अपरा मेहता आणि शुभांगी अत्रे तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा एकत्र

एकत्र कुटुंबीतील खुल्या विचारांची आधुनिक ‘सास’ असो किंवा एखादे खलनायकी नाहीतर करड्या छटेचे पात्र असो; प्रेक्षकांना अखंडपणे खो खो हसायला लावण्याचे आव्हान असो किंवा एखादी कल्पनारम्य भूमिका विलक्षण सफाईने साकारून प्रेक्षकांना थक्क करणे असो. छोट्या पडद्यावरील भूमिकांचा असा कोणताही साचा नाही जो टीव्ही क्षेत्रातील ज्येष्ठश्रेष्ठ अभिनेत्री अपरा मेहता यांनी हाताळलेला नाही. २० वर्षांहून अधिक काळ रंगलेल्या आपल्या प्रदीर्घ टेलिव्हिजन कारकिर्दीमध्ये विविध प्रकारच्या मालिकांमध्ये असंख्य भूमिका केल्यानंतर अपरा मेहता आता आपल्या आवडीच्या प्रकाराकडे अर्थात विनोदी भूमिकेकडे परतण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

आश्चर्य म्हणजे यानिमित्ताने अपरा आणि १२ वर्षांपूर्वीच्या ”क्यूं की सास भी कभी बहु थी ”या मालिकेतील त्यांची सहकलाकार अर्थात &TV वरील भाभी जी घर पर है मालिकेतील सर्वांची लाडकी अंगूरी भाभी या दोघी छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. गंमत म्हणजे शुभांगी यांनी तेव्हाच्या त्या गाजलेल्या कौटुंबिक मालिकेमध्ये शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण केले होते, त्यानिमित्ताने या दोघींमध्ये संवाद घडला होता. त्या दिवसांच्या रंगीबेरंगी आठवणींबद्दल बोलताना शुभांगी म्हणाल्या, ”त्या मालिकेदरम्यान आम्ही एकाही प्रसंगात एकत्र नव्हतो मात्र पडद्यामागे मी त्यांच्याशी बोलल्याचं मला आठवतं. तेव्हा त्यांनी मला विविध हावभावांबद्दल सांगितलं होतं तसंच अभिनयात सुधारणा करण्याच्या दृष्टीनेही काही सल्ले दिले होते. त्यानंतर बकुला बुवा का भूत या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान आमची दुसऱ्यांदा भेट झाली. त्यावेळी अर्थातच पहिल्या भेटीची आठवण निघाली आणि आमच्यातलं अवघडलेपण दूर होऊन आम्ही भरपूर गप्पा मारल्याचं मला आठवतं.”

अपरा यांच्याबरोबर पुन्हा एकदा काम करत असल्याचा आनंद व्यक्त करताना त्या म्हणाल्या, ”अपराजी या मालिकेमध्ये भूमिका करणार आहेत ही बातमी म्हणजे माझ्यासाठी आश्चर्याचा एक गोड धक्काच होता. त्यांचे व्यक्तिमत्व खूप लाघवी आहे पण त्याचवेळी त्या कामाची शिस्तही काटेकोरपणे पाळतात. केवळ टेलिव्हीजन क्षेत्राचाच नव्हे तर रंगभूमीचाही अफाट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेऊ पाहणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी अभिनेत्यांसाठी त्या प्रेरणास्थान आहेत. इतक्या वर्षांनंतर भाभी जी घर पर है च्या निमित्ताने त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव नव्याने घ्यायला मी प्रचंड उत्सुक आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)