अफगाणिस्तानात भारतीयाचे अपहरण करून हत्या

काबूल – अफगाणिस्तानमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका भारतीयासह तीन परदेशी नागरिकांचे अपहरण केले. तिन्ही अपहृतांची नंतर हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या भारतीयाची ओळख तातडीने जाहीर करण्यात आलेली नाही.

बंदुकधाऱ्यांनी हत्या केलेल्यांमध्ये 39 वर्षीय भारतीयाबरोबरच मलेशियन आणि मॅकडोनियन नागरिकांचा समावेश आहे. ते तिघेही सोडेक्‍सो या खाद्यपदार्थांची सेवा पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्रेंच कंपनीमध्ये आचारी म्हणून काम करत होते. ते सकाळी काबूलमध्ये कंपनीच्या वाहनातून कामासाठी निघाले होते. रस्त्यात चार बंदुकधाऱ्यांनी त्यांचे वाहन रोखले आणि तिन्ही परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले.

-Ads-

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून वाहनाचा चालक कंपनीच्या कार्यालयात पोहचला. त्यामुळे अपहरणाची माहिती समजली. कंपनीच्या प्रशासनाने ही घटना कळवल्यावर पोलिसांनी तातडीने अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. काबूलच्या दुर्गम ठिकाणी कंपनीचे वाहन आढळले. पोलिसांना पाहताच अपहरणकर्त्यांनी दुसऱ्या कारमधून घटनास्थळावरून पयालन केले. कंपनीच्या वाहनात पोलिसांना तिन्ही परदेशी नागरिकांचे मृतदेह आढळले.

त्यांच्या हत्येची जबाबदारी तूर्त कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. अफगाणमध्ये साधारणपणे तालिबान ही दहशतवादी संघटना परदेशी नागरिकांचे अपहरण करते. काही गुन्हेगारी टोळ्याही खंडणी मिळवण्यासाठी अपहरणाचे कृत्य करतात. दरम्यान, भारताने आपल्या नागरिकासह तिघांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. अपहरण आणि हत्येच्या घटनेनंतर काबूलमधील भारतीय दूतावास अफगाण अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)