अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेटचे म्होरके ठार

काबुल – अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे अफगाणिस्तानातील काही म्होरके आणि काही प्रांतिक म्होरके ठार झाले आहेत, असे अफगाणिस्तानातील अमेरिकेचे कमांडर जनरल जॉन निकोल्सन यांनी म्हटले आहे. गुरुवारी अफगाणिस्तानातील खोरसान प्रांत नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अब्दुल रेहमान नावाचा इसिसचा म्होरक्‍या ठार झाला.

अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये अबू सयद नावाचा खोरसान प्रांतातील म्होरक्‍या मारला गेल्यानंतर महिन्याभरातच रेहमानचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये कोणीही लपून राहू शकणार नाही. आम्ही त्यांना शोधून काढू. अफगाणिस्तानातील नागरिकांना ते आता धोकादायक नसतील, असेही निकोल्सन यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील दऱ्या ए पेंच जिल्ह्यात खोरसान प्रांताचे आणखी तिघे कट्टर दहशतवादीही मारले गेले आहेत. एप्रिल महिन्यात अमेरिकेने “मदर ऑफ ऑल बॉम्ब्ज’ नावाचा मोठा बॉम्ब इसिसच्या नानगरहार प्रांतातील छुप्या अड्डयांवर टाकला होता. त्यामध्ये तब्बल 90 दहशतवादी मारले गेले होते.

अफगाणिस्तानमध्ये इसिसचा या वर्षाखेरीपर्यंत पूर्ण पाडाव करण्यात यावा, अशी अमेरिकेची योजना आहे. इसिसने या महिन्याच्या सुरुवातीला हेरात भागात एका मशिदीवर केलेल्या हल्ल्यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)