अपरीचित पाटण लेणी

पुणे जिल्हयाच्या पश्‍चिमेला असणारा मावळ तालुका हा भौगोलीक दृष्टया संपन्नच म्हटला पाहीजे. सहयाद्रीच्या डोंगररांगेचा परीसस्पर्श या तालुक्‍याला तर झालाच आहे, शिवाय या भूमीत इतिहासही घडल्याच्या नोंदी ठिकठिकाणी सापडतात. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, राजमाची सारखी दुर्गरत्ने याच तालुक्‍यातली. तसेच कार्ले, भाजे, बेडसे यासारखी जगाच्या नकाशावर आलेली पर्यटन स्थळेसुद्धा इथलीच.

 ओंकार वर्तले

कुसुरघाट-बोरघाट-उंबरखिंड यासारख्या प्राचीन घाटवाटामुळे येथल्या डोंगरावर अनेक लेण्या पहायला मिळत असतात. यातील बहुतांशी लेण्या प्रसिद्ध पावल्या व पर्यटकांच्या नकाशावर आल्या. या लेण्यांपर्यंत रस्ते झाले, पायवाटा तयार झाल्या. पण या लेण्यांची दुसरी बाजु मात्र अप्रकाशित राहिली आहे. कांब्रे, येलघोल, पद्‌मावती, पाल-उकसान अशी अपरीचित लेण्यांची नावे वाढतच जाणारी आहेत. याच लेण्यांमधील एक नाव पाटण लेणीचं आहे.

पाटण नावाची लेणी ही विसापूर किल्ल्याच्या पायथ्याच्या पाटण या गावाजवळच खोदलेली आहे. पाटण गावामुळेच ही लेणी पाटणची लेणी म्हणून ओळखली जाते. येथे येण्यासाठी लोहमार्ग आणि रस्तेमार्ग असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहे. लोहमार्गाने लोणावळयाजवळील मळवली स्थानकावर उतरून पाटण या गावात जाता येते किंवा रस्तेमहामार्गावरून कार्लावरून पाटण गाव गाठायचे. पाटण गावात आलो की, मग गावकरी लेण्यांचा रस्ता सांगतात किंवा गावातूनच जर वाटाडया घेतला तर मग आणखीनच सोप्पे. या लेणीच्याच वाटेवर गावातील एका मंदीरात एक गद्धेगाळ पडलेली दिसून येते. अतिशय दुर्मिळ असलेलं हे शिल्प मात्र आवर्जून पहाच. गावातून साधारण अर्ध्या तासाची चाल आपल्याला सपाटीवरून करावी लागते. नंतर मात्र हीच वाट उजव्या दिशेने वळून थेट चढणीचीच लागते. येथे एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती म्हणजे लेण्यांपर्यंत जाणारी ही वाट रूळलेली नसल्यामुळे चुकण्याचीच शक्‍यता जास्त आहे. त्यामुळे लेण्याची खोदीव जागा लक्षात घेवूनच चढाई करायची. किंवा नवीन पर्यटकाने गावातूनच वाटाडया घ्यायचा. साधारण वीस-पंचवीस मिनीटात आपण लेणीपाशी येवून ठाकतो.

डोंगराच्या अर्ध्या उंचीवर असलेली ही लेणी पश्‍चिम आणि दक्षिण दिशेच्या म्हणजेच वायव्य दिशेला तोंड करून उभी आहे. ही लेणी म्हणजे एक 8मी. * 10मी. अशी खोदलेली गुहाच आहे. आतमध्ये शिरलो की, आपल्याला उजव्या बाजुच्या भिंतीत एक खोदीव चैत्यगृह दिसते. सुस्थितीत असलेलं हे चैत्यगृह खूपच सुबक आहे. भिंतीपासून आतमध्ये एक अखंड कोरलेला स्तुप दिसतो. दंडगोलाकृती आकाराचा हा स्तुप जवळपास पाच मीटर उंचीचा असून वरील अंडाकृती आणि खालील दंडगोलाकृती आकार यांच्यामध्ये एक वेदीका पट्‌टीही कोरलेली दिसून येते. ही वेदीकापट्‌टी नक्षीदार असून त्यावरची जाळी मात्र पाहण्यासारखी आहे. या स्तुपाचा सर्वात वर हर्मिका व फलक कोरलेला दिसून येतो. यातील हर्मिका व फलक यांच्यामधील फरक समजावून घेणे गरजेचे आहे. फलक म्हणजे क्रमाक्रमाने मोठे होत जाणारे चौकोन तर हर्मिका म्हणजे क्रमाक्रमाने लहान होत जाणारे चौकोन या चैत्यगृहाच्या भिंतीत व समोरच्या भिंतीत पूर्वीच्या काळी उजेडासाठी पणत्या ठेवण्याच्या खोबणीही दिसतात. लेणीचा भाग काहीसा खोलगट आहे. दुसरे कुठलेही अवशेष म्हणजेच शिलालेख, खोल्या, पाण्याचे टाके या दिसून येत नाही. गुहेच्या बाहेर मात्र एका दगडी बाकेचे अवशेष दिसून येतात.

या लेणीतून समोर पाहीले असता फार सुंदर दृश्‍य दिसते. मुबई-पुणे द्रुतगती महामार्ग रेल्वे मार्गही व्यवस्थीतपणे दिसतो. उजव्या बाजुस कार्ला येथील एकवीरामंदीराचा डोंगरही दिसतो. तसेच पाटण गावाचे सुंदर दृश्‍य दिसते. या पाटण गावाचा एक प्राचीन तलाव व त्याच्या काठावरचे शिवमंदीर मात्र आवर्जून पाहण्यासारखे आहे.
एखादया सुट्‌टीच्या दिवशी गर्दीने खच्चून भरलेली ठिकाणे पाहण्यापेक्षा असे आडवाटेवर उभं असलेलं शिल्प पाहणे केव्हाही चांगलंच. अर्थात त्या भटकंतीसाठी आवडही आणि इच्छाही तेवढीच हवी म्हणा. जर या दोन्हीही गोष्टी तुमच्याकडे असतील तर मात्र या पाटणलेणीचा रस्ता तुम्ही पकडाच. कारण या वाटेवर इतिहासाच्या पाउलखूणा आणि भूगोलाची विविध रूपे सापडतील.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)