्के खऱ्या पुरोगामीत्वाचा आहे, हा पिंड अशा अफवा पसरवणाऱ्यांनी कधी लक्षातच घेतला नाही. उगाचच काही मागचे संदर्भ लक्षात घेऊन लोक अशा वावड्या उठवत असावेत.

सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला, तथापी त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्यास शिवसेनेने टाळटाळ चालवल्यानंतर खुद्द शरद पवारांनीच, भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी एकतर्फी आणि बिनर्शत पाठिंबा जाहीर केला होता. तसेच पवारांनी या आधीही पुलोदच्या काळात भाजपला बरोबर घेऊन विधानसभेची निवडणूकही लढवली होती. हे जुने संदर्भ लक्षात घेऊन पवार साहेब पुन्हा भाजपशी युती करू शकतात असा समज करून घेऊन काहींनी या अफवा मुद्दाम पसरवल्या असाव्यात. पवार आणि भाजप यांच्यात राजकीय विचारांची फार मोठी दरी आहे ती कधीच सांधली जाण्याची शक्‍यता नाही हे लोकांनी एव्हाना लक्षात घ्यायला हवे होते. या आधी पवारांनी जेव्हा केव्हा भाजपला पाठिंबा दिला आहे किंवा त्यांच्याबरोबर निवडणूका लढवल्या आहेत त्यामागे केवळ राज्याचे हित आणि राजकीय स्थैर्य हीच भूमिका होती तीही या लोकांनी लक्षात घेतलेली दिसत नाही. राजकीय अस्थिरता देशाला परवडणारी नसते असे पवार साहेबांचे नेहमी सांगणे असते. त्यासाठी काही वेळा अशा तडजोडी कराव्या असल्या तरी याचा अर्थ पवारांनी लगेच जातीयवाद्यांशी हातमिळवणी केली अशी हाकाटी पिटण्याची गरज नाही हे त्यांच्या चार दशकांच्या राजकारणांनंतरही लोकांनी लक्षात कसे घेतले नाही याचे आश्‍चर्य वाटल्यावाचून राहात नाही.

मध्यंतरी, म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेच्यावेळी विदेशी वंशाच्या सोनिया गांधी यांना पंतप्रधान होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन कॉंग्रेसशी फारकत घेत पवारांनी स्वताचा वेगळा पक्ष स्थापन केला होता. पण सन 2004 च्या निवडणुकीत वाजपेयींचे सरकार पराभूत झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठीचे पाठिंब्याचे पहिले पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच राष्ट्रपतींकडे पाठवले होते. त्यावेळीही देशाच्या राजकीय अस्थिरतेची चिंता लक्षात घेऊन त्यांनी उदार मनाने सोनियांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यावेळी सोनियांच्या विदेशी वंशांच्या विषयावर ते फार अडून राहिले नव्हते.

आपल्या राजकीय भूमिकेविषयी पवारांना वेळोवेळी अशी तडजोड करावी लागली असली तरी त्या मागे केवळ देशहित आणि राजकीय स्थिरता यालाच सर्वोच्च प्राधान्य असते हे सर्वांनी लक्षात ठेवण गरजेचे आहे. सारासार विचार करून राजकारण करायचे असते, त्यात तत्वांच्या हेकेखोरीपेक्षा व्यवहाराला महत्व द्यायचे असते हा धडा पवार साहेबांनी घालून दिला असला तरी त्यांनी आपला पुरोगामीत्वाचा मूळ राजकीय पिंड कधीही सोडला नाही, ही बाबही सर्वांनी ध्यानात घ्यायला हरकत नव्हती. शरद पवारांचे आणि नरेंद्र मोदींचे कितीही व्यक्तीगत सलोख्याचे संबंध असले तरी ते जो पर्यंत प्रत्यक्ष केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होत नाहींत तो पर्यंत कोणीही अशा अफवांवर विश्‍वास ठेवण्याचे कारण नाही. शेवटी हा पुरोगामी विचारांचा नेता आहे. चार दशके त्यांनी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन जातीवाद्यांना खड्यासारखे दूर करा असे आवाहन सातत्याने केले आहे. त्यामुळे उगाच कुठले तरी जुने संदर्भ घेऊन या पुरोगामी नेत्याविषयी अशा वावड्या उठवण्याला काही अर्थ नाही. जो पर्यंत प्रत्यक्ष शपथविधी होत नाही तो पर्यंत अशा अफवा पसरवणाऱ्यांना काहीच किंमत देण्याची गरज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)