अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा

प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या सूचना
देहुरोड – श्री संत तुकाराम महाराजांच्या 333 व्या पालखी सोहळयाच्या नियोजन तयारीची माहिती घेण्यासाठी देहूगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात हवेली प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. विविध विभागाची पूर्ण झालेली तयारी व अपूर्ण राहिलेली कामे पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

या बैठकीत प्रशासकीय तयारी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, आरोग्यविभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पीएमपीएमएल, पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, विद्युत विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. मात्र पीएमपीएमएल आणि राज्य परिवहन विभागाचे कोणीही अधिकारी या सभेला उपस्थित न राहिल्याने त्यांना नोटीसा बजावण्याचे तातडीने सूचना देण्यात आल्या. अंतिम आढावा बैठकीला पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसिलदार गीतांजली शिर्के, हवेली पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच राणी मुसुडगे ग्रामपंचायत सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून ग्रामपंचायत प्रशासनाच्या तयारीची माहिती दिली. यंदा पालखी सोहळ्यासाठी 20 टॅकर उपलब्ध होणार असून, ते शुद्धीकरण करून ते संत तुकाराम विद्यालय, एसटी थांबा येथे उभा करण्यात येणार आहेत.

स्वच्छतेबाबत गावात सध्या 130 शौचालयांचे युनिट भाविकांना उपलब्ध आहेत. याशिवाय काही फिरते शौचालये 30 तारखेपर्यंत उपलब्ध होणार आहेत. शासनाने नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयांसाठी तीन रुपये दर आकारणी केली होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दर फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. याशिवाय निर्मलवारी योजने अंतर्गत 600 शौचालयांची मागणी करण्यात आली आहे.

मात्र केवळ 200 उपलब्ध होणार असल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. पाऊसाची शक्‍यता गृहीत धरून गावातील विविध शाळांच्या 71 वर्ग खोल्या वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येलवाडी ते तळवडे हद्द हा गाथामंदिराजवळून जाणारा बाह्यवळण रस्ता खडीकरण करून सुरू करण्यात येणार आहे. याच रस्त्यावर असलेले पार्किंगचे काम पूर्ण झाले असून, पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गावातील भक्‍त निवास काम पूर्ण झाल्याचे सांगितले.

पालखी मार्गावर व देहू-आळंदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्‌डे असल्याचे पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे यांनी सांगितले असता येत्या दोन दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिकेने हे खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याबाबत सूचना दिल्या. विद्युत विभाग, आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. गावातील पाण्याचे स्त्रोत व हॉटेलची तपासणी पूर्ण झाली आहे असून, औषधांचा साठा व कर्मचारी पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पालखी सोहळ्यापर्यंत पुरेशा व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी दिली. पालखी सोहळ्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त असणार असून, गावात “नो हॉकर्स झोन’, लोखंडी अडथळे दोन दिवस असणार लावण्यात येतील. पोलीस बंदोबस्त 3 जुलै ते 6 जुलैपर्यंत असणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक प्रकाश धस यांनी दिली.

पालखी सोहळ्यासाठी अग्नीशमन विभागाची गाडी सज्ज ठेवावी लागेल याबाबत सुचना देण्यात आल्या. भाविकांच्या आंघोळीसाठी नदीला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. नदी पात्रातील मोटारींबाबत प्रश्‍न उपस्थित केला असता त्याबाबत संबधितांशी करार केले असल्याने त्या काढता येणार नसल्याचे प्रांत कदम यांनी स्पष्ट केले. या सभेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन टिळक, महाराष्ट जीवन प्राधिकरणचे धनंजय जगधने, आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने, डॉ. खरात, पोलीस निरीक्षक प्रकाश धस, मंडल अधिकारी शेखर शिंदे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)