अपमानानंतरही पवार पुन्हा कॉंग्रेसच्या दारात – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत; पवारांबद्दल आपल्याला आदरच


व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

बारामती – “अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पडल्यानंतर तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदावर दावा सांगितला होता. त्यावेळी मनमोहन सिंह किंवा शरद पवार ही नावेही आघाडीवर होती. तसेच, पक्ष अध्यक्ष म्हणूनही पवार यांना डावलले गेले. पवार यांच्यावर वेळोवेळी अन्याय झाल्यानेच त्यांनी 1999 मध्ये कॉंग्रेस पक्ष सोडला. परंतु, अपमान होत असतानाही आज ते पुन्हा त्यांच्याच दारात जात असल्याने यांची खंत वाटते,’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील ग्राऊंड लेव्हलचा आढावा घेण्याकरिता राज्यातील बूथ प्रमुखांशी पंतप्रधान मोदी यांनी आज दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. संवादाची सुरवात त्यांनी मराठीतून केली. संवाद साधण्यापूर्वी मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून त्यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रूपये खर्च करण्यासाठी परवानगी दिली असल्याचा उल्लेख केला. लोकसभा निवडणूक 2019च्या पार्श्वभूमीवर बारामती, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, नंदुरबारच्या भाजप पदाधिकारी बूथ कार्यकर्त्यांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधत असताना सर्वप्रथम बारामतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवादाला मोदी यांनी प्रथम प्राधान्य दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस पक्षावर टीका करताना मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न केला. “पवार यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. मात्र, अध्यक्ष पदासाठी पवार यांनी प्रयत्न केला तेंव्हा कॉंग्रेसने त्यांचा अपमान करीत बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या कॉंग्रेसने त्यांचा अपमान केला त्याच कॉंग्रेस सोबत आज पवार पुन्हा जातात,’ याची खंत वाटत असल्याचेही मोदी म्हणाले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी “कॉंग्रेसचा अर्थ काय?’ असा प्रश्‍न मोदींना विचारल्यानंतर त्यांनी “चोर, शरीफ, सब चोर है…,’ अशा शब्दांत या पक्षाचे वर्णन केले. तसेच, “भाजप आणि इतर पक्षात अंतर काय?’ असेही विचारण्यात आले. तेंव्हा, “भाजप पक्ष म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी विश्वासने सांगू इच्छितो की, लोकशाहीच्या सिद्धांताचे पालन येथे केले जाते. भाजप पक्ष हाच आपला परिवार आहे,’ असे मोदी यांनी सांगितले.

बारामती येथे झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद कार्यक्रमाकरिता बारामती इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर, हवेली, खडकवासला या मतदारसंघातून हजारो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)