अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप

पुणे – शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तीला छत्तीसगढ येथे नेवून तिच्या घरच्यांना 2 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दांपत्याला जन्मठेप आणि 21 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
उदयराम गुहाराम बंजारे उर्फ उदय काटकर (वय 29) आणि पूजा उदयराम बंजारे ( वय 34, दोघेही रा. छत्तीसगड) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीचे वडील नेबुलाल नंदप्रसाद मध्देशिया (वय 32, रा. देहूरोड ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा प्रकार 23 फेब्रुवारी 2014 ला घडला होता. फिर्यादी आणि बंजारे दांपत्य शेजारी राहत होते. सोमाटणे फाटा येथे कार्यक्रमाला घेऊन जातो, असे सांगून बंजारे दांपत्य चार वर्षाच्या मुलीला घेऊन गेले. ते परत आलेच नाहीत. सुरूवातीला मुलीला घेऊन परत येतो, अशा आशयाचा फोन दोघेजण फिर्यादींना करत असत. मात्र, काही दिवस गेल्यानंतर दोघांनी फिर्यादींना फोन करून दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली.
खंडणी न दिल्यास त्या मुलीला जीवे ठार मारण्याची अथवा विकण्याची धमकी दोघांनी फिर्यादींना दिली. त्यावेळी फिर्यादी मध्देशिया यांनी याबाबत देहुरोड पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी उदयराम याचा मोबाईलवरून माहिती काढली. त्यावेळी ते छत्तीसगढ येथील खेरजिठी बिलईगड येथे असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी छत्तीसगढ येथे जावून स्थानिक पोलिसांच्या मदतीने उदयराम आणि पूजा या दोघांना अटक केली. त्या मुलीची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात सागर कुंभार यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)