अपार्टमेंटच्या जंगलात सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर !

विद्यानगरीतील सेफ्टी टॅंक आजही धोकादायक स्थितीतच

उमेश सुतार
कराड, दि. 5 – कराड शहरानंतर झपाट्याने वाढत गेलेले ठिकाण तसेच विद्येचे माहेरघर म्हणूनही नावारुपास आलेल्या विद्यानगर सैदापूर या उपनगरात हाहा म्हणता सिमेंटच्या जंगलाने सारा परिसर व्यापून टाकला आहे. सहाजिकच शेती असलेल्या शिवारातही आज अपार्टमेंट संस्कृती पाय रोवून उभी आहे. या परिसरात धनधांडग्यांनी मोठमोठ्या अपार्टमेंट उभ्या केल्या खऱ्या.पण भविष्यात येथील सांडपाणी नेमके कुठे जाईल याचे कसलेही नियोजन केल्याचे दिसत नाही. परिणामी याचा त्रास अपार्टमेंटमधील रहिवाशांसह नागरीकांनाही होत आहे. त्यामुळे या अपार्टमेंटच्या जंगलात सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एखदा ऐरणीवर आला आहे. सांडपाण्यासाठी काही ठिकाणी खोदलेले सेफ्टी टॅंकची दयनीय अवस्था लक्षात घेता हे खोदलेले खड्डे आजही धोकादायक स्थितीत असून हे खड्डे थेट मृत्यूलाच आमंत्रण देणारे ठरु लागले आहेत.
विद्यानगर-सैदापूर येथील ज्ञानगंगा अपार्टमेंटच्या ड्रेनेजमध्ये पडून स्वराली पाटील या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना आजही आठवली की, अक्षरश: अंगावर शहारे येतात. वास्तविक अपार्टमेंटच्या तळमजल्यात असलेल्या सेफ्टी टॅंकमध्येच स्वराली मृतावस्थेत आढळून आला होता. या ड्रेनेजच्या चेंबरवर साधी फरशी टाकण्यात आली होती. ती ठेवतानाही योग्य खबरदारी घेतली गेली नसल्यानेच स्वराली टाकीत कोसळली. या दुर्दैवी घटनेनंतर सेफ्टी टॅंकच्या नावाखाली खोदले गेलेले खड्डे किती धोकादायक आहेत, हे समोर आले होते. मात्र या घटनेला दीड ते दोन वर्षाचा कालावधी लोटला असेल, तरीही अशा प्रकारचे धोकादायक सेफ्टी टॅंक अथवा अपार्टमेंट परिसरात असलेले धोकादायक खड्डे ग्रामपंचायतीने कितपत बुजविले, हा संशोधनाचा विषय बनला आहे.
सैदापूर परिसरासह कराड शहराच्या आसपासच्या उपनगरांमध्ये हजारो अपार्टमेंट उभी राहिली आहेत. या अपार्टमेंट परिसरात सर्व भौतीक सुविधा उपलब्ध पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, याठिकाणचा सांडपाण्याचा प्रश्‍न जैसे थे स्थितीत असल्याचे पहावयास मिळते. विद्यानगर हे शैक्षणिक केंद्र असून येथे अनेक शाखांची शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. त्यामुळे याठिकाणी वास्तव्यास येणारा नोकरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाडेतत्वावर घेऊन किंवा खरेदी करुन राहत आहेत. ही सर्व अपार्टमेंट सैदापूर ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येत असल्याने या ग्रामपंचायतीस कराच्या माध्यमातून मोठा महसूल गोळा होत आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजनाच्या अभावामुळे बऱ्याच ठिकाणी गटाराचीही दुरावस्था झालेले चित्र दिसून येत आहे. याठिकाणी भुयारी गटरव्यवस्थाच नाही. त्यामुळे दररोज बाहेर पडणारे पाणी सोडायचे कुठे, हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे अपार्टमेंट उभी करतानाच अनेक ठिकाणी तळमजल्यात सेफ्टी टॅंक खोदण्यात आलेले आहेत. अपार्टमेंटमधील सांडपाणी या टाकीमध्ये साठवले जाते. त्यानंतर दोन किंवा तीन महिन्यांनी त्याचा उपसा केला जातो. अशा सेफ्टी टॅंकला चेंबर काढून त्याठिकाणी फरशा बसविण्यात आल्या आहेत. पाणी उपसा करण्यासाठी वारंवार काढली जाणारी ती फरशी काम झाल्यानंतर व्यवस्थित ठेवली जाते की नाही, याकडे मात्र गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे असे सेफ्टी टॅंक लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

अपार्टमेंटमधील टाक्‍याच देतायेत धोक्‍याची घंटा

विद्यानगरीत अनेक कॉलन्या नावारुपाला आलेल्या आहेत. अनेक अपार्टमेंट उभी दिमाखात उभी असलेले पहावयास येते. अपार्टमेंटसाठी वेगवेगळ्या सेफ्टी टॅंक खोदण्यात आले आहेत. मात्र सदरचे टॅंक वेळोवेळी स्वच्छ करण्यासाठी खास व्यवस्था केलेली दिसून येत नाही. या टॅंकच्या चेंबरभोवतीही कसलीच सुरक्षात्मक काळजी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे अशा टाक्‍याच धोक्‍याची घंटा देत आहेत.

 

महसूल जादा…सुविधांची वानवा….

सैदापूर गावाला ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथे सुविधा पुरविण्यात मर्यादा येत असल्या तरी विद्यानगरीचा वाढता पसारा लक्षात घेता या ग्रामपंचायतीला मोठा महसूल गोळा होता. मात्र त्याप्रमाणात ग्रामपंचायतीकडून नागरिकांना सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. परिणामी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा इतरत्र भटकावे लागते. कॉलनीमधून साधे गटरची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येवून आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होत असतो. सैदापूरला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. अशीही अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)